You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात एकूण 62.27 टक्के मतदान
आज 12 मे रोजी सात राज्यांच्या 59 लोकसभा जागांसाठी झालेल्या सहाव्या टप्प्यात एकूण 62.27 मतदान झालं आहे.
सहाव्या टप्प्यात बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आणि पश्चिम बंगाल, दिल्ली आणि हरियाणा या सात राज्यात मतदान झालं.
हरियाणा आणि दिल्लीच्या लोकसभेच्या सर्व जागांसाठी आज (सोमवारी) मतदान झालं.
संध्याकाळी 8 वाजेपर्यंत एकूण मतदान 62.27 टक्के इतके झाले होते. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये 80.16 इतके झाले आहे.
त्यापाठोपाठ हरयाणा 65.48 टक्के, झारखंडमध्ये 64.50, , मध्यप्रदेश 62.06, बिहारमध्ये 59.29 टक्के, दिल्लीमध्ये 58.01 टक्के, उत्तर प्रदेशात 54.24 टक्के इतके मतदान झाले.
आज मतदान होत असलेल्या 59 जागांबरोबरच पश्चिम त्रिपुरातील 168 मतदान केंद्रांवरही मतदान झाले.
11 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात मतदान केंद्रावर ताबा मिळवण्यासह अनेक अनियमितता आढळून आल्या होत्या. त्यामुळे तिथेही मतदान झाले.
कुणी कुणी केलं मतदान?
दरम्यान आज सकाळपासून सामान्य नागरिकांपासून ते राजकारणी, क्रिकेटपटू आणि इतर सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
नवी दिल्लीमध्ये नीती आयोगाचे सीइओ अमिताभ कांत आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनीही मतदान केले.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मतदान केलं. "राष्ट्रनिर्मितीसाठी मतदान करणं हा हक्क आणि जबाबदारी आहे," असं त्याने एका ट्वीटमध्ये लिहिलं.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजप उमेदवार गौतम गंभीरनेही ओल्ड रजिंदर नगर भागातील एका मतदान केंद्रात मतदान केलं. गौतम गंभीर दिल्लीतील सर्व उमेदवारांपैकी सर्वांत जास्त चर्चेत राहिलेला उमेदवार आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कर्नाल येथील एका केंद्रात मतदान केलं.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी राळ उठवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनीही भोपाळ येथे मतदान केलं. त्या काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचं आव्हान आहे.
राजधानीतल्या जागांबद्दल उत्सुकता
राजधानी दिल्लीतल्या सातही जागांवर आज मतदान झालं. 2014च्या निवडणुकीत भाजपने सातही जागांवर विजय मिळवला होता. या सातही जागा टिकवून ठेवणं हे भाजपसमोरचं आव्हान आहे.
त्यातही पूर्व दिल्लीतील भाजपचे उमेदवार गौतम गंभीर आणि आपच्या उमेदवार आतिशी यांच्यातील वाकयुद्ध चांगलंच चर्चेत होतं. गौतम गंभीर यांच्याशिवाय भोजपुरी गायक आणि दिल्ली भाजप नेते मनोज तिवारी, सुफी गायक हंसराज हंस, असे सेलेब्रिटी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील जागांवरही भाजपची कसोटी लागली आहे. आज मतदान होणाऱ्या 14 जागांवर आझमगड वगळता 2014 मध्ये भाजपने सर्व जागांवर विजय मिळवला होता. यावेळी या जागांवर समाजवादी पक्ष आणि बसपा यांची युती आहे. त्यामुळे भाजपची इथे चांगलीच कसोटी लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जागांसाठी झालेल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये तीन प्रचारसभा घेतल्या.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही जोरदार प्रचार केला आहे. राफेलच्या मुद्द्यावर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली.
या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामधील आरोप-प्रत्यारोपाचा सामनाही पाहायला मिळाला.
पाहा बॅटल ऑफ बंगाल
उत्तर प्रदेशात जागा कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजप त्याची भरपाई पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये करण्याची अपेक्षा करत आहे. त्यामुळे निवडणुकीचे निरीक्षण करणाऱ्यांना वाटतंय की पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूल काँग्रेससमोर मोठं आव्हान ठरेल.
यानंतर अंतिम टप्पा 19 मे रोजी होईल, ज्यात उर्वरित जागांवर मतदान होणार आहे. त्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)