You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा: अशोक चव्हाणांची व्हायरल झालेली क्लिप काँग्रेस हायकमांडला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्र काँग्रेसमधले अंतर्गत वाद आता जाहीरपणे ऐकायला मिळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि चंद्रपूर येथील एक काँग्रेस कार्यकर्ता यांच्यामधली संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
राजूरकर नावाचे कार्यकर्ते म्हणतात, "सर, चंद्रपूर येथून विनायक बांगडे यांना तिकीट जाहीर झालं आहे. चंद्रपूरमधून आपला उमेदवार खात्रीशीर आहे ना."
यावर चव्हाण म्हणतात, "तुम्ही जे म्हणताय ते तिकडे मुकूल वासनिकांशी बोलून घ्या. माझं पूर्ण समर्थन आहे. पण काही लोकांना समजत नाही. मी तुमच्याबरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये."
राजूरकर पुढे म्हणतात, "मुकूल वासनिक काहीच नाही ना सर तुमच्यापुढे, तुम्ही सगळा महाराष्ट्र सांभाळता."
यावर चव्हाण म्हणतात, "माझं इथं कुणी ऐकायला तयार नाही. मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे. तुम्ही जरा वासनिकांशी बोला, आमची बाजू मांडा."
चव्हाणांची सारवासारव
ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी हे आम्ही अशोक चव्हाणांना विचारलं.
ही खरी असल्याचं मान्य करत ते म्हणाले, "एखाद्या कार्यकर्त्याशी बोलणं, त्याच्या भावना समजून घेणं हे अध्यक्ष म्हणून माझं काम आहे. दोन्ही लोकांमध्ये झालेलं खासगी संभाषण जाहीर कसं होऊ शकतं, हे मला समजत नाहीये. मी असं काही जाहीर भाषणात बोललेलो नाही."
राजीनाम्यासंदर्भात विचाल्यावर ते म्हणाले, "मी कुठंही काही जाहीर भाष्य केलेलं नाही. कार्यकर्त्याच्या भावना समजून घेणं, तिथले विषय समजून घेणं हे अध्यक्ष म्हणून माझं कामच आहे. कार्यकर्ते फोन करतात, ते काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळेच करतात."
"लोकसभा तिकीट वाटपासंदर्भात मी हतबल असण्याचा विषय नाही, पण काही ठिकाणी मतांमध्ये भेद असू शकतात. विदर्भातले विषय मुकूल वासनिकांना माहिती आहेत, म्हणून त्यांच्याशी बोलायचा सल्ला मी कार्यकर्त्याला दिला," असं ते पुढे म्हणाले.
हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न?
या क्लिपमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर सांगतात, "अशोक चव्हाण पहिल्यांदाच हतबल असल्याचं दिसून येत आहेत. त्यांची ही हतबलता केवळ चंद्रपूरच्या जागेवरून नाही. तर नांदेडमध्येही त्यांना स्वत:ला लढायला सांगितलं आहे, पण त्यांची इच्छा दिसत नाहीये. औरंगाबादमध्ये त्यांनी सुभाष झांबड यांना तिकीट दिलं आणि मग यामुळे त्यांचे सहकारी अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी केली."
दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी म्हणतात, "हा चव्हाणांचा त्रागा असू शकतो. परंतु मी राजीनामा देतो असं त्यांनी म्हटलंय आणि तेही निवडणुकीच्या तोंडावर. अशा वेळेस त्यांनी त्यांचा इन्कारही केलेला नाही. महाराष्ट्र काँग्रेसचं दुर्दैव असं की, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील पक्षात आहेत की नाहीत, हे माहिती नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणतात, माझं कुणी ऐकत नाही. यातून लोकांमध्ये एक चुकीचा मेसेज जातो."
अशोक चव्हाणांसारखा ज्येष्ठ नेता एवढी मोठी गोष्ट एका अनोळखी कार्यकर्त्याशी फोनवर कशी बोलू शकतो, अशी शंकाही अनेकांनी उपस्थित केली आहे. आपले कॉल रेकॉर्ड होऊ शकतात, हे या माजी मुख्यमंत्र्याला ठाऊक नसेल का?
यावर वेंकटेश केसरी म्हणतात "चव्हाणांनी हे जाणीवपूर्वक केलं असेल किंवा ते अजाणतेपणी झालं असेल, परंतु त्यांनी त्याचा इन्कार केलेला नाही. मग ही अगतिकता आहे की हायकमांडला कोंडीत पकडण्यासाठीचा प्रयत्न आहे, हे कळायला मार्ग नाही. पण चव्हाणांचा उजवा हात मानला जाणारे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याची बातमी आहे. म्हणजे आता ही हायकमांडवर प्रेशर टॅक्टिक्स आणणं सुरू झालं आहे, अशीही शक्यता आहे."
हा कॉल तुम्ही जाणीवपूर्वक लीक केला का, असं विचारल्यावर अशोक चव्हाणांनी स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं.
'मुकूल वासनिकांवर गांधींचा विश्वास'
मुकूल वासनिक आणि गांधी कुटुंबीयांच्या संबंधांविषयी दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात, "मुकूल वासनिक हे भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. राजीव गांधींनी त्यांना अध्यक्ष केलं होतं. दलित समाजातले विदर्भातले ते होते. 1991मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर तर त्यांच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री होते. काँग्रेस सत्तेच्या बाहेर आले तेव्हा त्यांना जनरल सेक्रेटरी करण्यात आलं. अनेक वर्षं ते राजस्थानचे प्रभारी होते. त्यानंतर बुलडाणा आणि रामटेक येथून ते निवडणूक लढवायचे. त्यानंतर ते मनमोहनसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये होते. याशिवाय काँग्रेसचा विदर्भातला एक दलित चेहरा आणि तो फारसा मजबूत नाही आणि हायकमांडला त्यांच्यापासून काही धोका नाही, अशाप्रकारची त्यांची इमेज काँग्रेसमध्ये राहिलेली आहे."
ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांच्या मते, "मुकूल वासनिक हे गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्या जवळचे आहेत. राजीव गांधींनी त्यांना युवक काँग्रेसचा अध्यक्ष केल्यामुळे सोनिया गांधींचांही त्यांच्यावर विश्वास आहे. याशिवाय ते मागास प्रवर्गातून येतात. या सर्व बाबी बघितल्यास काँग्रेसमध्ये त्यांच्या मताला किंमत आहे."
चंद्रपूर मतदारसंघात काय परिस्थिती?
चंद्रपूर पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण गेल्या 3 निवडणुकांपासून भाजपचे हसंराज अहिर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.
गजानन जानभोर सांगतात, "चंद्रपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण आता तो भाजपकडे आहे. काँग्रेसने विनायक बांगडेंना उमेदवारी दिली. बांगडेंनी चंद्रपूरचं जिल्हाध्यक्षपद भूषवलं आहे. पण लोकसभेच्या उमेदवारीसाठी जी काही पात्रता हवी असते, ती त्यांच्यामध्ये नाहीये. त्यामुळे त्यांना विरोध होत आहे. बाळू धानोरकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. यावर्षी त्यांना सुरुवातीला काँग्रेसच्या काही नेत्यांनी शब्द दिला होता की, तुम्ही काँग्रेसमध्ये आलात तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊ, पण त्यांना उमेदवारी न दिल्यानं ते आता अपक्ष म्हणून लढत आहेत. त्यामुळे चव्हाणांच्या मनासारखं नांदेड आणि चंद्रपूरमध्येही होत नाहीये."
"मुकूल वासनिक विदर्भाचे आहेत. रामटेकमधून लढण्याचा त्यांना आग्रह होतो, तेव्हा जातीय समीकरण लक्षात घेता त्यांना चंद्रपूरमध्ये विनायक बांगडे उमेदवार म्हणून असणं आवश्यक आहे. कारण ते तेली समाजाचे आहेत आणि रामटेकमध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय तेली समाजाला यापूर्वी तिकीट मिळालं नव्हतं, तीही भरपाई होईल, असंही काँग्रेस श्रेष्ठींना वाटलं असेल," जानभोर पुढे सांगतात.
रामटेकचा काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर करण्यात आलेला नाही.
मुकूल वासनिक यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये बल्लारपूर, राजुरा, आरणी, वरोरा, चंद्रपूर आणि वाणी यांचा समावेश होतो.
भाजपचा पलटवार
अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत असा आरोप केला आहे की, भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे.
यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, "प्रत्यक्षात चव्हाण साहेबांनी चंद्रपूरमध्ये धानोरकरांना राजीनामा द्यायला लावला, त्यांना चंद्रपूरचं तिकीट देतो म्हणाले आणि त्यांना तिकीट दिलं नाही. तुम्हाला तुमची लोकं सांभाळता येत नाहीत, तुमचं कोणी ऐकत नाहीत, मग तुमच्याकडे का लोक राहतील."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)