खान मार्केटः निर्वासितांच्या कॅम्पपासून नरेंद्र मोदींच्या टीकेपर्यंतचा प्रवास-दृष्टिकोन

खान मार्केट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, राहुल देव
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका विशेष गटाचा उल्लेख 'खान मार्केट गँग' असा केला होता. तेव्हा त्यांच्या मनात नेमका कोणत्या शब्दावर अधिक भर होता - 'खान' की 'मार्केट', किंवा खान मार्केट जिथे आहे त्या दिल्लीच्या पॉश भागावर, हे सांगता येणं कठीण आहे.

कारण या तिन्ही शब्दांचे वेगवेगळे अर्थ निघतात. त्याला 'गँग' किंवा समूह असा शब्द जोडला तर त्याचा वेगळा अर्थ मात्र नक्की काढता येतो.

आज खान मार्केट गँग हा एक खास, रंगीबेरंगी आणि एक गंभीर राजकीय वाक्प्रचार झाला आहे. शुद्ध राजकीय रणनितीमधील एक प्रबळ वाकशस्त्र म्हणून हा एक भारी रचनात्मक आणि मौलीक आविष्कार आहे.

याआधी त्याला ल्युटेन्स गँग म्हटलं जायचं. ल्युटेन्स हिल (टेकडी), ल्युटेन्स दिल्ली हे शब्दप्रयोग जवळपास दोन दशकं वापरले गेले. मात्र त्यांचा वापर मर्यादित होता.

आता केला गेला तसा या शब्दाचा व्यापक प्रभाव कधीच दिसला नाही. तेव्हा लोकांना ल्युटेन्स शब्दाचा अर्थ आणि संदर्भही माहिती नव्हता.

काय आहे ल्युटेन्स दिल्ली?

नवी दिल्ली विशेषतः राष्ट्रपती भवन, संसदेच्या इमारतीसह अनेक महत्त्वाच्या इमारती ही ब्रिटिश स्थापत्यविशारद एडविन ल्यूटेन्स यांची देणगी आहे, हे खुद्द दिल्लीवासियांनाही फारसं माहिती नसतं. पण सध्या वापरला जाणारा शब्दप्रयोग जास्त व्यापक, जास्त प्रभावी, जास्त मूर्त आणि जास्त मारक असल्याचं सिद्ध झालं आहे.

ल्युटेन्स दिल्ली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ल्युटेन्स दिल्ली

खान मार्केट दक्षिण दिल्लीतलं एक मार्केट आहे. सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फार खान यांचे भाऊ स्वातंत्र्यसैनिक जब्बार खान याचं नाव त्याला देण्यात आलं आहे.

फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांच्या कुटुंबासाठी हा परिसर होता. त्यात खाली दुकानं आणि वरती घरं होती. हळूहळू त्याच्याभोवती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या कॉलन्या, परदेशी दूतांची घरं आणि फाळणीनंतर दिल्लीत वाढलेल्या नवधनाढ्यांच्या घरांचा गराडा पडला. त्यामुळे पंजाबी निर्वासितांचे हे खान मार्केट आज भारतात सर्वात महागड्या वस्तूंचं मार्केट बनलं आहे.

इंग्रजी बोलणाऱ्या, महानगरी, श्रीमंत, जागतिक जीवनशैली आणि फॅशनेबल अभिजनांची ही आवडती जागा आहे.

2019 साली नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक विजयामागील दोन प्रमुख कारणांना निवडा, असं सांगितलं तर या परिसराचा राजकीय हत्यार म्हणून झालेला वापर याची निवड करावी लागेल.

त्यांच्या विजयामागे दुसरं कारण हिंदू मानस हे सुद्धा आहे. या हिंदू मनाने यावेळेस जाती, प्रदेशाच्या पारंपरिक राजकारणाच्या भिंती तोडल्या. पण याचा विचार वेगळा करता येईल.

मग ही खान मार्केट गँग आहे तरी काय?

हे एक अखिल भारतीय वर्गाचं प्रतीक आहे. मोदींच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर, हा वर्ग अनेक दशकं भारतावर राज्य करत होता. यात श्रीमंत, इंग्रजी बोलणारे, नवी दिल्लीच्या चार-पाच किलोमीटर परिसरातच राहाणारे, फिरणारे लोक यामध्ये आहेत.

इंग्रजी बोलणारे श्रीमंत कुलीन, मोठे सरकारी अधिकारी, इंग्रजी वर्तमानपत्र-चॅनलचे संपादक, स्तंभलेखक, काही निवडक श्रीमंत आणि तरुण राजकारणी, ज्येष्ठ शहर नियोजनकार, श्रीमंत राहाणीचे आणि डाव्या विचारसरणीसह काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेले, सांस्कृतिक, बौद्धिक आणि अकेडेमिक मठाधिपती यात मोडतात.

हा क्लबच सरकारी धोरणं ठरवायचा. हा क्लब देशातील बौद्धिक-सांस्कृतिक-कला-राजकीय-माध्यमांचं संचालन करायचा आणि त्यांचं नियंत्रण करायचा.

खान मार्केट

फोटो स्रोत, Getty Images

यामध्ये काही कुलीन आणि विशिष्ठ लोकही समाविष्ट आहेत. परंतु मुख्यतः हे लोक दिल्लीच्या ल्युटेन्स झोनमध्ये राहाणारे लोक आहेत. त्यांची प्रमुख भाषा आणि त्यांचं बौद्धिक विश्व एकच आहे, ते म्हणजे इंग्रजी.

त्यांच्या आवडी-निवडी आधुनिक पाश्चात्य पद्धतीच्या आगेच. त्यांचा देश-परदेशातील आर्थिक शक्ती केंद्राशी, बहुराष्ट्रीय संस्था, जागतिक स्वयंसेवी संस्था, विद्यापीठं आणि थिंकटँकमधील लोकांशी संपर्क असतो.

विचारसरणी आणि दृष्टिकोनाचा विचार केला तर हा वर्ग डावा आणि मध्यममार्गाने प्रभावित झालेला उदारमतवादी आहे. पाश्चात्य उदारमतवाद हा त्यांच्या विचारांचा मापदंड आहे. त्यांच्या सामाजिक विचारांवर इंग्रजी शिक्षण आणि पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव असून ते आधुनिक-जागतिक ढंगाचे आहेत.

धार्मिक कर्मकांड, पारंपरिक हिंदू गरीब आणि मध्यमवर्गाच्या रीती, सणं, संवेदना, पौराणिक संकल्पना आणि श्रद्धेकडे हा वर्ग कधी तुच्छतेने पाहातो कधी संग्रहालयातल्या वस्तूंप्रमाणे पाहातो तर कधी विरक्त, उदासीन आणि तटस्थ अकादमिक जिज्ञासेने पाहातो.

त्यांचे अध्यात्मिक विचार इंग्रजी बोलणाऱ्या आधुनिक धर्मगुरूंमध्ये मिसळून, त्यांना ऐकल्यावर, त्यांचे साहित्य वाचल्यावरच पूर्ण होतात. श्री श्री रविशंकर, जग्गी वासुदेव (हे आता साधगुरू नावाने प्रसिद्ध आहेत) यांच्यासारखे आध्यात्मिक गुरू त्यांना प्रिय आहेत. त्याआधी स्वामी चिन्मयानंद, अमेरिकास्थित दीपक चोप्रा यांच्यासारखे गुरू त्यांना प्रिय होते.

या वर्गाचे काही प्रादेशिक विभागही आहेत. भारताच्या राज्यांच्या राजधान्या, व्यावसायिक शहरांमध्ये ते वसले आहेत. यामध्ये स्थानिक इंग्रजाळलेल्या बुद्धिजीवींबरोबर राहाणाऱ्या महागड्या गाड्या, घरे, संपत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या नवधनाढ्य युवा पीढीचाही समावेश आहे.

आतापर्यंत या वर्गाची चकाकी, धमक, ताकद, ग्लॅमर, प्रतिष्ठा आणि वैभवाची माहिती लोकांना विशेषतः तरुण पीढीला नव्हती. परंतु स्मार्टफोन आणि टीव्हीच्या कृपेने या स्वप्नवत जगाचा आणि नवकुबेरांची ओळख त्यांना झाली आहे. परंतु ही तरुण पीढी या वर्गात प्रवेश करण्याचा विचारही करू शकत नाही.

या सर्वसामान्य लोकांचं आयुष्य़ संघर्षात, रोजची भाकरी मिळवण्यात, झगडण्यात, झोपड्या, अंधाऱ्या गल्ल्यांत, अराजक पसरलेल्या वस्त्यात, छोट्या नोकऱ्या करण्यात, स्वस्त मनोरंजन, फिल्मी नायकांची भ्रष्ट नक्कल करणारे स्वस्त कपडे, गर्दीने भरलेल्या बस, सायकल, टेम्पोमधून प्रवास करत आणि शहरातील स्वस्तात जेवण देणाऱ्या ढाब्यांमध्येच सामावलेलं आहे.

इंग्रजाळलेल्या वर्गापासून अंतर

भारतातील भीषण आणि वाढत्या आर्थिक, सामाजिक विषमतेने या वंचित भारताच्या मनात 'इंडिया'च्या वैभव आणि शक्तीप्रती इर्षा आणि ते न मिळाल्याने आलेल्या निराशेने भरून टाकले आहे.

खान मार्केट

फोटो स्रोत, Getty Images

त्यांची भाषासुद्धा त्यांना या इंग्रजाळलेल्या वर्गाशी साधं मानवी पातळीवरचं संभाषण करण्यासाठी समर्थ बनवत नाही. त्यामुळे त्यांच्यात एकप्रकारची दैन्यावस्था आलेली आहे.

या वर्गाच्या स्वतःच्या हिंदी, मराठी, पंजाबी, हरयाणवी, भोजपुरी, बुंदेली, मराठी या भाषा आपापल्या प्रदेशात राजकीय स्वरुपात शक्तीशाली आहेत. ही राजकीय ताकद संसद आणि विधानसभा, राजकीय सभा, देशी नेत्यांच्या भाषणांमध्ये आनंद देणारी वाटते. परंतु इंग्रजाळलेल्या लहानश्या विश्वात प्रवेश देण्याचा अधिकार आणि धाडस देत नाही.

नरेंद्र मोदी याच वर्गातून आलेले आहेत. त्यांची असामान्य प्रतिभा, जिज्ञासा, तंत्रप्रियता आणि स्वतःच्या लक्ष्यकेंद्री पुरुषार्थाच्या आधारे ते आज एका विशिष्ठ स्थानावर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे हे सगळे ल्युटेन्स दिल्लीवाले कुलीन, श्रीमंत, इंग्रजाळलेले अभिजात लोक अचानक निष्प्रभ ठरले आहेत.

नरेंद्र मोदींनी दोन्ही वर्गांच्या मनोविज्ञानावर विस्मयचकीत करणारी, नैसर्गिक पकड घेतली आहे. या दोन्ही वर्गांची नस ते बरोबर ओळखतात. गुजरातमध्ये 12 वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी या धनाढ्यांना पुरतं ओळखलं होतं. तसेच आपल्या हितासाठी त्यांचा वापर करण्यातही त्यांचा हातखंडा होता. पण हा वर्ग मतं देत नाही. मतं देणाऱ्या वंचित, विषमतेचा सामना करणाऱ्या गरीब आणि निम्न मद्यमवर्गीयाचं मन त्यांनी स्वानुभावावरून आधीच ओळखलेलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)