India VS Australia: धोनी पुन्हा ठरला मॅचविनर, भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी मात

महेंद्र सिंह धोनी आणि केदार जाधव यांनी पाचव्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी करत हैदराबाद येथे झालेल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 237 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. भारताने 48.2 ओवर्समध्ये सहा गडी राखून हे उद्दिष्ट पूर्ण केलं.

भारताकडून केदार जाधवने सर्वाधिक 81 धावा केल्या. धोनीने 59 धावा केल्या.

कर्णधार विराट कोहलीने 44 तर रोहित शर्माने 37 धावांचं योगदान दिलं. दोन टी-20 सामन्यात भारताचा 2-0 असा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळत आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 50 ओवर्समध्ये 7 विकेट गमावून 236 धावा केल्या.

भारतीय संघाकडून जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. केदार जाधवने एक विकेट घेतली.

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फिरकी गोलंदाज अश्टन टर्नरला एकदिवसीय सामन्यामध्ये पदार्पणाची संधी दिली. त्याचवेळी कर्णधार एरॉन फिंचचा हा 100 वा सामना होता.

फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो खातेही उघडू शकला नाही.

फिंचची खराब खेळी

फिंचचा फॉर्म गेली काही दिवस बिघडला आहे. जून 2018ला त्याने इंग्लड विरोधात शतक झळकवलं होतं. पण त्यानंतर आठ वनडेमध्ये त्याने फक्त 83 धावा केल्या आहेत.

वनडे सिरीजच्या आधी झालेल्या टी20मध्ये दोन सामन्यात फिंचची खेळी खराब राहिली. दोन सामन्यात त्याने 0 आणि 8 धावा केल्या.

2013मध्ये वनडे क्रिकेटमध्ये करिअर सुरू करणाऱ्या फिंचने 100 वनडेमध्ये 11 शतकं आणि 18 अर्धशतकांसह 3,444 धावा केल्या आहेत.

दुसऱ्या ओव्हरमध्ये फिंच बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट 21व्या ओव्हरमध्ये मार्कस स्टोईनिसच्या रूपात गेली. मार्कसला 37 धावांवर केदार जाधवने बाद केलं. त्यानंतर 24व्या ओव्हरमध्ये उस्मान ख्वाजा आणि 30व्या ओव्हरमध्ये पीटर हँडसकाँबला कुलदीप यादवने बाद केले. तर मोहम्मद शमीने 38व्या ओव्हरमध्ये एश्टन टर्नर (21)ला बाद केलं. ग्लेन मैक्सवेल 40व्या ओव्हरमध्ये शमीच्या चेंडूवर बादल झाला, त्यानंतर ऑस्ट्रेलियला मोठी धावसंख्या उभारण्याची आशा सोडावी लागली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)