अरविंद केजरीवाल यांना प्रचारादरम्यान तरुणाकडून मारहाण- व्हीडिओ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका तरुणाने थोबाडीत मारल्याचा प्रकार घडला आहे. केजरीवाल हे दिल्लीतील मोतीनगर या भागात जीपमधून रोडशो करत होते.

केजरीवाल हे सर्वांना अभिवादन करत होते, लोकांसोबत हस्तांदोलन करत होते. त्यावेळी त्या ठिकाणी एक तरुण समोर आला आणि जीपच्या बोनेटवर चढला. केजरीवाल यांना आधी वाटलं की त्या तरुणाला हस्तांदोलन करायचं आहे पण त्या तरुणाने केजरीवाल यांच्या थोबाडीत मारली.

त्यानंतर केजरीवाल यांचा तोल गेल्याचं व्हीडिओत दिसतं. केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा आम आदमी पक्षानं निषेध केला आहे. केजरीवाल यांना पुरेसं संरक्षण देण्यात दिरंगाई करण्याचा आरोप आप'ने केला आहे.

आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह म्हणतात की मोदी सरकारने सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा केला आहे. केजरीवाल यांच्यावर एखादा मोठा हल्ला होण्याची वाट सरकार पाहत आहे का? की एखाद्या मोठ्या कटाचा हा भाग आहे?

हा हल्ला विरोधी पक्षांनी घडवून आणला होता असा आरोप आप'ने केला आहे. हा हल्ला झाला असला तरी दिल्लीला आम आदमी पार्टीला कोणी रोखू शकणार नाही असं ते सांगतात.

आपने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर म्हटलं आहे की हा हल्ला अरविंद केजरीवाल यांच्यावर नाही तर पूर्ण दिल्लीवर आहे. 12 मे रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी दिल्लीची जनता या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल.

अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचा केजरीवाल यांना जीवे मारण्याचा विचार आहे का? गेल्या पाच वर्षांत तुम्ही आमचं मनोधैर्य कमी करू शकला नाहीत? निवडणुकीत हरवू शकला नाहीत तेव्हा या मार्गाने काटा काढायचा तुमचा विचार आहे का? असा प्रश्न आप नेते मनिष सिसोदिया यांनी केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)