SRH v MI: अल्झारी जोसेफ - IPL लिलावात अनसोल्ड ठरलेल्या वेस्ट इंडीजच्या बोलरचे पदार्पणातच विक्रम

बदली खेळाडू म्हणून IPLमध्ये प्रवेश झालेल्या अल्झारी जोसेफने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना पदार्पणातच एका डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. IPLच्या 12व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 18 डिसेंबरला झाला. वेस्ट इंडिजच्या 22 वर्षीय तेजतर्रार फास्ट बॉलर अल्झारी जोसेफचं नाव लिलावासाठीच्या खेळाडूंमध्ये होतं. पण दिवसभर चाललेल्या लिलावात आठपैकी कोणत्याही संघाने अल्झारीला संघात घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही. दिवसअखेरीस अल्झारीच्या नावावर 'अनसोल्ड' असा शिक्का बसला.

IPLचा 12वा हंगाम सुरू झाला. फास्ट बॉलर अॅडम मिल्न दुखापतग्रस्त झाल्याने मुंबई इंडियन्स संघाला धक्का बसला. मिल्न संपूर्ण हंगामाला मुकणार हे लक्षात आल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्वरित पावलं उचलत वेस्ट इंडिजच्या अल्झारी जोसेफला ताफ्यात समाविष्ट केलं.

मुंबई इंडियन्सकडून 28 मार्चला औपचारिक घोषणा करण्यात आली. व्हिसा आणि अन्य तांत्रिक सोपस्कार उरकून अल्झारी मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाला. मात्र मुंबईकडे चांगल्या फास्ट बॉलरची फळी असल्याने त्यांनी अल्झारीला अंतिम अकरात समाविष्ट केलं नाही.

शनिवारी सनरायझर्स हैदराबाद या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मुंबईने अनुभवी लसिथ मलिंगाऐवजी अल्झारीला खेळवण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्सच्या दमदार आक्रमणासमोर मुंबईला 20 ओव्हर्समध्ये 136 धावाच करता आल्या. ट्वेन्टी-20 प्रकारात या धावा पुरेशा नाहीत, अशी चर्चा होती. मात्र IPL पदार्पण करणाऱ्या अल्झारीने 6 विकेट्स घेत हैदराबादच्या बॅटिंगला खिंडार पाडलं.

IPLमध्ये सर्वोत्तम कामगिरीचा सोहेल तन्वीरचा 11 वर्षांपूर्वीचा विक्रम अल्झारीने पदार्पणाच्या सामन्यातच मोडला. अल्झारीने तडाखेबंद फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नर, विजय शंकर, दीपक हुडा, रशीद खान, सिद्धार्थ कौल आणि भुवनेश्वर कुमार यांना पॅव्हेलियमध्ये परतावत मुंबईला सनसनाटी विजय मिळवून दिला. हैदराबादचा डाव 96 धावांतच गडगडला. अल्झारीलाच 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

IPL सर्वोत्कृष्ट बॉलिंग प्रदर्शन

अल्झारीने सर्वोत्कृष्ट IPL पदार्पणाचा नवा विक्रम रचला. याआधी अँड्र्यू टायने 2017 मध्ये गुजरात लायन्ससाठी खेळताना पदार्पणाच्या लढतीत 17 धावांच्य मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अल्झारीचा समावेश झाला. याआधी विल्कीन मोटा, टीपी सुधींद्र, अली मुर्तझा, अमित सिंग, इशांत शर्मा, द्वारका रवी तेजा यांनी असा विक्रम केला होता.

IPL मधील पहिलीच ओव्हर विकेट मेडन टाकण्याचा विक्रमही अल्झारीने नावावर केला. याआधी पॅट कमिन्सने ही किमया केली होती.

मॅच संपताच मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि वेस्ट इंडिजच्याच कीरेन पोर्लाडने अल्झारीने खांद्यावर उचलून घेतलं. या मॅचची कॉमेंट्री करणाऱ्या केव्हिन पीटरसन, स्कॉट स्टायरिस आणि डीन जोन्स यांनीही उभं राहून अल्झारीला मानवंदना दिली.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अल्झारीची भरभरून प्रशंसा केली. पहिल्याच सामन्यात अशी कामगिरी करणं स्वप्नवत आहे असं रोहित म्हणाला.

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात 22 वर्षीय अल्झारीच्या आईचं निधन झालं. अल्झारी त्यावेळी इंग्लंडविरुद्ध टेस्ट खेळत होता. त्याने खेळण्याचं कर्तव्य पूर्ण केलं आणि नंतरच आईच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना झाला.

2016 मध्ये वेस्ट इंडिजने U19 वर्ल्डकप जिंकला होता. अल्झारी त्या संघाचा भाग होता. अल्झारी कॅरेबियन प्रिमिअर लीग स्पर्धेत सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघासाठी खेळतो.

सोशल मीडियावर अल्झारीवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)