You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL : विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भाग्य बदलणार का?
- Author, आदेश कुमार गुप्त
- Role, क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
सलग सहा सामने हरल्यामुळे टीकेचा सामना करावा लागलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शनिवारी आयपीएल-12 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला.
अत्यंत रोमहर्षक सामन्यात बंगळुरूनं किंग्ज इलेव्हन पंजाबला आठ विकेट्सनं हरवलं. बंगळुरूसमोर विजयासाठी 174 धावांचं लक्ष्य होतं. एबी डिव्हिलियर्सनं केलेल्या नाबाद 59 धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या 67 धावांच्या जोरावर बंगळुरूनं 19.2 धावात विजयाचं लक्ष्य पूर्ण केलं.
बंगळुरूच्या या विजयानं क्रिस गेलची नाबाद 99 धावांची खेळी झाकोळली गेली. गेलनं 64 चेंडूंमध्ये 99 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. नाणेफेक हारल्यानंतर पंजाबची टीम पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरली. 20 ओव्हर्समध्ये पंजाबनं चार विकेट्स गमावून 173 धावा केल्या.
आयपीएल-12 मधला पहिला विजय नोंदवल्यानंतर बंगळुरू उरलेल्या मॅचेसमध्येही चांगली कामगिरी करणार की आपल्या एखाददुसऱ्या विजयानं इतर संघांचं गणित बिघडवणार, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.
हा प्रश्न बंगळुरूनं स्वतःचं निर्माण केला आहे. ज्या संघाचा कर्णधार जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज विराट कोहली आहे, त्या संघाला एका विजयासाठी एवढा संघर्ष करावा लागतो, हे विशेष आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड कपसाठी विराट कोहली भारताचं नेतृत्व करत आहे.
आरसीबी सुपर फोरमधून बाहेर
या प्रश्नाचं उत्तर देताना क्रिकेट समीक्षक अयाज मेमन सांगतात, की या विजयामुळं बंगळुरूचा उत्साह वाढला तरी हा संघ आयपीएलमधून जवळपास बाहेरच पडला आहे. आकड्यांच्या गणिताचा विचार केला, तर आयपीएलमध्ये बंगळुरूचं आव्हान अजूनही कायम आहे. मात्र वास्तवाच्या आधारे विचार केला तर बंगळुरूचं आयपीएल-12 मधलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
अयाज मेमन पुढे सांगतात, "रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आता सुपर फोरच्या स्पर्धेत असलेल्या संघांच्या विजयामध्ये आडकाठी आणू शकेल."
या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या. पण किमान शनिवारी रात्री तरी विराट कोहलीला शांत झोप लागली असेल. कारण याआधीच्या सलग सहा पराभवांमुळे विराटची काळजी चांगलीच वाढली होती.
संघ म्हणून आरसीबी अजिबातच वाईट नाही. त्यामुळेच त्यांची वाईट कामगिरी अधिक त्रासदायक होती, असं अयाज मेमन यांचं म्हणणं आहे. बंगळुरूच्य़ा टीममध्ये विराट कोहलीसोबत एबी डिव्हिलियर्स, मारकस स्टोइनिस, मोईन अली आणि युजवेंद्र चहलसारखे खेळाडूही आहेत.
चांगले खेळाडू असूनही या संघासमोर काही समस्याही होत्या. बॅटिंग ऑर्डर योग्य नसणं, कमकुवत गोलंदाजी तसंच विराट कोहलीच्या नेतृत्वातील चुका बंगळुरूच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं अयाज मेमन यांनी म्हटलं. या टीमचं नशीबही चांगलं नव्हतं.
शनिवारी बंगळुरूच्या विजयानंतर एखादं कोडं सुटल्यासारखं वाटलं, असं अयाज मेमन यांनी म्हटलं.
आता पुढे काय होणार?
या प्रश्नाचं उत्तर देताना अयाज मेमन सांगतात, की पुढचा प्रवास आरसीबीसाठी तितका सोपा नाहीये. कारण बंगळुरूनं अगदी 15 ओव्हर्समध्ये विजय मिळवला, असं काही घडलं नाही किंवा गोलंदाज पंजाबला खूप कमी धावांमध्ये रोखू शकले नाहीत. विराट कोहलीलाही या गोष्टीची कल्पना आहे.
अयाज मेमन सांगतात, की विराट कोहलीच्या कर्णधारपदाचं वैशिष्ट्यं म्हणजे विजय आणि पराभव दोन्ही तितक्याच सहजतेनं स्वीकारणं. विजयानंतर विराट खूप आनंद व्यक्त करत नाही. पराभवाची जबाबदारीही तो सर्वांत आधी स्वतःवर घेतो आणि विजयासाठी अजून काय करता येईल, याचा विचार करतो.
सध्या तरी संघाच्या पहिल्या विजयानंतर विराट कोहलीचा मूड बदललेला दिसतोय. विजय मिळाल्यावर विराटनं पंजाबचा कर्णधार आर. अश्विनला मिठी मारली आणि शांतपणे सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केलं.
याच विराट कोहलीला मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुरूगन अश्विननं कॅच घेत बाद केलं होतं. त्यावेळी मैदानातून बाहेर जाताना विराट कोहली स्वतःशीच पुटपुटत राग व्यक्त करत होता. त्याची भाषा फारशी सभ्य नव्हती.
जे झालं ते झालं. पण या विजयानंतर बंगळुरूच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं हे नक्की. कारण मैदानात विजयाइतकं महत्त्वाचं काहीच नसतं.
आता सोमवारी बंगळुरूचा पुढचा सामना वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्ससोबत असेल. या मॅचनंतर खऱ्या अर्थानं हे स्पष्ट होईल की बंगळुरूचा पंजाबवरचा विजय योगायोग होता की नव्हता. दुसरीकडे मुंबईला हे माहिती आहे, की बंगळुरूची टीम आता विजयासाठी सर्वस्व पणाला लावून खेळेल.
एकूणच यामुळे आयपीएलमधली चुरस अजून वाढेल, हे नक्की.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)