You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी शरद पवार महाराष्ट्रात 1 नंबरचे शत्रू का झाले?
1. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही एक असून त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं - पंतप्रधान नरेंद्र मोदी, 14 नोव्हेंबर 2016
2. 'शरदराव काश्मीरच्या मुद्द्यावर तुम्हाला झोप तरी कशी लागते?' - नरेंद्र मोदी, 14 एप्रिल 2019
देशाच्या लोकसभेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक खासदार पाठवणारं राज्य म्हणून महाराष्ट्राला या लोकसभा निवडणुकीत कमालीचं महत्त्व प्राप्त झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. या सभांचं मात्र एक वैशिष्ट्य ठळक दिसत आहे, ते म्हणजे त्यांच्या भाषणातून होत शरद पवार यांच्यावर होत असलेला थेट हल्ला. पवार आणि मोदी यांच्यातील कलगीतुरा महाराष्ट्रात चांगलाच रंगला आहे.
या दोन्ही नेत्यांनी या प्रचारसभांमध्ये एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्रात शरद पवार 1 नंबरचे शत्रू झाले आहेत का, असा प्रश्नच त्यातून निर्माण होत आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये या दोन्ही नेत्यांच्या संबंधांनी 180 अंश कोनामध्ये प्रवास केला आहे.
2014 साली महाराष्ट्रात 'स्थिर' सरकार येवो म्हणून न मागताही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला दिलेला पाठिंबा असो की नरेंद्र मोदी यांनी पवारांचं वारंवार केलेलं कौतुक. या सगळ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर सध्या चाललेला प्रचार मात्र अगदीच विपरीत असल्याचं सहज दिसून येईल.
"शरद पवार यांनी दीर्घकाळ रचनात्मक कार्य केले म्हणूनच ते दीर्घकाळ राजकारणात आहेत. त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवले. त्यांची उत्तम प्रशासक अशी ओळख आहे. त्यांच्या डोक्यात सतत गाव, शेतकरी, नवे तंत्रज्ञान यांचा विचार सुरू असतो." अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी शरद पवार यांचं कौतुक केलं होतं.
पवार यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळच्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी "शरद पवार यांना राजकारणाची दिशा उत्तम ओळखता येते" असं म्हटलं होतं. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची कशी 'मदत' व्हायची हेसुद्धा त्यांनी सांगितलं होतं.
हे झालं दिल्लीतलं पण महाराष्ट्रात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही पवारांची स्तुती करायला नरेंद्र मोदी यांनी आजिबात कसर ठेवली नव्हती.
बारामती इथं झालेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी "माझं आणि शरद पवार यांचं महिन्यातून दोन-तीनवेळा बोलणं झालं नसेल असं फारसं कधी झालंच नाही," असं सांगून टाकलं.
संपुआ सरकारच्या काळामध्ये एखादं काम करवून घ्यायचं झालं तर मी शरद पवार यांची मदत घेत असे हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं.
त्यानंतर पुण्यात शुगरकेन व्हॅल्यूचेन व्हिजन परिषदेत मात्र नरेंद्र मोदी सर्व भाषणांवर कडीच केली. शरद पवार यांनी राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं असं सांगितलं. या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय संबंधांबाबत महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली. अशा कार्यक्रमांमध्ये पवार यांनीही मोदींच्या गुजरातमधल्या कामाचं कौतुक केलं होतं.
त्यानंतर एका कार्यक्रमात पवार यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली. "असं वक्तव्य 'त्या' माणसानं केल्यानंतर भयंकर काळजीची स्थितीच तयार झाली. तेव्हा काही काळ मी दिल्लीला जाणंच सोडलं होतं," अशा शब्दांमध्ये पवार यांनी त्यात तथ्य नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला होता.
'दोघांसाठी अटीतटीची लढाई'
आता मात्र हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यामागे पवार कुटुंबीय होते. पवार यांच्या पुतण्याने (अजित पवार) पक्षाचा ताबा घेतला आहे असा व्यक्तिगत उल्लेखही पंतप्रधानांनी केला.
त्यांच्या टीकेला पवारही उत्तर देत आले आहेत.
"ही निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी अटीतटीची असल्यामुळं होत आहे," असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
ते म्हणतात, "पंतप्रधानांनी शरद पवारांचा वारंवार आदराने उल्लेख केला असला तरी पवारांनी ते माझे शिष्य आहेत असं कधीच सांगितलेलं नाही. नरेंद्र मोदी यांच्या बाजूने ते कधीच भूमिका घेणार नाहीत. नरेंद्र मोदी पवारांना टारगेट करतात कारण महाराष्ट्रात त्यांच्याशिवाय कोणावर टीका करणार?"
या स्थितीबाबत बोलताना राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सांगतात, "2004 नंतर पवार यांचं स्वतःच राजकारण पुन्हा जुन्या नेहरूकालीन काँग्रेसच्या दिशेनं गेलेलं दिसतं. त्यांच्या काही भाषणांमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये केलेलं वर्णन ऐकलं की असं काँग्रेसच्या नेत्यांनाही स्वपक्षाबद्दल बोलता येणार नाही असं वाटतं."
मोदी यांच्या बदललेल्या भाषेचं कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये दिसतं असं सांगून पवार म्हणाले, "2014 साली नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर पहिली दोन ते अडीच वर्षे शरद पवार, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची विचारपूस करणे, त्यांच्याशी चर्चा करणे अशी भूमिका घेतली होती."
"मात्र नंतर प्रशांत किशोर यांच्यासारखा मदतनीस निघून जाणं, NITI आयोगातून अरविंद पानगढिया यांनी राजीनामा देणं अशा घटना घडल्यानंतर मात्र मोदी भावनिक निर्णय घेऊ लागले. केवळ भावनिक मुद्द्यांवर ते बोलू लागले. या काळात पवार मात्र रॅशनली विचार करत राहिले. इमोशन्सवर होत असलेल्या राजकारणामुळे शेतीसारख्या क्षेत्राकडे सरकारचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा फायदा पवारांनी सरकारला वेळोवेळी कोंडीत पकडायला केला. त्यामुळे शेवटच्या अडीच वर्षांमधलं चित्र वेगळं दिसून येतं."
नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्यावर थेट हल्ला चढवण्याचं कारण कोणतं असावं याबाबत प्रकाश पवार सांगतात, "शरद पवार यांनी तामिळनाडू, महाराष्ट्रात काँग्रेसच्या आघाड्या होण्यासाठी फार आधीपासून प्रयत्न सुरू केले. इतर पक्षांशी चर्चा करून कमीतकमी फाटाफूट व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ते टीकेच्या रडारवर आले."
"तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले लोक धरसोड वृत्तीचे आहेत. ते भाजपमध्ये राहातात की स्वगृही जातात हे निवडणुकीचा निकाल लागल्यावरच स्पष्ट होईल. त्यामुळे ते पुन्हा परत जाऊ नयेत यासाठी राष्ट्रवादी पक्ष कसा वाईट आहे, शरद पवारांचे काय चुकते हे सांगण्याचं काम पंतप्रधान करत आहेत. तर भाजपत गेलेल्या नेत्यांना तिथं केवळ 'एक-दोघांचंच' चालतं, मोदी कसे चूक आहेत हे सांगण्याचं काम पवार करत आहेत."
"अनुल्लेखानं टाळणं"
राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आपला विरोधक आहे हा संदेश भाजपानं याआधीच दिलेला आहे असं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं.
प्रधान सांगतात, "केवळ राष्ट्रवादीवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा दबावही राहातो. पुढे गरज पडली तर राष्ट्रवादीचा फायदाही होऊ शकतो. असा त्यामागे विचार असावा. यामधून काँग्रेसला उल्लेख न करता टाळलं ही जातं. तसेच केवळ राष्ट्रवादीला विरोध झाल्यामुळं शरद पवार यांना मदतही होते. महाराष्ट्रात 'आपणच आहोत' असा संदेश त्यातून जातो."
मोदी-पवार आघाडी होईल का?
हे दोन्ही नेते आज थेट टीका करत असले तरी पुढे एकत्र येतील का हा प्रश्नही राहतोच. 2014 साली झालेल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला 'नॅचरली करप्ट पार्टी' असा उल्लेख केला होता. नंतर भाजपाने न मागता राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसासांठी महाराष्ट्रात पाठिंबाही दिला होता.
त्यामुळे भविष्यात शरद पवार पुन्हा नरेंद्र मोदींबरोबर जाणार नाहीत अशी शक्यता नाकारता येत नाही.
पण अकोलकर ही शक्यता साफ फेटाळून लावतात.
ते म्हणतात, "नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पवार जाण्याची सूतराम शक्यता नाही. तसं असतं तर ते आधीही गेले असते. 1999साली एकमेकांविरोधात निवडणूक लढवूनही, काँग्रेसमधून हकालपट्टी झाली असूनही त्यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसचाच पर्याय निवडला. तेव्हा त्यांनी शिवसेना-भाजपाचा विचार केला नाही. त्यामुळे ते मोदींबरोबर जाणार नाहीत."
मोदींवर टीका करण्याचं आणखी एक कारण
पुढील निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले नाही तर तो मोदींचा पराभव आहे हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत असं मत प्रकाश पवार व्यक्त करतात. "त्यामुळेच त्यांनी नरेंद्र मोदींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच भाजपला तुम्ही मोदींना पर्याय निवडायला सुरू करा असा सुप्त संदेशही ते देत राहातात. अधूनमधून नितीन गडकरी यांचंही नाव पुढे येत राहतं," असं प्रकाश पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)