वायू चक्रीवादळ: मान्सून आणखी लांबणार, शेतकरी चिंतेत #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. राज्यात मान्सून लांबणीवर, वायू चक्रीवादळाचा फटका

आधीच उशिराने आलेल्या मान्सून राज्यात दाखल व्हायला अजून विलंब होणार आहे. केरळ किनारपट्टीवर दाखल झालेला मोसमी पाऊस कर्नाटकपर्यंत वेगाने पुढे सरकला. पण पश्चिम किनारपट्टीवर वाहणाऱ्या वाऱ्यांची स्थिती अनुकूल नसल्याने महाराष्ट्राला पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकसत्ताच्या बातमीनुसार, पहिल्या टप्प्यात मान्सून अंडमान बेटांवर 17 मे रोजी पोहोचला होता. मात्र तो पुढे सरकण्यासाठी तब्बल तीन आठवडे लागले.

आधीच मान्सूनला भारतात यायला उशीर झालेला असताना त्यातच पश्चिम किनारपट्टीवर वायू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे मान्सून आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला बसणार नाही आहे. पण मान्सूनच्या लांबणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

2. 'CBSE आणि ICSE विद्यार्थ्यांचेही फक्त लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरावे'

अकरावीच्या प्रवेशासाठी CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांचे फक्त लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात यावेत, यासाठी राज्य सरकारनं धडपड सुरू केली आहे. यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी चर्चा करणार आहे.

यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा दहावाची निकाल फक्त 77 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत तब्बल 12 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. या तुलनेत CBSE आणि ICSE निकाल 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं अकरावीसाठी प्रवेश घेताना महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी पिछाडीवर पडू नये म्हणून सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

3. यूनोचा निर्देशकाचा दर्जा मिळू नये म्हणून भारताचा इस्रायलला पाठिंबा

शाहेद या पॅलेस्टिनी संस्थेला संयुक्त राष्ट्रात (UN) निर्देशकचा दर्जा मिळू नये, या इस्रायलच्या ठरावाला भारताने पाठिंबा दिला आहे. यासंबंधीची बातमी हिंदुस्थान टाइम्सने दिली आहे.

संयुक्त राष्ट्रात सादर झालेल्या या ठरावावर भारताने अमेरिका, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी आणि जपान यांच्यासह इस्रायलच्या बाजूने मतदान केलं आहे.

भारतात इस्रायलच्या राजनैतिक अधिकारी असणाऱ्या माया कादोश यांनी, "संयुक्त राष्ट्रात इस्रायलच्या बाजूने उभं राहिल्याबद्दल भारताचे आभार. आपण एकत्र येऊन दहशतवादाविरूद्ध लढा देऊ," अशा आशयाचं ट्वीट केल्यानंतर ही गोष्ट प्रकाशझोतात आली.

4. 'भारताचा वृद्धीदराची चुकीच्या पद्धतीने मोजणी'

2011-12 ते 2016-17 या काळातील भारताच्या GDPचा वृद्धीदर वास्तवापेक्षा तब्बल 2.5 टक्क्यांनी अतिशयोक्त (ओव्हरएस्टिमेटेड) असल्याचे नरेंद्र मोदी सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांचं म्हणणं आहे. GDPच्या मोजमापाची पद्धती बदलल्यामुळे ही अतिशयोक्ती निर्माण झाल्याचं सुब्रमण्यन यांनी सांगितलं आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

हार्वर्ड विद्यापीठात प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात सुब्रमण्यन यांनी म्हटले की, या काळातील भारताचा वृद्धीदर सुमारे 7 टक्के असल्याचं अधिकृत आकडेवारीत म्हटलं आहे. वास्तवात तो तितका नाही. तो फक्त 4.5 टक्के आहे.

सुब्रमण्यन यांच्यानुसार भारताने वास्तव GDPच्या मोजमापाचा डेटा स्रोत आणि पद्धती यात बदल केला आहे. 2011-12 पासूनच्या आकडेवारीसाठी हा बदल लागू करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या कार्यकाळात GDP मोजमापाचा डेटा स्रोत आणि पद्धतीत बदल करण्यात आला होता. मोदी सरकारने ही पद्धती पूर्वलक्षी प्रभावाने 2011-12 पासून लागू केली.

5. 'जुळता जुळता जुळतंय की' मालिकेच्‍या सेटवर हल्‍ला

खंडणीसाठी 'जुळता जुळता जुळतंय की' या आगामी मालिकेच्‍या सेटवर काल (सोमवारी) रात्री हल्‍ला करण्‍यात आला. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.

करवीर तालुक्‍यातील केर्ली या गावात ही घटना घडली. या प्रकरणी केर्ली गावचे उपसरपंच अमित पाटील याच्‍यासह इतर 9 जणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून पोलिसांनी त्‍यांना अटक केली आहे.

केर्ली गावात शूटिंग करायचे असेल तर प्रोटेक्‍शनसाठी आम्‍हाला पैसे द्यावे लागतील, असे उपसरपंच अमित पाटील आणि त्‍यांच्‍या साथीदारांनी दिग्‍दर्शकाला धमकावलं होतं. मात्र पैसे देण्‍यास दिग्‍दर्शकाने नकार दिल्‍याने काल चित्रिकरणासाठी आलेल्‍या वाहनांची आणि शूटिंगच्‍या साहित्‍याची तोडफोड करण्यात आली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)