TikTok Ban: न्यायालयाच्या निर्णयानंतर गुगल प्लेस्टोअरमधून टिकटॉक अॅप गायब #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. टिकटॉकवर बंदीः न्यायालयाच्या निर्णयानंतर गुगल प्लेस्टोअरमधून अॅप गायब

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या टिकटॉकवर बंदीच्या मागणीनंतर गुगल प्लेस्टोअरमधून हे अॅप गायब झालं आहे. 'द क्विंट'नं यासंबंधीची बातमी दिली आहे. या अॅपवरुन पोर्न कन्टेन्टही सहज उपलब्ध असल्यानं टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे. पण त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मद्रास उच्च न्यायालयाच्या टिकटॉक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

भारत सरकारनं गुगल आणि अॅपल या दोन कंपन्यांना टिकटॉक संबंधात मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं पालन करण्याची सूचना केली आहे. सरकारनं १५ एप्रिलला दोन्ही अमेरिकन कंपन्यांना टिकटॉक बंदी घालण्यासंबंधीच्या सूचना कळवल्या. त्यानुसार गुगल प्लेस्टोअरमध्ये हे अॅप दिसणं बंद झालं.

अर्थात, जे या निर्णयाच्या आधीपासून टिकटॉक वापरत आहेत, त्यांना अजूनही हे अॅप वापरता येऊ शकतं.

2. राज ठाकरेः स्वच्छ भारत योजनेवर टीका

कोल्हापुरातील इचलकरंजीमधल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावर अतिशय बोचरी टीका केली. 'डिजिटल गाव' म्हणून जाहिरात केलेल्या हरिसालचं वास्तव मागच्या सभेत मांडल्यानंतर राज यांनी आपला मोर्चा स्वच्छ भारत योजनेकडे वळवला.

"बिहारमध्ये पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालयं बांधल्याचा दावा केला होता. हिशोब करा, आठवड्याला ८ लाख ५० हजार म्हणजे १ मिनिटांत ८४ शौचालयं आणि ५ सेकंदात ७ शौचालयं बांधली जातील. इतक्या फास्ट होत पण नाही, जितक्या फास्ट यांनी शौचालयं बांधली," अशा शब्दांत राज यांनी स्वच्छ भारत अभियानातील आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एबीपी माझानं राज यांच्या सभेचं वृत्त दिलं आहे.

3. पीएम नरेंद्र मोदीः प्रदर्शनावर निर्बंधांपाठोपाठ चित्रपटाचा ट्रेलरही युट्यूबवरून गायब

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगानं स्थगिती दिल्यानंतर आता त्याचा ट्रेलरही युट्यूबवरून गायब झाला आहे. युट्यूबच्या सर्च बारमध्ये जरी चित्रपटाचं पूर्ण नाव टाकलं तरीही ट्रेलर दिसत नाही. 'हा व्हिडिओ उपलब्ध नाही', असा मेसेज युट्यूबवर दिसतो. लोकसत्तानं यासंबंधीची बातमी दिली आहे.

आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या विरोधकांच्या तक्रारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचं प्रदर्शन थांबविण्यात आलं होतं. हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाने आधी चित्रपट पाहावा आणि त्यानंतर निर्णय घ्यावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या 'नमो टीव्ही'लाही निवडणुकीसंदर्भातील आचारसंहिता लागू होणार आहे. प्रचारसभांचे नियम 'नमो टीव्ही'ला लागू होतील. त्यामुळं प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या ४८ तास आधी नमो टीव्हीवरून कोणत्याही सभांचे, भाषणांचे प्रक्षेपण होणार नाही. निवडणूक आयोगानं त्यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. 'द इंडियन एक्सप्रेस'नं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

4. डीएमके नेत्या कनिमोळींच्या घर तसंच कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी डीएमके नेत्या के. कनिमोळी यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे घातले. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे. तामिळनाडूतील मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना ही कनिमोळींवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आयकर विभागातील एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, की जिल्हा दंडाधिकारी संदीप नंदुरी यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे छापे घालण्यात आले आहेत. या कारवाईवर डीमकेनं टीका केली असून भाजप केंद्रीय संस्थांचा वापर विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी करत असल्याचं म्हटलं आहे.

5. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी जेटचा अखेरचा प्रयत्न, बँकांकडून 400 कोटींची मागणी

आर्थिक डबघाईला आलेल्या जेट एअरवेजनं पत पुरवठा करणाऱ्या बँकांकडून 400 कोटी रुपयांची मागणी केली आहे. जेट एअरवेज पूर्णपणे बंद होऊ नये यासाठी कंपनीला या आर्थिक सहाय्याची गरज आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

मंगळवारी जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जेटच्या विमानांच्या उड्डाणांबद्दलही चर्चा झाली. गेल्या आठवड्यात जेटनं आपली अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं ऐनवेळी रद्द केली होती. बँकांकडून अजूनपर्यंत जेटला या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)