You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ल्ड कप 2019 : विराट कोहली की स्टीव्हन स्मिथ - कोण आहे जगातला सर्वोत्तम बॅट्समन?
- Author, शिवाकुमार उलागनाथन
- Role, बीबीसी तामिळ प्रतिनिधी, लंडनहून
शनिवारच्या स्वच्छ सूर्यप्रकाशामुळं लंडनच्या ओव्हल मैदानावर जमलेल्या भारतीय संघाच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर उत्साह झळकू लागला होता. शुक्रवारी पाऊस झाला असला तरी शनिवारी मात्र त्याचा मागमूसही नव्हता. दिवसभर हलकं ऊन होतं.
ओव्हलवर मोठ्या संख्येनं भारतीय क्रिकेट रसिक जमा झाले होते. त्यांच्यापैकी किणाला आपल्या आवडत्या खेळाडूसोबत सेल्फी काढायचा होता तर कुणाला ऑटोग्राफ हवा होता.
शनिवारी भारतीय संघानं ओव्हल स्टेडियमवर सराव केला. शुक्रवारी झालेल्या पावसामुळं टीम इंडियाला सराव करता आला नव्हता.
स्टेडिअमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर खूप वेळ ताटकळत थांबलेला नारायण मला भेटला. "धोनीची झलक पहायला मिळाली तरी खूप झालं आणि जर नशीब अगदीच जोरावर असेल तर ऑटोग्राफही मिळेल," तो म्हणाला.
भारतीय संघाची बस तिथे आली, तेव्हा गर्दीतून आनंदाचे चित्कार उमटले. बसमधून रोहित, धोनी, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन आणि इतर खेळाडूंना उतरताना पाहून तर तिथे जमलेल्या सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला.
"कोहली का आला नाहीये?" एकानं विचारलं. "काल तर तो आला होता."
"कदाचित तो येणार नाही. साउथॅ हॅम्पटनच्या वेळीही असंच झालं होतं," दुसऱ्या एका व्यक्तिनं परस्पर उत्तर दिलं. या फॅन्सकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती.
फिंचच्या वक्तव्यावर चाहत्यांची प्रतिक्रिया
जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या स्मिथचं पुनरागमन आणि भेदक वॉर्नर, या ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्ध जमेच्या बाजू असतील.
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच यानं शनिवारी ओव्हलवर झालेल्या पत्रकार परिषदेत एक मोठं वक्तव्यं केलं - स्टिव्हन स्मिथ हा क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे.
काही कट्टर भारतीय समर्थकांना फिंचचं हे वक्तव्य रुचलं नाही. "स्मिथ जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, असं विधान फिंच करूच कसं शकतो? कोहलीची वन डे आणि टी20 सामन्यांतील कामगिरी स्मिथपेक्षा केव्हाही चांगली आहे.
"भारतीय कर्णधाराला डिवचण्याचाच फिंचचा प्रयत्न होता. अशा युक्त्यांमधून काहीच साध्य होणार नाही," नॉटिंगहमहून आलेला उत्साही क्रिकेट रसिक अजय आपलं मत मांडत होता.
तर सौरव भट्टाचार्य म्हणाला, "ओव्हलच्या मैदानावर विराट कोहलीची बॅटच आता फिंचला उत्तर देईल. कोहली चांगली खेळी करेल. त्याने यापूर्वीही उत्तम खेळ केला आहे आणि रविवारीही तशीच कामगिरी करेन."
माध्यमांशी संवाद साधताना रोहित शर्मालाही फिंचच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यानं आपल्याला 'सध्या तरी सामन्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे', एवढंच उत्तर दिलं.
भारत आणि ऑस्ट्रेलियानं गेल्या काही काळात अत्यंत चुरशीच्या अशा मालिका जिंकल्या असल्याचंही रोहित शर्मानं आवर्जून नमूद केलं. त्यामुळे काही गोष्टी या सामन्याच्या दिवसावरही अवलंबून असतील, असं रोहित म्हणाला.
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया
ओव्हलच्या मैदानावर जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलयाचे संघ आमनेसामने असतील तेव्हा गेल्या काही वर्ल्ड कपमध्यल्या दोन्ही संघांच्या कामगिरीची तुलना आपसूकच केली जाईल.
2015 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला उपांत्य सामना भारत कधीच विसरू शकणार नाही. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताकडून झालेला पराभव आणि त्याचबरोबर संपुष्टात आलेलं आव्हान ऑस्ट्रेलियासाठी एक कटू आठवण होती.
2003चा अंतिम सामना हासुद्धा भारतासाठी 2015च्या उपांत्य सामन्यासारखाच होता. या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रचंड मोठी धावसंख्या उभारली होती. भारताला हे आव्हान पेलण्यात अपयश आलं होतं.
1999च्या वर्ल्ड कपमध्ये सुपर सिक्समध्ये दोन्ही देशांची लढत झाली. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करत 282 धावा केल्या. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अझरुद्दीन यांना ग्लेन मॅकग्रानं बाद करत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला होता.
यातील प्रत्येक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या फलंदाज किंवा गोलंदाजानं स्वप्नवत म्हणावी अशी कामगिरी करत आपल्या देशाला विजय मिळवून दिला होता. 1999 साली मॅकग्रा आणि मार्क वॉ यांच्यामुळं ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला तर 2003 च्या अंतिम सामन्यात रिकी पॉन्टिंग आणि डॅमियन मार्टिनमुळे.
महत्त्वाची लढत असेल तेव्हा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख खेळाडू फॉर्ममध्ये येतो. त्यामुळे 2019 साली ऑस्ट्रेलियाला कोण विजय मिळवून देणार, अशी चर्चा रंगली आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथचं पुनरागमन तसंच मिशेल स्टार्कनं गेल्या सामन्यात घेतलेल्या 5 विकेट्स यांमुळे भारताचं आव्हान कठीण झालं आहे. दुसरीकडे भारतीय गोलंदाजही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सामोरं जाण्यासाठी सज्ज आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बॅटिंग, बॉलिंग आणि अन्य बाबतीत एकमेकांना तुल्यबळ आहेत. मात्र एका बाबतीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला वरचढ आहे- चाहत्यांचं समर्थन. ओव्हलच्या मैदानावर मोठ्या संख्येनं जमलेल्या भारतीय चाहत्यांपुढं कदाचित ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचा आवाज कमी पडू शकतो.
शनिवारी सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंची गेटबाहेर आतुरतेनं वाच पाहणारे भारतीय चाहते हातात तिरंगा घेऊन 'इंडियााााा! इंडिया! इंडियााााा! इंडिया!'चा गजर करत होते. रविवारी स्टेडिअममध्ये काय चित्र पहायला मिळणार त्याची ही झलकच होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)