You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सपना चौधरी: काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, कधी करणारही नाही' - लोकसभा 2019
"मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही आणि ना भविष्यात कधी प्रवेश करेन," असं सपना चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.
सपना चौधरी या हरियाणातल्या प्रसिद्ध डान्सर आणि गायिका आहेत. त्यांना युट्यूब सेंसेशन समजलं जातं. फेसबुकवर त्यांचे 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हरियाणाची लोकगीतं गाण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. या गाण्यांवरील डान्ससाठी त्यांना अनेक राजकीय तसंच सामाजिक कार्यक्रमांमध्ये विशेष मान आणि मागणी आहे.
त्यामुळे त्या काँग्रेसमध्ये सामील होऊन मथुरा येथून निवडणूक लढवणार आहेत, अशी बातमी सोमवारी आली, तेव्हा सर्वांच्या भूवया उंचावल्या.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनीसुद्धा तसं एक ट्वीट करून चौधरी यांचं पक्षात स्वागत केलं. या फोटोमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबरोबर सपना चौधरी आणि आणखी एक व्यक्ती दिसत आहे.
या बातमीनंतर राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं होतं. कारण मथुरा या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अभिनेत्री हेमा मालिनी करत आहे. यामुळे सपना आणि हेमा अशी कलाक्षेत्रातील दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये ही निवडणूक होईल, अशी चर्चा होती.
पण सपना यांनी रविवारी दुपारी एक पत्रकर परिषद घेत या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला. "माझं कोणतंही अधिकृत ट्विटर अकाउंट नाहीये. प्रियंका गांधींसोबत माझा जो फोटो व्हायरल होत आहे, तो जुना आहे. मी त्यांना कधी भेटले होते, हे मला आता आठवतही नाही. तसंच मी राज बब्बर यांनाही कधी भेटलेली नाही," असं त्या यावेळी म्हणाल्या.
राजकारणाविषयीचे प्रश्न विचारल्यानंतर सपना यांनी म्हटलं की, "मी एक कलाकार आहे आणि मला माझ्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न तेवढे विचारा. पण मी राजकारणात यावं अशी जर तुम्ही इच्छा असेल तर तुमच्या तोंडात साखर, मी एक दिवस नक्कीच नेता होणार."
"माझं वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे आणि यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मी काँग्रेस तसंच इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र त्यानंतर सपना चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असं दाखवणारा काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा एक फॉर्म ANI वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे, म्हणून यावरून गोंधळ कायम आहे.
दरम्यान, भाजपकडून काँग्रेसच्या या घोषणेवर हल्ला झाला आहे.
भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी सपना चौधरी यांच्या कथित काँग्रेस प्रवेशावर बोलताना, "राहुल गांधी यांची आई ईटलीमध्ये हेच काम करायची आणि आज सपनालाही त्यांनी स्वीकारलं आहे. ज्याप्रमाणे राजीव गांधींनी सोनिया गांधींना स्वीकारलं, राहुल गांधींनीही सपना यांना स्वीकारून नवीन कारकिर्दीला सुरुवात करावी," असं वादग्रस्त विधान केलं आहे.
"पण, भारताची जनता कधीच एका नतर्कीला देश चालवण्याची परवानगी देत नाही. राहुल यांनी आता नर्तकीवर विश्वास ठेवायला सुरुवात केलीय. सासू आणि सून एकाच परंपरेतील असतील तर काँग्रेसचं संचालन एकाच मार्गानं होईल," असंही ते पुढे म्हणाले.
यावर टीकाकारांना उत्तर देताना सपना चौधरी म्हणाल्या, "मला कुणी नाचनेवाली म्हणत असेल, तर मला त्याचा काही फरक पडत नाही. मी स्वत: म्हणते की मी एक डान्सर आहे. ती त्यांची मानसिकता आहे. मी इतकी लहान आहे, अशा लोकांना काय समजावणार?"
जेव्हा आत्महत्येचा विचार आला...
'सॉलिड बॉडी', 'छोरी भैंस बड़ी बिंदास' आणि 'तेरी आख्यां दा काजल' या गाण्यांमुळे सपना चौधरी यूट्यूब सेंशेशन बनल्या. आज त्यांचे फेसबुकवर 30 लाख तर इन्स्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
'वीरे दी वेडिंग' आणि 'नानू की जानू' या चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.
एकेकळी दररोज येणाऱ्या अश्लील मेसेजमुळे सपना यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता.
2016मध्ये एका गाण्यात दलित विरोधी शब्द वापरल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आणि गुरुग्राममध्ये त्यांच्याविरोधात एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. नंतर हे प्रकरण शांत झालं आणि त्यांना यातून वाचवण्यात आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)