You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश, गुरूदासपूरमधून निवडणूक लढविणार
भाजपनं अभिनेते सनी देओल यांना पंजाबच्या गुरुदासपूर येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
याशिवाय चंदीगड येथून विद्यमान खासदार किरण खेर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपनं विद्यमान खासदार उदित राज यांचं तिकूट कापून त्यांच्याऐवजी गायक हंसराज हंस यांना उत्तर पश्चिम दिल्लीतून उमेदवारी दिली आहे.
अभिनेते सनी देओल यांनी मंगळवारी दुपारी राजकारणात एन्ट्री घेतली. आपण बोलण्यापेक्षा आता काम करण्यावर भर देऊ, असं देओल भाजपप्रवेशावेळी म्हणाले.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह भाजपचे अन्य नेते यावेळी उपस्थितीत होते.
दोन दिवसांपूर्वीच सनी देओल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दलचे अंदाज लावले जात होते.
'देशाला मोदींची गरज'
"पंतप्रधान मोदींनी देशासाठी खूप काही केलं आहे. पुढची पाच वर्षंही देशाला त्यांच्याच नेतृत्वाची गरज आहे. कारण आपल्याला पुढं जायचं आहे. विकास करायचा आहे," अशी भावना सनी देओल यांनी आपल्या पक्ष प्रवेशाच्यावेळेस व्यक्त केली.
"माझे व़डील अटलबिहारी वाजपेयींसोबत राहिले होते. त्याचप्रमाणे मीसुद्धा कायम नरेंद्र मोदींसोबत राहीन," असंही सनी देओल यांनी यावेळी बोलताना म्हटलं.
सनी देओल आणि देशभक्ती
सनी देओल यांचा पक्षात प्रवेश होणार असल्याचं समजल्यानंतर मला त्यांच्या बॉर्डर चित्रपटाची आठवण आली. हा चित्रपट राष्ट्रवादाचं उदाहरण असल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. अनेक लोकप्रिय भूमिका साकारणाऱ्या सनी देओल यांना लोकांची नस अचूक माहिती असल्याचंही सीतारमण यांनी म्हटलं.
पीयूष गोयल यांनी म्हटलं, "सनी देओल यांनी विविध चित्रपटांतून देशप्रेमाची भावना जागवली आहे. तरूणांचं मनोबल वाढवलं आहे. श्रीलंकेतील हल्ला, भारतात कट्टरपंथी विचारांची होणारी चर्चा या सर्व पाश्वर्भूमीवर तरूणांच्या विचारांना दिशा देण्याचं काम सनी देओल करू शकतील. ज्या निष्ठेनं, श्रमानं त्यांनी चित्रपटात काम केलं. त्याच मेहनतीनं देशाची सेवा करतील."
सनी देओल यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी
सनी देओल यांचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र हेदेखील भाजपचे खासदार होते. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत धर्मेंद्र राजस्थानच्या बिकानेरमधून निवडून आले होते.
2009 साली मात्र ते राजकारणातून दूर झाले. धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी या 2014 मध्ये मथुरेमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. आताही त्या मथुरेमधूनच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींचा प्रचारही केला होता.
1982 साली प्रदर्शित झालेल्या 'बेताब' या चित्रपटातून सनी देओल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 1990 मध्ये आलेल्या 'घायल' या चित्रपटानं त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. 1993 साली आलेल्या 'दामिनी' चित्रपटातील सनी देओल यांची वकिलाची भूमिकाही गाजली होती. बॉर्डर, गदर , हिरो यासारख्या चित्रपटांमधून सनी देओल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)