You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'टिक टॉक'वर बंदी: या अॅपमुळे सेलिब्रिटी बनलेल्या लोकांना सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविषयी काय वाटतं?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
वीस वर्षांच्या विष्णूप्रियाने आजवर एकाही चित्रपट किंवा मालिकेत काम केलेलं नाही. पण तिच्या चाहत्यांची संख्या 25 लाखांच्यावर आहे.
"मला स्कार्फ बांधल्याशिवाय बाहेर जाताच येत नाही. माझ्या घराबाहेर नेहमी तरुणांची गर्दी असते आणि कित्येक मुलांना माझ्याबरोबर ड्युएट साँग करायचं असतं," विष्णूप्रिया सांगते.
जिथेही जाईल तिथं चाहते गराडा घालतात असा तिचा अनुभव आहे. कारण विष्णूप्रिया एका अर्थाने सेलिब्रिटीच आहे, एक टिक टॉक सेलिब्रिटी.
औरंगाबादमध्ये राहणारी विष्णूप्रिया सध्या बी. कॉम प्रथम वर्षाला आहे. मित्र-मैत्रिणींकडून 'टिक टॉक'बद्दल कळल्यानंतर तिने त्याचं अॅप डाउनलोड केलं आणि व्हीडिओ टाकायला सुरुवात केली.
"मी व्हीडिओ टाकत गेले आणि 'खुदा की इनायत' या गाण्यानंतर माझ्या फॉलोअर्सची संख्या अचानक वाढली," विष्णूप्रिया सांगते. हा व्हीडिओ हिट झाल्यावर विष्णूप्रिया अक्षरशः रातोरात स्टार बनली. तिच्या घराबाहेर शेकडो तरुण जमा झाले आणि 'आम्हाला विष्णूप्रियासोबत ड्युएट साँग करायचंय,' असं म्हणू लागले.
विष्णूप्रियाला जे स्टारडम मिळालंय ते टिक टॉकमुळेच. विष्णूप्रियाप्रमाणेच भारतात असे अनेक तरुण-तरुणी आहेत जे टिक टॉकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले.
पण हेच टिक टॉक आता कायद्याच्या कचाट्यात अडकलंय.
सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की टिक टॉक हे अॅप गुगल प्लेस्टोअर आणि अॅपलच्या अॅपस्टोअरवरून काढून टाकण्यात यावं. या प्रकरणावर पुढील सुनावणी 22 तारखेला होणार आहे.
भारतात टिक टॉकचे 12 कोटी वापरकर्ते आहेत. त्यामुळे चीनच्या या कंपनीसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. टिक टॉकने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत 60 लाख आक्षेपार्ह व्हीडिओ काढून टाकले आहेत.
"आम्ही भारतीय कोर्टाचा आणि न्याय प्रणालीचा आदर करतो, असं कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे आम्ही टिक टॉकवरून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यासाठी कटीबद्ध आहोत," असं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर टिक टॉकने प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टाच्या या निर्णयाबद्दल विष्णूप्रिया काय वाटतं? ती सांगते, "टिक टॉकमुळेच मी इतक्या लोकांशी जोडले गेले. टिक टॉकमुळेच इतकी प्रसिद्धी मिळाली. जर टिक टॉक बंद पडलं तर दुःख नक्कीच होईल. जर कोर्टाला एखाद्या गोष्टीवर हरकत असेल तर त्यांनी नियम लावावेत, पण पूर्णतः बंदी घालू नये."
विष्णूप्रियाप्रमाणेच साई पाटील आणि हृषिकेश पाटील हे देखील टिक टॉक सेलिब्रिटी झाले आहेत. साई, हृषिकेश आणि विष्णूप्रिया हे एकत्र काम करतात. त्यांच्या या टीमला ते 'ड्रीम टीम' म्हणतात.
साई पाटीलचे अडीच लाख फॉलोअर्स आहेत तर हृषिकेशच्या फॉलोअर्सची संख्या पाच लाखांच्या वर आहे. या माध्यमाकडे कसं काय वळलात, याचं उत्तर देताना हृषिकेश सांगतो, "आधी सहज अॅप डाऊनलोड केलं आणि व्हीडिओ टाकायला सुरुवात केली. मला चांगला प्रतिसाद मिळू लागला. आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये टिक टॉक हे अॅप असतं. त्यामुळे मला लवकर प्रसिद्धी मिळाली."
कोर्टाच्या निर्णयाबद्दल काय वाटतं, असं विचारलं असता हृषिकेश सांगतो, "हे अॅप बंद पडू शकत नाही, असं मला वाटतं. नक्कीच काही बंधनं येतील आणि ती असायला हवीत. पण सरसकट बंदी येणार नाही, असंच मला वाटतं."
शहरी भागापेक्षा निमशहरी आणि ग्रामीण भागात हे अॅप जास्त लोकप्रिय आहे. याची कारणं काय असावीत, असं विचारलं असता न्यूज 18चे निर्माते आलोक मिश्रा सांगतात की "शहरी भागातले लोक ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर करतात. तिथे मोठ्या प्रमाणात कंटेट अपलोड केलं जातं. पण व्हीडिओ बनवायचा असेल तर तिथं भरपूर मेहनत घ्यावी लागते. पण म्युझिकली, हेलो किंवा टिक टॉकवर कमी वेळेत व्हीडिओ बनवता येतात."
"ज्या मुलामुलींना अभिनयाची आवड आहे, त्यांच्यासाठी टिक टॉक अभिव्यक्तीचं माध्यम बनलं आणि याची लोकप्रियता वाढत गेली. फेसबुकवर तुमच्या सर्कलमधल्याच लोकांच्या पोस्ट दिसतात. पण टिक टॉकमध्ये एका पाठोपाठ व्हीडिओ येत जातात. लोक टिक टॉकवर जास्त एंगेज राहतात. तरुण आणि गृहिणी आपले व्हीडिओ टाकू लागले. यातून त्यांना नवी ओळख मिळाली," मिश्रा सांगतात.
टिक टॉकवर सध्या कायद्याची टांगती तलवार आहे.
पण टिक टॉकवर बंधन येणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणं आहे का, असं विचारलं असता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे सांगतात की "घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. पण त्यावर काही वाजवी बंधनं घालण्याचा अधिकार कोर्टाला आहे. टिक टॉकवर अनेक आक्षेपार्ह व्हीडिओ आहेत, तेव्हा कोर्ट लोककल्याणार्थ भूमिका घेऊन हे व्हीडिओ काढून टाकण्यात यावेत, असं सांगू शकतं."
"टिक टॉकमुळे unhealthy competition वाढत आहे. आपल्या जास्तीत जास्त लाइक्स मिळावेत, यासाठी मुलांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धा असणं आवश्यक आहे, पण ती सकारात्मक हवी. नकारात्मक स्पर्धेतून मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा खेळ राहिला नाही तर खेळखंडोबा झाला आहे. या गोष्टींचा विचार करून पालकत्वाच्या भूमिकेतून निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला आहे," असं सरोदे सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)