राज ठाकरे यांच्याकडून अक्षय कुमारने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीची खिल्ली #पाचमोठ्याबातम्या

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) ... असा प्रश्न विचारण्याची हिंमत कुठल्याही पत्रकाराची झाली नसती- राज

अभिनेता अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. पनवेल येथे झालेल्या सभेत राज यांनी अक्षय कुमारची खिल्ली उडवली आहे. "अक्षय कुमारने मोदींना पण काय प्रश्न विचारला. असा प्रश्न विचारण्याची कुठल्या पत्रकाराचीही हिम्मत झाली नसती. प्रश्न काय विचारला आंबा खाता का ?

हा काय पंतप्रधानांना विचारायचा प्रश्न आहे. चोखून खाता का? कापून खाता का? काय मजाक लावला आहे. इथे जनता सरकारवर अवलंबून आहे", अशा शब्दांमध्ये त्यांनी अक्षय कुमारच्या मुलाखतीवर टीका केली. लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

2) साध्वी प्रज्ञाविरोधात करकरेंचे माजी सहकारी

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या विधानामुळे आपल्याला दुःख झाले असे सांगत भोपाळमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय करकरे यांचे माजी सहकारी रियाजुद्दिन ग्यासुद्दीन देशमुख यांनी जाहीर केला आहे.

त्यानंतर त्यांनी भोपाळमधून लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. देशमुख मूळचे औरंगाबादचे असून 2016 साली ते सहाय्यक आयुक्तपदावरून नियुक्त झाले. हेमंत करकरे अकोल्याला अधीक्षकपदी असताना मी त्य़ांच्याबरोबर उपनिरीक्षक पदावरती काम केले होते.

"ते माझे साहेब होते. ते शूर, सहकारी वृत्तीचे आणि प्रोत्साहन देणारे होते. मी त्यांचा खूप आदर करायचो", असे देशमुख यांनी करकरे यांच्याबद्दल बोलताना सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3) महाराष्ट्रात उष्णतेची लाट, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता

महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. याची सर्वाधिक झळ विदर्भाला बसली असून अकोल्यात तापमान 46.3 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमान वाढले आहे.

नागपूर येथे 44.3 अंश, परभणी 45, चंद्रपूर 45.4, यवतमाळ 44.5, बुलढाणा 42.5, अमरावती 40.5, जळगाव 43 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले.

त्याबरोबरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू किनारपट्टीचा काही भाग, केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर 28 एप्रिल ते 1 मे या काळात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लोकमतने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

4) मिलिट्री पोलीस विभागात महिलांना संधी

लष्कराच्या मिलिट्री पोलीस विभागामध्ये महिलांना जवान म्हणून संधी देण्याची घोषणा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यानंतर लष्कराने या पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

लष्कराने जाहिरात प्रसिद्ध करून या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया 25 एप्रिलपासून सुरू झाली आहे. 8 जून ही नोंदणीची अखेरची तारीख आहे.

आजवर सशस्त्र दलांमध्ये महिलांची फक्त अधिकारी पदावरती नियुक्ती होत असे. वैद्यकीय, कायदा, सिग्नल, अभियांत्रिकी विभागांमध्ये महिलांना घेतले जात असे, मात्र आता जवान पदावरती काम करण्याची संधी मिळाल्याने महिलांसाठी नवे करिअर खुले झाले आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

5) मोदी-शहा सत्तेवर आल्यास राहुल जबाबदार- केजरीवाल

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पुन्हा केंद्रात सत्ता मिळाली तर त्याला राहुल गांधीच जबाबदार असतील अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशन कार्यक्रमात 'आप' सोबत आघाडी न होण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. "आघाडी करण्यात काँग्रेसला स्वारस्य नव्हते. गेले दोन महिने आपने काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे प्रयत्न केले, पण आता मोदी-शहा जोडी सत्तेवर आली तर त्यासाठी राहुल जबाबदार असतील", असं ते यावेळेस म्हणाले.

दिल्लीमध्ये सात मतदारसंघांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजपा-काँग्रेस-आप अशी लढत होणार आहे. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)