शरद पवार लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत, पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारीचे स्पष्ट संकेत

फोटो स्रोत, Facebook
शरद पवारांनी ही लोकसभेची निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की एकाच कुटुंबातून तिघांनी निवडणूक लढवू नये, म्हणून मीच न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवारांनी काही आठवड्यांपूर्वीच म्हटलं होतं की ते लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. पण आता त्यांनी पुन्हा यू-टर्न घेतील, अशी चिन्हं आहेत.
माढा मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार की नाही? यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "मी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र एकाच कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवावी यावर आम्ही कुटुंबात चर्चा केली. अशा स्थितीत आमच्या परिवारातील एकानं कुणीतरी माघार घ्यावी असं मत पडलं. त्यामुळे मी आधीच 14 वेळा निवडणूक लढलो आहे आणि जिंकलो आहे. त्यामुळे मी स्वत: माढ्यातून लढणार नाही असं पक्षाला कळवलं आहे. आता इथं कुणाला उमेदवारी द्यायची याची पक्षात चर्चा सुरू आहे. त्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे."
माढ्यातून वियजसिंह मोहिते पाटील लढवणार का, असं विचारल्यावर पवार म्हणाले की हा निर्णय पक्ष घेईल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पार्थ पवार यांना राजकारणाचा अनुभव नाही, मग त्यांना निवडणुकीत उतरवणं घाईचं झालं नाही का? या प्रश्नावर पवार म्हणाले की, "लोकमान्यता आणि निवडून येण्याची क्षमता या दोनच मुद्द्यांवर आम्ही उमेदवारी देतो. पार्थ पवार हे नव्या पिढीचे नेते आहेत. त्यामुळे पार्थ पवार उभे राहिले तर आम्ही गेल्या दोन निवडणुकीत गमावलेली मावळची जागा पुन्हा जिंकण्याची संधी मिळेल असं वाटतं. तसंच शेकापचे नेतेही पार्थला उमेदवारी मिळावी या मताचे आहेत. त्यामुळे इथं नव्या पिढीला संधी मिळावी या मतापर्यंत आम्ही आलो आहोत"
मी माढा मधून लोकसभा निवडणूक लढवणार नाही.
दरम्यान कार्यकर्त्यांना संधी न मिळता नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांनाच संधी मिळतेय का? ही घराणेशाही नाही का? असं विचारलं असता पवार म्हणाले की, "यामुळेच मी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माझ्याऐवजी आता नव्या पिढीला संधी देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे."
पवारांच्या माघारीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
युतीचा हा मोठा विजय आहे. देशात मोदींना पाठिंबा देणारे वातावरण आहे. एकदा नरेंद्र मोदी सभेत म्हणाले होते की, शरद पवार हवा का रूख भाप लेते है. यावेळी माढ्यातही त्यांना हे समजले असावे म्हणून त्यांनी माघार घेतली.

फोटो स्रोत, Facebook
सुजय विखेंबद्दल काय म्हणाले पवार?
दरम्यान अहमदनगरची जागा राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांच्यासाठी सोडणार का? या मुद्द्यावर शरद पवारांनी 'नाही' असं उत्तर दिलं आहे.
"ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातली आहे. नगरच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये 2 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसचा एकही सदस्य गेल्या निवडणुकीत निवडून आलेला नाही. तसंच उरलेल्या चारही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला क्रमांक दोनची मतं आहेत. दुसरीकडे शिर्डीचा मतदासंघ काँग्रेसकडे आहे. त्यामुळे नगरची जागा काँग्रेसने मागण्याला काही अर्थच नाहीए. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल" असं पवार म्हणाले.
मात्र ही जागा दोन वेळा राष्ट्रवादीने गमावली आहे, तर काँग्रेसकडे सुजय विखेंच्या रूपाने निवडून येणारा उमेदवार आहे, या युक्तीवादावर पवारांना विचालं असता ते म्हणाले की, " या जागेवर राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा राहील. आणि याच मतदारसंघात बाळासाहेब विखे हयात नाहीत, पण त्यांना आम्हीच पराभूत केलं होतं. त्यावेळी निवडणुकीची जबाबदारीही माझ्यावरच होती. आणि निवडणूक हरल्यानंतर त्यांनी माझ्यावर केसही केली होती. त्यात माझा निवडणूक लढवण्याचा अधिकारही काढून घेण्यात आला. शेवटी मला सुप्रीम कोर्टात न्याय मिळाला" अशी आठवण पवारांनी करून दिली.
उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी तयार आहे. पण सध्या आम्ही काँग्रेसच्या यादीची वाट पाहात आहोत. त्यांची यादी तयार झाली की आम्ही एकत्रितपणे पहिल्या यादीची घोषणा करू असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
मात्र म्हाडातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार हे सांगणं त्यांनी टाळलं आहे. स्थानिक नेत्यांमधला विसंवाद पाहता माढा मतदारसंघातून कुणाला उमेदवार म्हणून पवार पुढे करतात हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








