You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे हे स्टॅंड-अप कॉमेडियन: विनोद तावडे
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आपल्या प्रचारसभांमधून भाजपवर निशाणा साधणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी टीका केली आहे.
"राज ठाकरे हे स्टॅंड अप कॉमेडियन आहेत," असं ते म्हणाले आहेत. बीबीबी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज ठाकरे सध्या महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात सभा घेताहेत. त्यांच्या सभांची चर्चा होत असतांनच, त्यांनी केलेल्या आरोपांना भाजपातर्फे रोज तावडे उत्तरं देताहेत. सतत होणारे हे आरोप भाजपाला निवडणुकीत अडचणीचे ठरताहेत का यावर त्यांनी ठाकरेंवर उलटी टीका केली आहे.
"राज ठाकरे हे स्टॅंड अप कॉमेडियन आहेत. टुरिंग टॉकीज आहे. आम्ही इतकं गांभीर्यानं घेत नाही. पण त्यांचे आरोप खोडून काढले पाहिजे. काहीतरी सनसनाटी करायची म्हणून ते आहेत. पक्ष आणि नेता भाड्यानं देणे आहे अशी 'कृष्णकुंज'वर सध्या पाटी आहे," असं तावडे म्हणाले.
पण प्रतिआरोप सोडले तर जे भाजपानं केलेल्या विकासाच्या दाव्यांवर राज ठाकरे बोट ठेवताहेत त्याला थेट उत्तरं का दिली जात नाहीत?
"त्याची सगळी उत्तरं मुख्यमंत्र्यांनी अपल्या मुलाखतींमध्ये दिली आहेत. आणि ते ज्या पद्धतीनं टीका करताहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात 'मेक इन इंडिया' मधून किती रोजगार आला, किती गुंतवणूक आली, नोकऱ्या आल्या हे सगळं आकडेवारीनुसार आमचे नेते मांडतात. नोटाबंदी केली याचं राज ठाकरेंना इतकं काय झोंबलं राज ठाकरेंना, काय त्यांचं इतकं नुकसान झालं हा मला प्रश्नच आहे. नोटाबंदीनंतर ९९ टक्के पैसे बँकेत परत आले याचा अर्थ काळा पैसा नव्हता असा जावईशोध कसा लागू शकतो?," विनोद तावडे या मुलाखतीत विचारतात.
सेना-भाजपत युती होतांना विधानसभा निवडणुकांच्या वाटपाबद्दलही निर्णय झाला आहे का याबाबत प्रश्नही तावडेंना विचारला गेला.
'हिंदुत्व ही आमची कमिटमेंट आहे'
"निवडणूक हे एक प्रकारचं युद्ध आहे. त्यावेळेस हे एक शस्त्र नको, ते राहू दे बाजूला, असं नाही करता येत. विकास पण, पुढे काय करणार हे दाखवायचं, आणि त्यावेळेस जो मुद्दा असतो, तोही घ्यायचा असतो. आणि हिंदुत्व ही आमची कमिटमेंट आहे," असं उत्तर त्यांनी दिलं.
या मुलाखतीत त्यांनी मध्यप्रदेशच्या भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्याच्या भाजपाच्या निर्णयाचंही समर्थन केलं आहे.
प्रज्ञा सिंग या महाराष्ट्रात मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपी आहेत आणि सध्या जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. महाराष्ट्राचे दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी त्यांनी केलेल्या विधानांवरून वादळ उठलं आहे.
'करकरेंच शहीद होणं आणि मालेगाव प्रकरणाचा तपास हे दोन्ही वेगळे मुद्दे'
"हेमंत करकरेंविषयी साध्वी प्रज्ञासिंग यांनी जे म्हटलं आहे त्याविषयी भाजपानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. करकरे हे शहीद आहेत आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो. भाजपाच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे की साध्वी प्रज्ञावर खोटे आरोप लावले होते. त्यावेळेस एका विशिष्ट धर्माचा संबंध सातत्यानं चर्चेत यायचा, त्यामुळे 'हिंदू दहशतवाद' हा सुशीलकुमार शिंदेंनी जो शब्द उच्चारला, तो सिद्ध करण्यासाठी हे सारे प्रयत्न झाले, असं अमितभाईंनी सांगितलं," तावडे प्रज्ञा सिंग यांच्या उमेदवारीबद्दल बोलतांना म्हणाले.
पण मग हेमंत करकरेंनी केलेला तपास चुकीचा होता का, या उपप्रश्नावर मात्र तावडे म्हणाले की, "ते आता कोर्टात ठरेल. कोर्ट जे निर्णय देईल त्यावेळेस ते ठरेल. करकरेंचं कसाबशी लढतांना शहिद होणं हा मुद्दा पूर्ण वेगळा आहे आणि मालेगाव प्रकरणात त्यांनी जो काही तपास केला आहे आणि पुरावे आणलेले आहेत, ते कोर्टात तपासले जातील. करकरेंच्या तपासामुळे नाही, पण सरकार गोवतं आणि मग अधिकारी तपास करतात. ती एक राजकीय खेळी होती आणि तिच्यामुळे साध्वीजींना यात गोवलं गेलं. सरकार अशा पद्धतीनं केस उभी करतं की त्या उभ्या असलेल्या केसच्या आधारे अधिकारी चौकशी करतात. करकरे साहेब आपलं कर्तव्य करत होतं."
"जी युती घोषित झाली त्यात विधानसभेला ज्या मित्रपक्षांना ज्या जागा सोडायच्या आहेत त्या सोडून उरलेल्या जागा सेना-भाजपाला निम्म्या निम्म्या करायच्या आणि सत्तेमध्ये निम्मा वाटा ठेवायचा असं ठरलं. आता सत्तेत निम्मा वाटा म्हणजे मंत्रिपदं निम्मी निम्मी, मुख्यमंत्रिपद निम्मं निम्मं याचं डिटेलिंग मला माहीत नाही, पण सत्तेत निम्मा वाटा म्हणजे मंत्रिपदं निम्मी असा असू शकेल," तावडे म्हणाले.
पण म्हणजे मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षं असेल असं ठरलं आहे का? या मुद्द्यावरून युतीची घोषणा झाल्यावर लगेचच भाजपा-सेनेमध्ये वाद झाला होता. "मला वाटतं त्याविषयीची चर्चा झाली नाही. त्याविषयी अजून काही ठरलेलं नाही. त्याबद्दल जर काही निर्णय झाला असता तर आम्हाला कोअर कमिटीला सांगितला गेला असता," असं तावडे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)