पुलवामा : महाराष्ट्रातील काश्मिरी मुलांना जवानांवरील हल्ल्यानंतर असुरक्षित वाटतं?

    • Author, हलिमा कुरेशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी नाहीत, शिक्षण घायचं तर काश्मिरच्या हवामानामुळे आणि सततच्या हिंसक घटनांमुळे पाच ते सहा महिने मिळतात. यामुळे अनेक काश्मिरी कुटुंब हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतात. आपल्या मुलांनी शांततेचं आयुष्य जगावं यासाठी चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी कर्ज काढून आई वडील मुलांना इतर राज्यात पाठवतात. त्यांना इतर राज्य ,भारत आपला वाटतो म्हणूनच ते जातात ना दुसऱ्या राज्यात. मग एका काश्मिरीच्या दुष्कृत्याची शिक्षा इतर निर्दोष व्यक्तींना कशासाठी?" नर्गिस पोटतिडकीने आणि काळजीच्या सुरात सध्याच्या परिस्थितीवर काश्मिरी विद्यार्थी आणि व्यावसायिकांवरील हल्ल्यविषयी बीबीसी मराठीशी बोलत होती.

वडील पोलीस अधिकारी आहेत म्हणून आम्ही इथे येऊन राहतोय, शिकतोय. पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना तर तिथेच राहावं लागतं ना. काश्मिरच्या मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, पण आम्हाला संधी मिळत नाही. त्यासाठी आम्हाला काश्मिरच्या बाहेर पडावं लागतं, अस ती सांगते.

"मी गेल्या पाच वर्षांपासून शिक्ष्णानिमित्त पुण्यात आलोय. पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पण या घटनेनंतर निष्पाप विद्यार्थ्यांवर झलेलेल हल्ले चिंताजनक असल्याचं ही काश्मिर मुलं सांगतात. डेहराडून, चंदीगड , दिल्ली तसाच श्रीनगरमध्ये देखील गरीब काश्मिरी, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांवर हल्ले झाले. मी पुण्यात सुरक्षित राहतोय फिरतोय. पण दिल्लीत माझा मोठा भाऊ या सगळ्या परिस्थितीमुळे बाहेर पडू शकलेला नाही. तो भीतीने चार पाच दिवसांपासून रूममध्ये आहे." अशी चिंता ओवेस व्यक्त करतो. तो आता पुण्यात चांगलाच मिसळलाय. तो एम.कॉमचं शिक्षण घेतोय. मॉडेलिंगमध्येही करिअर करतोय.

नर्गिस कश्मिरी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे अस्वस्थ आहे. पुलवामा येथे आर्मी वर झालेल्या हल्ल्यांमुळे अनेक कुटुंबीयांना प्रचंड दुखः सहन करावं लागलं हे आम्ही समजू शकतो. असे हल्ले दुर्दैवी असल्याचं नर्गिस आणि आयमन या बहिणी सांगत होत्या. नर्गिस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अर्थशास्त्रात पीएचडी करतेय. तर आयमन काश्मीरमध्ये केमिस्ट्री विषयात बी एससी करत आहे. आयमन हिवाळी सुट्ट्या असल्याने पुण्यात नातेवाईकांकडे आलीय. जेव्हा हल्ले झाले आम्ही दोघी बहिणी जीममध्ये जायला पण घाबरत होतो. आपल्याशी कोणी कश्मिरी आहे म्हणून येऊ तर देणार नाही, किंवा आपल्याला ट्रेड मिल देतील की नाही? अशी भीती वाटत होती. आपण कश्मिरी भाषेत नको बोलायला अस खूप काही आम्ही एकमेकींशी बोलत होतो.

गार्डनकडे जात असताना भीती वाटून मी रस्त्यातून माघारी आलयाचं नर्गिसने सांगितलं. आपण काश्मिरी असल्याचं ओळखून कोणी आपल्यावर हल्ला करेल, शेजारी सगळ्यांना माहीत आहे आम्ही कश्मिरी आहोत मग आपल्याशी सगळे तुसड्यासारखं वागतील अशा अनेक शंका-कुशंका आल्याचं या दोघी सांगत होत्या. पण हे सगळी आमच्या मनातील शंका होत्या. भीती होती. प्रत्यक्षात असं काही झालं नाही. सगळ्यांचं आमच्याशी वागणं नेहमीप्रमाणे होतं. जसे ते नेहमी आमची विचारपूस करायचे तशीच आताही करतात.

आमचे नातेवाईक फोन करून आम्हाला माघारी यायला सांगत होते पण आम्ही इथे सुरक्षित असल्याचं सांगितलं. उलट तुम्ही या इकडे असं आम्ही त्यांना सांगत होतो. ही मुलं बीबीसी मराठीशी मनमोकळ्या पद्ध्तीने बोलत होती. आयमन लिहिते, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेते. आपल्याला टीव्ही पत्रकारीतेबद्दल प्रचंड आकर्षण असल्याचं ती सांगत होती. 'काश्मीर तो जन्नत था...मगर अब कब्रस्थान सा बन रहा है'.. नर्गिस शून्यात बघत बोलत होती.

धरती वर स्वर्ग कुठे असेल तर तो इथेच आहे इथेच आहे असं वर्णन काश्मीर बद्दल केलं जातं. मात्र तीन दशकांपासून काश्मीरमध्ये हिंसाचार,दहशत वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतोय.

कट्टरवादी संघटनांनी काश्मीर खोऱ्यात मोठी दहशत निर्माण केलीय. अनेक निष्पाप काश्मिरींचा जीव घेतला आहे. गेल्या 15 वर्षातला सर्वात मोठा हल्ला हा जवानांवर झाला असल्याचं सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार सांगत होते.

संजय नहार यांनी अनेक काश्मिरी मुलांना शिक्षणासाठी पुण्यात आणलं. काश्मीर मधील वातावरणातून बाहेर सकारात्मकतेचं वातावरण, आपलेपण मिळालं तर ही मुले काश्मीरमध्ये जाऊन भारताबद्दल सकारात्मक होतील असं नहार म्हणतात. कारगिल युध्दानंतर अनेक मुलांची जबाबदारी ते उचलतायत. आजपर्यंत झालेल्या हल्ल्यात देशाबाहेरील शक्ती असायच्या. आत्मघातकी हल्ले करणारे देखील अफगाणी किंवा पाकिस्तानी असायचे मात्र पहिल्यांदाच एखादा काश्मिरी युवक आत्मघातकी हल्ल्यात सहभागी होणं हे अस्वस्थ करणार असल्याचं नहार म्हणाले.

पुण्यात अनेक काश्मिरी मुलं आनंदाने शिकतायत. नोकरी करतायत. जवळजवळ 500 काश्मिरी कुटुंबं पुण्यात असून 2 हजारावर मुलं काश्मीर खोऱ्यातील असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यात असीम फाऊंडेशन, बॉर्डरलेस फाऊंडेशन देखील काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी काम करतंय.

झाहिद भट हा पंधरा वर्षांपासून पुण्यात राहतोय. सरहद संस्थेत समन्वयक म्हणून तो काम करतोय.

पुलवामा हल्ल्याचा निषेध करत या दुर्घनेत जीव गमावलेल्या जवानांच्या कुटंबियांच्या वेदनेत सहभागी असल्याच्या भावना त्यांनी मराठीत व्यक्त केल्या. झाहिद मराठी शिकला. पुण्यात काश्मिरी मुलांची व्यवस्था देखरेख याबद्दल तो समन्वयक म्हणून काम करीत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात काश्मीरबद्दल चीड निर्माण झालीय त्यातून काश्मिरी मुलांना टार्गेट केलं गेलं. पुण्यातून देखील अनेक विद्यार्थिनी परतण्याच्या तयारीत होत्या. मात्र आम्ही त्यांची समजूत काढली असल्याचं झाहिद सांगत होता.

काश्मिरी मुलांवर होत असलेले हल्ले दुर्दैवी असून हे थांबले पाहिजेत अशी प्रतिक्रिया लेफ्टनंट जनरल ( निवृत्त) व्ही.जी. पाटणकर यांनी दिली. पुण्यात ते बीबीसी मराठीशी बोलत होते.

'आम्हाला आतिथ्य करायला खूप आवडतं. तुम्ही गेलाय का कधी काश्मीरला?' ओवेसच्या चे पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांनी मला विचारलं , मी नाही अशी मान डोलावली. पुण्यात वातावरण सुरक्षित असल्याने मी मुलांना इथे शिक्षणासाठी ठेवल्याचं त्यांनी सांगितलं.

नर्गिस तिच्या पीएचडीच्या संशोधनाबद्दल सांगत होती. अनेक व्यवसाय करता येतील, केशर प्रमाणेच सुगंधी तेल देणाऱ्या अनेक वनस्पती फक्त काश्मीर मध्येच मिळतात. मात्र त्याची लागवड, उत्पन्न घेणं याबाबत अनेक जण अनभिज्ञ असल्याचं ती सांगत होती. आपल्या संशोधनातून स्थानिकांना रोजगार मिळावा असं तिचं स्वप्न आहे .

अर्थात आशादायी चित्र निर्माण होईल असं म्हणत आणि काश्मिरी चहाचा आस्वाद घेत आम्ही निरोप घेतला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)