You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा: पुण्यात काश्मिरी पत्रकारावर हल्ला, यवतमाळनंतर दुसरी घटना
- Author, हलिमा कुरेशी
- Role, बीबीसी मराठीसाठी पुण्याहून
पाहा व्हीडिओ -
मूळचा काश्मीरचा आहे, हे समजल्यावर 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना गुरुवारी पुण्यात घडली.
"Go back to Kashmir, काश्मीरला परत जा", अशा घोषणा देत 5-7 जणांनी आपल्याला मारहाण केल्याचं जिब्रान नाझिर दार यांनी सांगितलं.
त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातील काश्मिरी तरुणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुण्याचेच असलेले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं काही दिवसांपूर्वीचं "काश्मिरातील विद्यार्थ्यांवरील देशभरात हल्ल्यांचे बातम्या खऱ्या नाहीत," हे विधान खोटं ठरताना दिसत आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना जिब्रान नाझिर दार यांनी सांगितलं की गुरुवारी रात्री 10.30 वाजता घरी परतताना त्यांच्यावर टिळक रोडवर हल्ला झाला. "टिळक रोडवर सिग्नलवर थांबलेलो असताना मागून दोघं जण सतत हॉर्न वाजवत होते. माझ्या बाईकचं रजिस्ट्रेशन हे हिमाचल प्रदेशचं होतं, म्हणून ते म्हणाले 'ए हिमाचली, पुढे चल'."
"मी त्यांना लगेच म्हणालो, 'मी हिमाचल प्रदेशचा नाही, काश्मीरचा आहे'. मी काश्मीरचा आहे, हे ऐकताच त्यांनी माझी गाडी अडवली. मी त्यांना सांगितलं की मी पत्रकार आहे तर ते म्हणाले, 'काश्मिरात जाऊन पत्रकारिता कर...' आणि मला मारहाण सुरू केली," जिब्रान यांनी सांगितलं.
"माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न झाला. मी माझ्या काही सहकाऱ्यांना फोन केला आणि पाच मिनिटात पोलीस आले. मी पोलिसात रीतसर तक्रार केली, तेवढ्यात पोलीस दोघांना घेऊन आले. त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय पण होते. त्यांनी माझी माफी मागत 'परत असं काही करणार नाही' असं लिहून दिलं," असं जिब्रान यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
या प्रसंगात कोणत्याही विशेष गटाने मुद्दाम हा हल्ला केला नव्हता. अनेक जण आता घडत असलेल्या घडामोडींच्या प्रभावाखाली असल्याने हे घडल्याचं जिब्रान यांचं म्हणणं आहे.
या प्रसंगाचं कुणी भांडवल करून अशांतता निर्माण करू नये. यामुळे आपण तक्रार मागे घेत असल्याचं जिब्रान यांनी सांगितलं.
याप्रकरणी पुणे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की "आज सकाळी आमच्या पुढे हे प्रकरण आल्यानंतर आम्ही जिब्रान यांना तक्रार दाखल करण्यास सांगितलं. पण त्यांनी नकार दिल्यानंतर आम्ही दोघा जणांविरुद्ध सुओमोटो (पोलिसांनी स्वतःहून) कलम 279, 323, 504, 341, 427 अन्वये तक्रार दाखल केली आहे."
काश्मीरमध्ये मर्यादित शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध असताना तसंच हिंसाचाराचाला कंटाळून अनेक तरुण काश्मीर सोडून इतर राज्यांमध्ये शिक्षणाला तसंच नोकरीला जात आहेत. पण 14 फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामामध्ये CRPFवर झालेल्या हल्ल्यात 44 जवानांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून देशभरात तणाव तर आहेच, शिवाय काश्मिरी तरुणांवर ठिकठिकाणी हल्ले होत असल्याच्या बातम्या येतच आहेत.
मात्र पुण्यात असं काही होणार नाही, असं मी माझ्या नातेवाईकांना सांगत दिलासा दिल्याचं जिब्रान यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी पुण्यात 'सरहद' या सामाजिक संस्थेने पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ एक पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा या संस्थेशी निगडित काही काश्मिरी तरुणांनी सांगितलं होतं की त्यांना पुण्यात सर्वांत जास्त सुरक्षित वाटतं. या पत्रकार परिषदेत 'सरहद'चे अध्यक्ष संजय नाहर यांनी सांगितलं की काश्मीरच्या संघर्षग्रस्त भागांमधून जवळजवळ 400 कुटुंबं आणि साधारण अडीच हजार लोक पुण्यात राहतात.
शिवाय, शुक्रवारी सुप्रीम कोर्टानेही महाराष्ट्रासह 10 राज्यांना सूचना दिल्या आहेत की पुलवामा हलल्यांनतर काश्मिरी विद्यार्थ्यांवर देशभरात होत असलेले हल्ले, धमक्या, बहिष्कार रोखण्यासाठी राज्य सरकारांनी काय पावलं उचलली, याची माहिती द्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत जावडेकर म्हणाले, ''काश्मिरातील विद्यार्थ्यांवर देशभरात अनेकठिकाणी हल्ले आणि मारहाणीचे प्रकार घडत आहेत असं सांगण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे. मात्र हे खरं नाही. मी सर्व शैक्षणिक संस्थांच्या संपर्कात आहे आणि अशी कुठलीही घटना घडलेली नाही हे मी सांगू इच्छितो."
पण जिब्रान यांच्याबरोबर झालेल्या घटनेमुळे पुणेही अशा हल्ल्यांपासून वंचित नाही, हे स्पष्ट होतं.
शिवाय, बुधवारी यवतमाळमध्ये शिक्षणासाठी जम्मू-काश्मीरहून आलेल्या चार विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी समोर आली होती. युवासेनेच्या काही कार्यकर्ते यामागे असल्याचं पोलीस तपासातून पुढे आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)