You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मावळ लोकसभा निकाल : पार्थ पवार 2.16 लाख मतांनी पराभूत, श्रीरंग बारणे यांचा विजय
मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभूत केलं आहे.
यंदाच्या सर्वांत महत्त्वाच्या जागांपैकी एक होती ती मावळची. शरद पवारांनी यंदा लोकसभा लढतीतून माघार घेत त्यांचा नातू आणि पुतणे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली होती.
पण, आता पार्थ पवार यांचा तब्बल 2 लाख 15 हजार 913 मतांनी पराभव झाला आहे.
पार्थ यांच्या या पराभवाची कारणं काय?
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निकालाविषयी राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघ अनुकूल नसतानाही त्यांना तिथून उमेदवारी देण्यात आली. यासाठी पवारांच्या घराण्यातील समीकरणं कारणीभूत होती. घरच्यांचा आग्रह पवारांना मान्य करावा लागाला. शिवाय पार्थ यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर करण्यात आली होती. ऐनवेळी जाहीर केलेली उमेदवारी जनता स्वीकारत नसते. पार्थ पवारांच्या दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकानं पराभव होत असेल तर अजित पवारांचं राज्यातल्या राजकारणातलं स्थानही त्यांना वाचवू शकलं नाही, असा त्याचा अर्थ होतो."
"याशिवाय घराणेशाहीनं दिलेला उमेदवार स्वीकारण्याचे दिवस संपलेत. भाजपमध्ये घराणेशाहीतून आलेले उमेदवार जिंकत आहेत, कारण त्याला मोदींच्या हवेची साथ आहे. अजित पवारांना राज्यात अजेय नेते म्हणून ओळखलं जातं. पण पार्थ पवारांच्या पराभवामुळे त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच अजित पवारांच्या नावावर हा पराभव जमा होईल," त्या पुढे सांगतात.
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या मते, "मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचा सातत्यानं पराभव होत होता. त्यामुळे मग घरातला उमेदवार द्यावा, असं शरद पवारांना वाटलं. राष्ट्रवादीला मावळमधील परिस्थिती इतकी प्रतिकूल होती की, तिथं पार्थऐवजी दुसरा उमेदवार असता तर तो पार्थ यांच्यापेक्षाही अधिक मतांनी पराभून झाला असता. शिवाय पार्थ यांना लोकांनी कशाच्या आधारावर मतं द्यावी हासुद्धा प्रश्न होता."
मावळची लढत
पार्थ पवार यांची लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याबरोबर होती.
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. रायगडमधील पनवेल, उरण आणि कर्जत तर पुण्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवडचा समावेश या मतदारसंघामध्ये होतो. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्यापैकी प्रभावी आहे, तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील सहा विधान सभांपैकी पाच विधानसभांमध्ये शिवसेना भाजपाचे आमदार आहेत. भाजपाचे तीन आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. तर केवळ कर्जत विधानसभेत राष्ट्रवादीचे सुरेश लाड आमदार आहेत.
पार्थ पवार यांच्यासमोर आव्हानही तेवढंच होतं. महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समित्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत भाजप-शिवसेनेचं बळ वाढल्याचं चित्र आहे. अजित पवार यांनी केलेली विकासकामं आणि जनसंपर्क यांच्या बळावर पार्थ पवार यांना मावळची जागा लढवावी लागणार आहे.
याशिवाय, मावळमध्ये विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं नेटवर्क खूप चांगलं आहे, असं जाणकार सांगतात.
2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. शेकाप आणि मनसेच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 मते मिळाली होती. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तब्बल 5 लाख 12 हजार 226 मतांनी विजयी झाले होते.
"इथं जर उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचा असेल तर त्याला शेकाप समर्थकांची एकगठ्ठा मतं मिळतात. मात्र दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला अशी एकगठ्ठा मतं मिळत नाहीत," असं मत ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)