लोकसभा 2019: निवडणुकीत मतदान केलं नाही तर खात्यातून 350 रुपये कापले जाणार? - फॅक्ट चेक

    • Author, सुप्रीत अनेजा
    • Role, फॅक्ट चेक टीम

लोकसभा निवडणुकांसाठी मतदान केलं नाही तर तुमच्या बँकेच्या खात्यातून 350 रुपये कापून घेतले जातील, असं सांगणारी एक बातमी सोशल मीडियावर पसरली आहे.

11 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरू होत असून ते 19 मे पर्यंत चालेल. 23 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येतील.

या बातमीचे कात्रण हजारो लोकांनी सोशल मीडियावर पाहिले असून त्याची सत्यता पडताळण्यासाठी आमच्या वाचकांनी त्याचा फोटो आमच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला आहे.

हा फोटो हिंदी वर्तमानपत्र 'नवभारत टाइम्स'ने विनोदांच्या स्तंभामध्ये होळीच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा असल्याचे आमच्या लक्षात आलं.

या बातमीत काय म्हटलं आहे?

जे लोक निवडणुकीत मतदान करणार नाहीत त्यांच्या आधार कार्डावरून माहिती काढली जाईल. त्यानंतर आधारशी जोडलेल्या तुमच्या बँक खात्यातून पैसे वजा केले जातील, अशी नोटीस निवडणूक आयोगाने काढल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

"एका व्यक्तीमागे 350 रुपये खर्च होत असल्यामुळे बँकेच्या खात्यातून ते वजा केले जातील. जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात 350 रुपये नसले तर ती व्यक्तीने मोबाईलचे रिचार्जिंग केल्यावर ते वजा होतील," असंही या बातमीत म्हटलं आहे.

इतकंच नाही तर निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाची आधीच परवानगी घेतली असल्यामुळे यासंदर्भात कोणतीही याचिका दाखल करून घेतली जाणार नाही, असंही या बातमीत नमूद करण्यात आलं आहे.

अर्थात ही सर्व माहिती केवळ गंमत म्हणून विनोदाच्या विभागामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात काहीही खरं नसल्याचंही शेवटी स्पष्ट होतं, कारण मजकुराच्या शेवटी 'बुरा ना मानो होली है!' असं त्यात लिहिण्यात आलं आहे.

अशीच गमतीशीर बातमी लोकमतनेही दिली होती, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलं.

'लोकमत'ची बातमी राजकीय लाभासाठी शेअर करत असल्याचं निदर्शनास आलंय. अर्थात, आपण सूज्ञ आहात. अशा चुकीच्या प्रचाराला तुम्ही बळी पडणार नाही, याची खात्री आहे. परंतु, कुणी या बातमीचा वापर अपप्रचारासाठी करत असेल, तर तुम्ही सत्य पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन आम्ही करू इच्छितो."

त्याचप्रमाणं आणखी एका बातमीत पाकिस्ताननं हाफिज सईदला भारताकडे सुपूर्द केल्याचं सांगण्यात आलं होतं. तर फरार आरोपी विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांनी आपलं पाप धुण्यासाठी कुंभमेळ्यात जाऊन अंघोळ केली, असं सांगणारी एक खोटी बातमीही प्रसिद्ध झाली होती.

पण या बातम्यांमध्ये आजिबात सत्यता नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)