You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंच्या व्यासपीठावर 'भाजप'च्या जाहिरातीतील कुटुंब
1. भाजपच्या जाहिरातीतील कुटुंब मनसेच्या व्यासपीठावर
आपल्या प्रचारसभांमधून राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीका करत आहेत. सभेमध्ये ते व्हीडिओ लावून पंतप्रधान आधी काय बोलले आणि आता काय बोलतात हे दाखवतात. पण काल राज ठाकरे यांनी चक्क एका कुटुंबालाच व्यासपीठावर बोलवलं.
भाजपच्या आयटी सेलने एका जाहिरातीत एका कुटुंबाच्या घरगुती फोटोचा वापर केला. भाजपच्या धोरणांमुळे यांची गरीबी गेली असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. या जाहिरातीमध्ये केलेला दावा आणि या कुटुंबाची वस्तुस्थिती वेगळी आहे असं राज यांनी सांगितलं. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.
सभा झाल्यानंतर या कुटुंबाने माध्यमांशी संवाद साधला. आमचा फोटो भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात आहे हे कळल्यावर आम्हाला धक्का बसला. असं त्या कुटुंबाच्या प्रमुखाने म्हटलं.
मोदी फॉर न्यू इंडिया हे फेसबुक पेज भाजपचं अधिकृत पेज नाही. पण भाजपच्या पाठिंब्यावर हे पेज चालवलं जातं असं राज यांनी आपल्या सभेत स्पष्ट केलं.
या पेजवर भाजपच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्या जातात आणि या पेजचे एकूण 13 लाख फॉलोअर्स आहेत.
2. एका मतदारासाठी उभारलं मतदान केंद्र, मतदान 100%
देशातल्या मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा म्हणून निवडणूक आयोग नेहमीच तत्पर असतं. केवळ एका मतदारासाठी देखील पूर्ण यंत्रणा काम करू शकते याचं उदाहरण कालच्या एका घटनेवरून समोर आलं.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार गुजरातच्या गीर अभयारण्यात फक्त एका मतदारासाठी हे केंद्र उभारण्यात आले होते. भरतदास दर्शनदास असे या मतदाराचे नाव आहे. जुनागढ क्षेत्रात येणाऱ्या गीर अभयरण्याच्या बनेज या गावात ते राहतात. या भागात एक शिवमंदिर आहे तिथले ते पुजारी आहेत. जर आयोगाने या ठिकाणी मतदान केंद्र उभारलं नसतं तर भरतदास यांना 20 किमी प्रवास करावा लागला असता.
या भागात त्यांच्याशिवाय अन्य कोणताही मतदार नाही. तरीही निवडणूक आयोगाने फक्त त्यांच्यासाठी गीर अभयारण्यात मतदान केंद्र उभारले.
सरकारने एकट्या माणसासाठी इतका खर्च केला असं ते म्हणाले. मी या ठिकाणी मतदान केलं आणि या केंद्राचं मतदान 100% टक्के झालं आहे असं ते म्हणाले.
3. भोपाळमधून भाजपच्या 'डमी' उमेदवाराचा अर्ज दाखल
भाजपचे भोपाळचे खासदार आलोक संजर यांनी मंगळवारी या मतदारसंघातून डमी उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. अयोध्येतील बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपच्या येथील अधिकृत उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार संजर यांनी डमी अर्ज दाखल केला आहे. हे वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी, अयोध्येतील बाबरी मशिदीचा घुमट पाडण्यात आपलाही सहभाग होता आणि याचा आपल्याला अभिमान वाटतो, असे विधान नुकतेच एका मुलाखतीत केले होते. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने प्रज्ञासिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना सोमवारी दिले होते.
4. सरन्यायाधीशांच्या आरोपावरील सुनावणीसाठी तीन सदस्यीय पीठाची स्थापना
सरन्यायाधीश तरुण गोगोई यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप महिलेनी केल्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तीन सदस्यीय पीठाची स्थापना करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती एस. ए. बोबडे या प्रकरणावर सुनावणी करतील. न्या. बोबडे हे सुप्रीम कोर्टातले सर्वांत ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा आणि इंदिरा बॅनर्जी हे दोघे न्या. बोबडेंसोबत प्रकरणाचं कामकाज पाहणार आहेत. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.
5. राहुल गांधी यांची अमित शाह आणि त्यांच्या पुत्रावर टीका
मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. खूनाचा आरोप (Murder Accused) असणारे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष अमित शाह आहेत. "वाह! क्या शान है!" शाह यांचे पुत्र जय शाह हे जादूगार आहेत असं ते म्हणाले. तीन महिन्यात जय शाह यांनी ५० हजार रुपयांचे ८० कोटी केलेत, असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ही बातमी टाइम्स नाऊने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)