आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्सच्या विजयामुळे बिघडलं आयपीएलचं गणित

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्स विजयाच्या उंबरठ्यावर असताना राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला.

राजस्थान रॉयल्सनं 19.4 ओव्हर्समध्ये विजयासाठी लागणाऱ्या 176 धावांचा टप्पा 7 विकेट्स गमावून पार पाडला.

राजस्थानकडून खेळणाऱ्या रियान परागनं 47, अजिंक्य रहाणेनं 34 आणि आर्चरनं नाबाद 27 धावा केल्या.

पण सुरूवातीला फलंदाजी करताना कोलकाता नाईटरायडर्सनं कॅप्टन दिनेश कार्तिकच्या नाबाद 97 धावांच्या जोरावर 20 ओव्हर्समध्ये 175 धावा केल्या. यात त्याला नीतीश राणाच्या 21 धावांचीही मदत झाली. त्याबदल्यात कोलकातानं सहा विकेट्स गमावल्या.

या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थानला विजयासाठी 9 धावांची गरज होती.

जोफ्राचा जोर

शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थानच्या जोफ्रा आर्चर स्ट्राईकवर होता तर समोर होता कोलकाताचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा.

कृष्णाच्या पहिल्या शॉर्ट पिच बॉलवर आर्चरनं फ्रंटफूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॉल बॅटच्या किनाऱ्याला लागून स्लीपमध्ये असलेल्या फिल्डरच्या डोक्यावर थेट सीमेपार गेला.

आता राजस्थानला विजयासाठी 5 चेंडूत 5 धावा हव्या होत्या. दुसरा चेंडूवर आर्चरनं थेट षटकार ठोकून विजय साजरा केला.

जोफ्रा आर्चरनं केवळ 12 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 27 धावा केल्या.

खरंतर राजस्थानच्या विजयात युवा बॅट्समन रियान परागनं महत्त्वाची भूमिका बजावली.

त्याने केवळ 31 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 47 धावा कुटल्या.

पण आंद्रे रसेलच्या बॉलवर तो हिटविकेट झाला.

रियान पराग जसा आऊट झाला तसा राजस्थानचा कॅप्टन स्टिव स्मिथनं डोकं पकडलं. तो निराश झाला.

कदाचित मॅच हातातून गेल्याचं स्टिवला वाटलं.

पण जोफ्रा आर्चरनं दमदार खेळी करून संघाला विजयी केलं.

रियान पराग कोण आहे?

रियान परागची खेळी महत्त्वाची यासाठी आहे कारण एक वेळ अशी होती राजस्थाननं 6 विकेट्स गमावल्या होत्या आणि 15.2 ओव्हर्सनंतर त्यांचा स्कोअर केवळ 126 होता.

आणि जसं की आयपीएलमध्ये आपल्याला कायम बघायला मिळतं की शेवटच्या तीन-चार ओव्हरमध्ये मॅचचं पूर्ण चित्र बदलून जातं.

दुसरीकडे कोलकाताची टीम विजयाच्या उंबरठ्यावर उभी होती. पण 17 व्या ओव्हरमध्ये मिळालेल्या 15 आणि 18 व्या ओव्हरमध्ये मिळालेल्या 13 धावांनी मॅचचं पारडं राजस्थानच्या बाजूनं फिरवलं.

त्यामुळेच रियान पराग आहे तरी कोण याची चर्चा तर होणारच.

रियान पराग आसामचा खेळाडू आहे. तो अजून 18 वर्षांचाही नाहीए.

मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघाविरोधात त्यानं 29 चेंडूत 43 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. ज्यात पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. आणि त्यानंतर रियान चर्चेत आला.

रियान परागला राजस्थाननं आयपीएलच्या बोलीत केवळ 20 लाखाला खरेदी केलं आहे.

आता गुरूवारच्या विजयानंतरही राजस्थान रॉयल्स सातव्या स्थानावर आहे. एकूण 11 सामन्यांपैकी 7 सामने राजस्थाननं जिंकलेत, तर 4 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

राजस्थाननं कोलकाताचा पराभव करून त्यांचा प्लेऑफमध्ये खेळण्याचा मार्गही कठीण करून ठेवला.

आता 11 मॅचेसनंतर कोलकातानं केवळ 4 सामने जिंकलेत. तर सात वेळा पराभव पत्करावा लागलाय.

अर्थात या खराब कामगिरीमुळे कोलकाताचे फॅन्स आणि मालक शाहरूख खान निराश असणार आहेत. कारण कोलकाताची टीम ही सर्वात संतुलित टीम मानली जात होती.

दोन आठवडे टॉपवर राहिल्यनंतर कोलकाताची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा सर्वाधिक होती.

ही तीच टीम आहे जिनं पहिल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादला सहा विकेट्सनं पराभूत केलं. शिवाय पंजाबला धोबीपछाड देऊन विजयी अभियान सुरू केलं.

अर्थात त्यानंतरच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये त्यांना दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. पण पुढच्याच सामन्यात बंगलोरला नमवून त्यांनी त्याचा बदलाही घेतला.

कोलकाताची समीकरणं बिघडली

यानंतर कोलकातानं राजस्थानला आठ विकेट्सनं हरवलं. इथवर कोलकाताचा प्रवास आकर्षक होता. पण यानंतरच्या सलग सहा पराभवांनी कोलकाताची सगळी गणितं बिघडली.

खरंतर कोलकाताचा कॅप्टन दिनेश कार्तिकनं एकट्याच्या बळावरच सगळ्या आशा पल्लवित ठेवल्याचं दिसतंय.

त्यानं 50 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीनं 97 धावा केल्या.

हा कार्तिकचा आयपीएलमधला सर्वाधिक स्कोअर आहे. दिनेश कार्तिकला आयपीएलच्या 11 मॅचेसमध्ये केवळ 214 धावा बनवता आल्या.

याआधी दिल्लीविरोधात त्यानं अर्धशतकी खेळी करून चाहत्यांची मनं जिंकली होती. पण त्याशिवाय इतर सामन्यांमध्ये त्याला आपली जादू दाखवता आली नाही.

कोलकाताच्या पराभवामुळे आयपीएलचं गणितही बिघडलंय. त्यामुळे कुठली टीम कुठे असेल हे कळण्यासाठी आणखी दोन-तीन मॅचची वाट बघावीच लागेल.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नई सुपरकिंग्ज 11 पैकी 8 सामने जिंकून 16 अंकांसह आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.

दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे. दिल्लीनं 11 पैकी 7 सामने जिंकलेत. त्यांच्या खात्यात 14 गुण आहेत.

तिसऱ्या स्थानावर 10 पैकी 6 मॅच जिंकलेल्या मुंबई इंडियन्सचा नंबर लागतो. त्यांच्याकडे 12 गुण आहेत.

चौथ्या स्थानावर 10 पैकी 5 मॅच जिंकलेल्या हैदराबादचा नंबर लागतो.

तर पाचव्या स्थानावर पंजाबची टीम आहे.

कोलकाता, राजस्थान आणि बंगळुरूनं 11 पैकी 4 मॅचेस जिंकल्या आहेत. पण धावांच्या सरासरीमुळे ते अनुक्रमे सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत.

शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. त्या निकालातूनही पुढची गणितं स्पष्ट होण्यास मदत होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)