You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2019 - RCB v DC: विराट कोहली बेंगळुरूच्या सलग सहा पराभवांमुळे टीकेचं लक्ष्य
IPL 2019मध्ये पराभवाची मालिका सुरूच राहिल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीवर टीका होऊ लागली आहे.
इंग्लंडमध्ये होणारा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. यंदा भारताचं नेतृत्व विराट कोहली करणार आहे. मात्र वर्ल्डकपपूर्वी सुरू असलेल्या IPL स्पर्धेत कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला सलग सहा सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सलग सहा पराभवांमुळे बेंगळुरू संघाला बाद फेरीत प्रवेश मिळणं अवघड आहे.
या पार्श्वभूमीवर कोहलीच्या नेतृत्वावर टीका होऊ लागली आहे. कोहली सलग 12 वर्षं बेंगळुरूचा संघाचा भाग आहे. अकरा हंगामात एकदाही बेंगळुरूला जेतेपद पटकावता आलेलं नाही.
यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी भारताची माजी खेळाडू गौतम गंभीरने विराटच्या नेतृत्वावर टीका केली होती. "कोणत्याही जेतेपदाविना विराटला कर्णधारपदी राहायला मिळतंय हे नशीबच आहे," अशा शब्दांत गंभीरने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
"यंदा (IPLमध्ये) कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न असेल," असं कोहलीने म्हटलं होतं. मात्र सहा सामन्यांनंतर कोहली आणि बेंगळुरू संघाचं नशीब रुसलेलं दिसत आहे.
IPL स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे - 169 सामन्यांमध्ये 38.15च्या सरासरीने 5151 धावा. IPL कारकिर्दीत विराटच्या नावावर 4 शतकं आणि 35 अर्धशतकं आहेत.
पण वैयक्तिक कामगिरी इतकी दमदार असली तरी बेंगळुरूला जेतेपद मिळवून देण्यात कोहली अपयशी ठरला आहे.
IPLमधील सगळ्यात महागड्या संघांमध्ये बेंगळुरूचा समावेश होतो. बेंगळुरूतर्फे खेळांडूवर मजबूत पैसा खर्च केला जातो. मात्र जेतेपदाने त्यांना सातत्याने हुलकावणी दिली आहे.
यंदाच्या हंगामात कोहलीला पूर्णपणे सूर गवसलेला नाही. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये कोहलीची कामगिरी 41, 84, 23, 3, 46, 6 अशी राहिली आहे.
दुसरीकडे, अनुभवी आणि 360 डिग्री फटकेबाजी प्रसिद्ध एबी डीव्हिलियर्सची बॅट शांत आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात चेन्नईविरुद्ध बेंगळुरूचा 70 धावांतच खुर्दा उडाला होता.
बेंगळुरूची खरी समस्या गोलंदाजीची आहे. कोलकाताविरुद्ध बेंगळुरूच्या गोलंदाजांना 200 धावांचाही बचाव करता आला नाही. उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज यांच्यासह कॉलिन डी ग्रँडहोम, प्रयास राय बर्मन, मोईन अली या सगळ्यांना धावा रोखणं आणि विकेट्स मिळवणं या दोन्ही आघाड्या सांभाळता आलेल्या नाहीत.
"आम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. दरवेळी पराभव झाल्यानंतर सबबी देता येणार नाहीत. आम्हाला चांगला खेळ करता आलेला नाही. यंदाच्या हंगामात आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करू शकलेलो नाही. प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखायला हवी. गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा माझा प्रयत्न नाही. खेळाचा आनंद घेऊन चांगलं खेळणं आवश्यक आहे," असं कोहलीने पराभवानंतर बोलताना सांगितलं.
कोहलीने कर्णधारपद सोडावं आणि विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळावं, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पराभवाच्या छायेत असणाऱ्या बेंगळुरूचा नेतृत्व करणारा कोहली टीम इंडियाची धुरा कशी सांभाळणार, असाही सवाल अनेक माजी क्रिकेटपटूंनी केला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही एका ट्वीटमध्ये "भारताने मोठ्या वर्ल्डकप सामन्यापूर्वी विराट कोहलीला विश्रांती द्यावी," असा सल्ला भारतीय क्रिकेट टीम व्यवस्थापनाला दिला आहे.
ट्विटरवरही तसा सूर उमटताना दिसतोय -
दरम्यान, रविवारी झालेल्या लढतीत बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 149 धावांची मजल मारली. कोहलीनेच सर्वाधिक 41 धावा केल्या. दिल्लीतर्फे कागिसो रबाडाने 21 धावांत 4 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रेयस अय्यरच्या 67 धावांच्या खेळीच्या बळावर दिल्लीने 4 विकेट्सनी सामना जिंकला. रबाडाला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
रविवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थानचा रॉयल्सचा धुव्वा उडवला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 139 धावा केल्या. स्टीव्हन स्मिथने 7 चौकार आणि एका षटकारासह 73 धावांची खेळी केली. कोलकाताकडून हॅरी गुर्नेने 2 विकेट्स घेतल्या.
ख्रिस लिन (50), सुनील नरीन (47) आणि रॉबी उथप्पा (26) यांच्या बळावर कोलकाताने जवळपास 7 ओव्हर्स आणि 8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. गुर्नेला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)