‘टिकटॉक’वर बंदी आणा: मद्रास हायकोर्टाने दिला केंद्र सरकारला आदेश

'टिकटॉक' या देशात लोकप्रिय होत चाललेल्या चायनिज अॅपवर बंदी घाला, अशी शिफारस मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारकडे केली आहे. म्युझिकली म्हणून सुरू झालेल्या 'टिकटॉक'चे भारतात 5.4 कोटी सक्रिय युजर्स आहेत.

मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठासमोर टिकटॉकच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी होत होती, तेव्हा कोर्टाने हे निर्देश दिले. या अॅपमुळे चाईल्ड पॉर्नला उत्तेजन मिळतंय, असं कोर्टाचं म्हणणं आहे. कोर्टाने मीडियालासुद्धा हे अॅप वापरून बनवलेले व्हीडिओ न दाखवायला सांगितलं आहे.

हे अॅप वापरणारी लहान मुलं लैंगिक अत्याचाऱ्यांच्या तावडीत सापडण्याची शक्यता जास्त आहे, असं कोर्टाचं म्हणणं पडलं.

मदुराईचे वरिष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मुथू कुमार यांनी ही याचिका दाखल केली होती. लहान मुलांचं लैंगिक शोषण, पॉर्नोग्राफी, सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास, लोकांनी केलेल्या आत्महत्या, अशा काही कारणांमुळे या अॅपवर बंदी घालावी, असं मुथू यांचं म्हणणं होतं.

कोर्टाने सरकारला 16 एप्रिलच्या आधी या मुद्द्यावर प्रतिक्रिया द्यायला सांगितलं आहे.

"आम्ही स्थानिक कायदा पाळणारे आहोत आणि कोर्टाच्या निकालाची प्रत आमच्या हातात येण्याची वाट पाहात आहोत," असं टिकटॉकच्या प्रतिनिधीने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.

"अॅप वापरणाऱ्यांना सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण पुरवणं याला आमचं प्राधान्य असेल," असंही ही पुढे म्हणाले.

हे टिकटॉक नक्की आहे काय?

शाळेचा गणवेश घातलेली दोन मुलं 'दीवार' सिनेमातील डॉयलॉगची नक्कल करायचा प्रयत्न करतात... 'आज मेरे पास बंगला है, गाडी है, बैंक बैलन्स है. तुम्हारे पास क्या है?'

हे सगळं इतकं मजेशीर असतं की हसू येतं. इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकानेच असे व्हीडियो बघितले असतील, जे 'टिकटॉक' या चीनी अॅपवरून युजर बनवतात. पंधरा सेकंदांपर्यंतचे हे व्हिडियो तयार करून शेअर ते व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम तसंच इतर अॅप्सद्वारे प्रचंड शेअर केले जातात.

या अॅप्लिकेशनचे कॉपी राईट 'बाईट डान्स' या चीनी कंपनीकडे आहे. या कंपनीने सप्टेंबर 2016 मध्ये 'टिकटॉक' अॅप लॉन्च केलं. 2018साली या अॅपची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि ऑक्टोबर 2018 मध्ये अमेरिकेत ते सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप ठरलं.

भारतात टिकटॉक 10 कोटींपेक्षा जास्त मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यात आलं आहे. गुगल प्लेस्टोरवर 80 लाख लोकांनी टिकटॉकचा रिव्ह्यू केला आहे. यावरूनच भारतात टिकटॉकच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल.

विशेष म्हणजे टिकटॉक वापरणाऱ्यांमध्ये छोटी शहरं आणि गावाखेड्यातील लोकांची संख्या मोठी आहे. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे सात-आठ वर्षांच्या मुलांमध्येही टिकटॉकची क्रेझ आहे.

इतकेच काय आता तर श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ आणि नेहा कक्करसारखे बॉलिवुड कलावंतदेखील टिकटॉकवर आले आहेत.

टिकटॉकची वैशिष्ट्यं

टिकटॉकवरून व्हिडियो तयार करताना तुम्ही तुमचा आवाज वापरू शकत नाही. तुम्हाला लिपसिंक करावं लागतं.

फेसबुक आणि ट्विटरवर ब्लू टिक मिळवण्यासाठी म्हणजेच आपले अकाउंट व्हेरिफाय करून घेण्यासाठी सामान्य व्यक्तींना बरीच मेहनत घ्यावी लागते. मात्र टिकटॉकवर वेरिफाईड अकाउंट असणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. या अॅपवर ब्लू टिक नाही तर ऑरेंज टिक मिळतं.

ज्या युजर्सना ऑरेंज टिक मिळते त्यांच्या अकाउंटवर 'पॉप्युलर क्रिएटर' लिहिलेलं असतं. शिवाय अकाउंट बघितल्यावर युजरला किती हार्ट्स मिळाले आहेत, हे देखील कळतं. म्हणजेच किती लोकांना तो व्हीडियो आवडलेला आहे, हे कळतं.

यातले धोके

  • हे अॅप 13 वर्षांवरील व्यक्तींनीच वापरावे, असे गुगल प्लेस्टोरवर सांगितलं आहे. मात्र या नियमाचे पालन होताना दिसत नाही. भारतासह जगभरात टिकटॉकवर जे व्हीडियो तयार होतात त्यात 13 वर्षांखालील मुलांची मोठी संख्या आहे.
  • प्रायव्हसीबद्दल सांगायचं तर टिकटॉकवर प्रायव्हसी राखली जातेच, असं नाही. कारण यात केवळ दोनच प्रायव्हसी सेटिंग्ज आहेत - 'पब्लिक' आणि 'ओनली मी'. म्हणजे तुमचा व्हीडियो फक्त तुम्ही बघू शकता किंवा इंटरनेट वापरणारा प्रत्येक जण तो बघू शकतो.
  • कुणाला स्वतःचं टिकटॉक अकाउंट बंद करायचं असेल तर ती व्यक्ती स्वतः हे अकाउंट डिलीट करू शकत नाही. यासाठी तिला टिकटॉकला रिक्वेस्ट पाठवावी लागते.
  • टिकटॉक पूर्णपणे सार्वजनिक असल्याने कुणीही कुणालाही फॉलो करू शकतं, मेसेज करू शकतं. अशा परिस्थितीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी व्यक्ती किंवा असामाजिक तत्त्व किशोरवयीन मुलांना नादी लावू शकतो.
  • अनेक टिकटॉक अकाउंटवर अडल्ट काँटेंट आहे. टिकटॉकला कुठलेच फिल्टर नसल्याने कुणीलाही अगदी लहान मुलांनादेखील हा काँटेंट बघता येतो.

हेही वाचलंत का?

(पाहा 'बीबीसी विश्व' - मराठीतलं पहिलं डिजिटल बुलेटिन सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप, तसंच आमच्या फेसबुक, यूट्यूब, ट्विटर अकाउंट्सवर)