शिवसेना भाजपची युती ही काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी फायद्याची की तोट्याची?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर त्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात याची सर्वत्र चर्चा आहे. ही युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे तर शिवसेना आणि भाजपची युती ही त्यांची गरज होती असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

"जर युती झाली नसती तर भाजप आणि शिवसेनेला आगामी निवडणूक फार कठीण गेली असती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला महाराष्ट्रात निवडणूक सोपी गेली असती. शिवसेना-भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा थेट लढती राज्यात होणार असल्यामुळे या लढती तुल्यबळ होतील," असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार प्रताब आसबे यांनी वर्तवला आहे.

युती झाली नसती तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी आव्हान सोपं होतं. पण आता चित्र बदललं असल्याचं आसबे सांगतात. "युती झाल्यामुळे शिवसेना-भाजपच्या पाठीशी असलेल्या शहरी मतदाराच्या मतदानात फूट पडणार नाही आणि त्याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसू शकतो. ग्रामीण भागात युतीविरोधात वातावरण आहे. त्याचा निश्चितच फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला होऊ शकतो. शहरातील नवमतदार वर्गाचा कल युतीकडेच आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात युतीचं पारडं जड राहू शकतं पण त्या ठिकाणी देखील अटीतटीच्या लढती होतील," आसबे सांगतात.

"पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पारडं जड राहील. त्यांचे जे पारंपारिक मतदारसंघ असतील ते त्यांना साथ देतील. सातारा, बारामती, माढा या ठिकाणी आघाडी पुढे दिसेल. पश्चिम महाराष्ट्रात काही जागा मिळाल्या तर मिळाल्या अशी युतीची अवस्था होऊ शकते," आसबे सांगतात.

'तुम्ही चोरावर मोर आहात का?'

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही 25 वर्षे एकत्र राहिलो आणि आताही पुढे राहू. मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका जिंकू असं फडणवीस म्हणत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या मते पराभवाच्या भीतीतूनच हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

"महाराष्ट्राची जनता या दोन्ही पक्षांना कंटाळली आहे. गेल्या साडेचार वर्षांत शेतकरी वर्ग चिडला आहे, दलितांवर अत्याचार वाढले आणि अल्पसंख्यांकांना डावललं जात आहे अशा परिस्थितीमध्ये युती झाली असती काय किंवा नसती काय त्यांचा पराभव निश्चितच आहे," असं मलिक यांना वाटतं.

"गेल्या साडे चार वर्षांत शिवसेनेनी भाजपविरोधात टीकेची झोड उठवली होती. 'चौकीदार चोर है' असं शिवसेना म्हणत होती मग तुम्ही चोरावर मोर आहात का?" असा सवाल मलिक यांनी विचारला. महाराष्ट्राची त्रस्त जनता या सरकारला धडा शिकवेल. त्यांचा पराभव हा निश्चित आहे," असं मलिक सांगतात.

'काँग्रेस-राष्ट्रवादीला आत्मविश्वास'

युतीचा परिणाम काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर होईल का? असा विचारला असता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत सांगतात, "युती झाली ते बरं झालं कारण त्यामुळे त्यांचा खरा चेहरा उघडा पडला. युतीबाबत जनमानसात गोंधळाची स्थिती होती. पण आता ते दोन्ही पक्ष एकत्र झाले आणि त्यांच्याबाबत जनतेच्या मनात तिरस्काराची भावना आहे. देशपातळीवर पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वातावरण आहे."

शहरी मतदार अजूनही भाजपच्या बाजूने आहे असं वाटतं का असं विचारलं असता सावंत म्हणाले, "शहरी मतदार हा परिपक्व असतो आणि त्यामुळे ते देखील त्यांची खेळी ओळखतील आणि येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव करतील."

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आत्मविश्वास वाटत आहे की राज्यात आघाडीच्या जास्तीत जास्त जागा येतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात गेल्या 5 वर्षांत NDA नी चांगलं काम केलं आहे तेव्हा NDAचीच पुन्हा सत्ता येईल.

शिवसेनेचा बचावात्मक पवित्रा

युतीमुळे शिवसेना भाजपचं नुकसान टळलं, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केलं आहे.

"शिवसेना भाजप युती झाली नसती तर हिंदू मतं विभागली गेली असती. हे मतांचं विभाजन टळेल. आतापर्यंत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा होता पण आता ते बचावात्मक झालेले दिसत आहे," उन्हाळे सांगतात.

"शिवसेनेला मतदारांना सामोरं जाणं अवघड जाऊ शकतं. भाजपसोबत प्रादेशिक पक्ष युती करण्यासाठी तयार नाहीत, अशी प्रतिमा तयार झाली होती. ती या युतीमुळे बदलून त्याचा फायदा भाजपला होईल," उन्हाळे सांगतात.

आघाडीच्या जमेच्या बाजू काय आहेत असं विचारलं असता उन्हाळे सांगतात, "काँग्रेसनं अद्याप तयारी सुरू केलेली नाही. त्यांचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत पण राष्ट्रवादीची तयारी मात्र वेगाने होताना दिसत आहेत. ते प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार देत आहेत. याचा निश्चितच राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)