भाजप हे दंगल घडवणारं सरकार - केजरीवाल

    • Author, राहुल रणसुभे आणि श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

जे सरकार शाळा चालवू शकत नाहीत ते महाराष्ट्र काय चालवतील, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. जिजाऊंच्या 420व्या जन्मदिवसानिमित्त ते बुलढाणा जिल्ह्यातल्या जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजे सिंदखेड राजामध्ये आले होते.

"दिल्लीत आम्ही 3 वर्षांत 300 शाळा सुरू केल्या. महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की, ज्या महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा सुरू झाली, दलितांची पहिली शाळा सुरू झाली त्याच महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करत आहेत", असं केजरीवाल सभेत म्हणाले.

12 जानेवारी 1598ला जिजाबाईंचा यांचा बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथे जन्म झाला. जिजाऊंचं हे जन्मस्थान शिवप्रेमींसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिजाऊंची जयंती सिंदखेड राजा येथे उत्साहात साजरी होत आहे. या वर्षी अरविंद केजरीवाल यांच्याखेरीज अनेक मोठ्या नेत्यांनी सिंदखेड राजाला हजेरी लावली.

'भीमा कोरेगावची दंगल भाजपनं घडवली'

भीमा कोरेगावमध्ये झालेली दंगल भाजपनं घडवली असून, हे दंगल घडवणारं सरकार आहे, अशी टीका केजरीवालांनी या सभेत केली.

"मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सरकार दिल्लीत चालवत आहे. महाराष्ट्रातलं सरकार मात्र शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या स्वप्नांना पायदळी तुडवत आहे," असंही केजरीवाल म्हणाले.

"महाराष्ट्र सरकारचं बजेट 3 लाख कोटी इतकं असतं, तर त्या तुलनेत दिल्लीचं बजेट फक्त 40 हजार कोटी एवढं असतं. असं असतानाही महाराष्ट्र सरकार म्हणतं की, शाळा चालवायल्या आमच्याकडे पैसे नाहीत. मग आमच्याकडे कुठून आले पैसे?" असा प्रश्न दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.

"खरं तर हा सर्व पैसा महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी खाल्ला आहे. म्हणूनच महाराष्ट्रात सगळीकडे फक्त आणि फक्त भ्रष्टाचार हाच शब्द ऐकू येतो," असं केजरीवाल पुढे म्हणाले.

सकाळपासून शिवप्रेमींची गर्दी

सकाळी नऊ वाजल्यापासूनच शिवप्रेमींनी जिजाऊंच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

'तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ जय शिवराय'च्या जयघोषांनी आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता. काव्यवाचन, पोवाडे, सामुहिक विवाह सोहळा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन यानिमित्तानं करण्यात आलं होतं.

यावर्षीच्या जिजाऊ जयंतीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासहित अनेक नेते हजर होते.

अरविंद केजरीवालांची सभा

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या सभेला 'महाराष्ट्र संकल्प सभा' असं नाव देण्यात आलं होतं.

केजरीवालांच्या या सभेनं आम आदमी पक्षाला महाराष्ट्र राज्यात नवसंजीवनी मिळेल का? हा विषय सगळीकडे चर्चिला जात आहे.

केजरीवालांनी आपण महाराष्ट्रात नवीन इनिंगला सुरुवात करणार आहोत, असे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर केजरीवाल सिंदखेड राजा येथील सभेत काय बोलतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)