You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019 : फेसबुकची काँग्रेसच्या पेजेसवर कारवाई, काँग्रेसशी संबंधित 687 पेजेस काढून टाकली
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी फेसबुकनं सोशल मीडियासंबंधीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाशी संबंधित 687 पेजेस फेसबुकनं हटविली आहेत.
काँग्रेसनं मात्र यावरून भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
पानांवर सुरू असलेल्या गोष्टी या अप्रमाणिक असल्याचं फेसबुकचं म्हणणं आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला दहा दिवस बाकी असताना फेसबुकनं ही कारवाई केली आहे.
एखाद्या प्रमुख राजकीय पक्षाच्या फेसबुक पेजेसवर अशाप्रकारची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असावी.
अनेक युजर्सचे अकाउंट फेक
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार काँग्रेसशी संबंधित फेसबुक ग्रुपवर असलेल्या अनेक युजर्सचे अकाऊंट हे फेक असल्याचं आढळून आलं होतं. या ग्रुपवरील प्रचाराचा मजकूर अन्य ठिकाणी प्रसिद्ध करता यावा, यासाठी युजर्सनी आपले अकाउंट इतर ग्रुपशीही जोडले होते.
फेसबुकनं दिलेल्या माहितीनुसार या पेजेसवर अनेक स्थानिक बातम्या तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात होत्या.
फेसबुकचे सायबर सुरक्षा धोरण प्रमुख नॅथनील ग्लेयशर यांनी सांगितलं, "या फेसबुक पेजेसच्या सक्रीय युजर्सनी आपली ओळख लपविली होती. यांपैकी अनेक जण हे काँग्रेसच्या आयटी विभागाशीच संबंधित असल्याचं आमच्या पडताळणीत आढळून आलं."
या सर्व कारणांमुळेच फेसबुकनं हे सर्व पेजेस हटविण्याचा निर्णय घेतला.
फेसबुकनं काही पेजेसचे स्क्रीन शॉटही शेअर केले आहेत. यामध्ये मोदी सरकारच्या धोरणांवर केलेली टीका आहे. तसंच पाकिस्तानची प्रशंसा करणाऱ्या पोस्टही आहेत.
फेसबुकनं 103 पेजेस, ग्रुप आणि काही अकाउंट हटविले आहेत. यावरील मजकूर तसंच पोस्ट या संशयास्पद होत्या. यांपैकी काही पेजेस पाकिस्तानमधून चालविण्यात येत होती. पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाकडून ही पेजेस चालविले जात होती.
फेसबुकवर प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराबद्दल गेल्या काही दिवसांपासून जगभरातून दबाव निर्माण केला जात आहे. फेसबुकचा वापर कोणत्याही राजकीय लाभासाठी केला जाणार नाही, याबद्दल भारत सरकारनंही हमी मागितली होती.
त्यामुळे फेसबुकवर होणाऱ्या राजकीय गोष्टींबद्दल नियम अधिक कठोर करण्याचा पवित्रा कंपनीनं घेतला होता.
काँग्रेस पक्षाशी संबंधित पेजेसव्यतिरिक्त फेसबुकनं 227 इतर पेजेसही नियमांचा भंग केल्याच्या कारणावरून हटविले आहेत.
भारतात 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत सात टप्प्यांत मतदान होईल आणि 23 मे रोजी निकाल जाहीर होतील. त्यापूर्वी फेसबुकनं आपले नियम कठोर करण्याचा पवित्रा घेतला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या कारवाईवर टीका केली आहे.
"सरकारचा फेसबुकवर किती मोठा दबाव आहे, हे यातून दिसून येतंय. ही कारवाई निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झाली असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. याचं कारण भाजपची कोणतीही फेसबुक अकाउंट हटविण्यात आली नाहीत. मोदीजींनी निश्चितपणे या सगळ्या गोष्टी कराव्यात. त्यांच्याकडे आता शेवटचे काही दिवस राहिले आहेत. संपूर्ण जनता तुमच्या विरोधात गेलेली आहे. ज्या सिंहासनाच्या जोरावर तुम्ही उड्या मारताय, ते फार काळ राहणार नाहीये. भारतीय जनता पक्षाचा हा उन्माद जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)