You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
NGMA प्रकरण : अमोल पालेकर यांचा सवाल, 'मी काय चुकीचं बोललो?'
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (NGMA) एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांचं भाषण मध्येच थांबवण्यात आलं. NGMA कडून याबाबत मात्र अजून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास बहुलकर यांनी पालेकरांच्या या वक्तव्यांमुळे खळबळ माजली, असं म्हणाले.
ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालेकर आधी बर्वे यांच्या काही आठवणींबद्दल बोलले आणि त्या अनुषंगाने NGMAच्या चित्रप्रदर्शनाबाबतच्या बदलणाऱ्या धोरणांवर टीका केली.
तेव्हा त्यांना भाषण मध्येच थांबवायला सांगितलं. मंचावर उपस्थित असलेल्या आयोजक आणि समन्वयकांनी त्यांना "तुम्ही हे बोलू शकत नाही. कृपया बर्वेंबद्दलच बोलावे," असं त्यावेळी सांगितलं.
दरम्यान या सगळ्या घडल्या प्रकराबद्दल अमोल पालेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली.
"मी ज्या मुद्द्यांवर बोललो ते त्या कार्यक्रमाचं औचित्य किंवा कार्यक्रमाला अनुसरून नव्हतं, असं सांगत NGMAच्या डायरेक्टरांनी मला माझं भाषण थांबवायला सांगितलं. भाषणासाठी बोलावलं तेव्हा बर्वे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रमात काय बोलू नये याविषयी त्यांनी सांगितंल नव्हतं. पण मी कार्यक्रमाविषयीच बोलत होतो त्यामध्ये काय चुकीचं होतं, असा सावल त्यांनी उपस्थित केला आहे.
NGMAच्या 5 मजली इमारतीच्या वापराबाबत काही बदल केले होते त्याविषयी पालेकर यांनी मत व्यक्त केलं.
तसंच आमच्याकडं मोबाईल होते म्हणून हे आपल्या समोर आलं. नाहीतर हा प्रकार लोकांसमोर आला नसता, असं मत यावेळी संध्या गोखले यांनी व्यक्त केलं.
तसंच जेसल ठक्कर आपल्याला म्हणाल्या की, 'मला डायरेक्टर कडून सांगण्यात आल होत की गव्हर्नमेंट विरोधात काही बोललं जाऊ नये,' असा दावा सुद्धा अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी केला आहे. जेसल ठक्कर या कार्यक्रमाच्या आयोजक होत्या.
"NGMAमध्ये झालेल्या भाषणापूर्वी मला संचालकाकडून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. याउलट संचालकाना सरकारकडून पालेकरांना सरकार विरोधी बोलू देऊ नये अशी भूमिका घेतली. असं असताना भाषणापूवी कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. म्हणजे मी काय भाषण करायचे हे अगोदर संचालकांना दाखवायचे होते का? हे एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला नव्हे का," असंही पालेकर यांनी म्हटलं आहे.
"NGMA बाबात घडलेली घटना ही संपूर्ण कलाक्षेत्राला खंत वाटावी अशी आहे, सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, बोललात तर तुम्ही देशद्रोही, अशा प्रकारची नवी संस्कृती जिला केवळ हुकुमशाही हे एकच नाव आहे, ती देशात निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्या इतर गटांकडून केला जात आहे. त्यांना विरोध करण्याची गरज आहे," अशी प्रतिक्रिया कलाकार संजिव खांडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.
पालेकर नेमकं काय बोलले?
प्रभाकर बर्वे हे ज्येष्ठ चित्रकार होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना पालेकर यांनी गॅलरीच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली.
ते म्हणाले, "तुम्हाला कदाचित माहिती नसेल की स्थानिक कलाकारांच्या सल्लागार समितीने आयोजित केलेला हा शेवटचा कार्यक्रम असेल. नैतिकता जपणाऱ्या किंवा कलेद्वारे आपली विशिष्ट विचारसरणी बिंबवणाऱ्या सरकारच्या दलालांतर्फे नाही.
कारण 13 नोव्हेंबर 2018 ला मुंबई आणि बंगळुरू केंद्रातील स्थानिक सल्लागार समिती बरखास्त केली आहे, असं मला कळलं. मी याबद्दल अधिक माहिती घेत आहे.
आतापर्यंत मुंबई आणि बंगळुरू या केंद्रात भरणारी प्रदर्शनं ही या समितीच्या संमतीने भरवली जातात. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. हा कार्यकाळ संपल्यानंतर तिथे नवीन सदस्यांची नियुक्ती होते. यात प्रदर्शनाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी स्थानिक कलाकारांच्या हातात असते.
मला असं कळलं आहे की 13 नोव्हेंबरच्या निर्णयानंतर नवीन समितीची स्थापना करण्यात आलेली नाही आणि आता हे निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे घेतले जाणार आहेत."
"2017 मध्ये कोलकाता आणि नैऋत्य भारतात NGMA च्या काही नवीन शाखा उघडल्या आहेत. मुंबईच्या या जागेचा विस्तार होत आहे याचाही मला अतिशय आनंद आहे.
मात्र 13 नोव्हेंबरच्या निर्णयानंतर मात्र जे पेंटिंग NGMA च्या संग्रहातले नाहीत त्यांना एकूण जागेच्या 1/6 जागाच मिळेल असा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ या जागेच्या बाहेर नवीन किंवा ज्येष्ठ कलाकारांना त्यांचं काम प्रदर्शित करण्याची संधीच मिळणार नाही असा होतो का?
याच धोरणाला अनुसरून मेहली गोभाई आणि सुधीर पटवर्धन यांच्या चित्राचंही प्रदर्शन रद्द करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम रद्द केला नाही याबद्दल खरंतर या मंत्रालयाचे आभारच मानायला हवेत. सुधीर तू कितीही चांगला कलाकार असला तरी आम्हाला तू आवडत नाहीस."
"हे असे एकतर्फी निर्णय का घेतले जातात? हे बंधनं लावण्यामागे नक्की काय उद्देश आहे? कलेच्या स्वातंत्र्यावर हा घाला नाही का? ही या देशाच्या सार्वभौमत्वाची थट्टा नाही का? काही विशिष्ट कलाकारांचे आवाज दाबल्यामुळे आणखी एका संस्थेचा बळी गेला आहे.
NGMA (National Gallery of Modern Art) ही कलाकारांची पवित्र संस्था आहे. मात्र कलेच्या विरोधातल्या युद्धात या संस्थेचाही बळी गेला आहे. मी अतिशय व्यथित झालो आहे. हे कधी संपणार? स्वातंत्र्याचा हा समुद्र दिवसेंदिवस आटत आहे. आपण याबाबतीत का मौन बाळगून आहोत?"
पालेकर हे बोलत असताना त्यांना वारंवार थांबवण्यात आलं. "तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असंच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झालं होतं," असं म्हणत पालेकर यांनी समन्वयकांना नक्की काय हवंय, अशी विचारणाही केली. तेव्हा समन्वयकांनी त्यांना भाषण आटोपतं घ्यायला सांगितलं.
पालेकरांच्या भाषणानंतर NGMA च्या मुंबई शाखेच्या संचालिका अनिता रुपावतरम यांनी माईकचा ताबा घेतला. त्या म्हणाल्या, "ही नाण्याची एक बाजू आहे. आम्ही व्यथा मांडली नाही अशातला भाग नाही. तुम्ही हा मुद्दा सार्वजनिकरित्या न मांडता वैयक्तिक येऊन बोलला असता तर बरं झालं असतं."
'मंचाचा असा वापर नको'
सुहास बहुलकर NGMA स्थानिक कलाकारांच्या समितीचे अध्यक्ष आणि कालच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी या प्रकरणी बीबीसी मराठीशी संवाद साधला.
ते म्हणाले, "मी कालच्या समारंभाचा अध्यक्ष होतो आणि त्या आधी NGMAच्या स्थानिक कलाकारांच्या समितीचा अध्यक्ष होतो. आम्ही हे प्रदर्शन भरवावं असा आग्रह धरला होता. त्याआधी केंद्र सरकारने काही निर्णय घेतले होते.
अमोल पालेकर काल जे बोलले त्याबद्दल मी सर्व संबंधितांशी चार महिन्यांपूर्वी बोललो आहे. आमच्या समितीने अगदी सांस्कृतिक विभागाच्या सचिवांनाही इमेल केला आहे. अमोल पालेकरांनीही ही माहिती माझ्याकडून घेतली होती. कारण त्यांना याबाबतीत पूर्ण माहिती नव्हती."
"बर्वे हे फक्त कलेबद्दल बोलत असत. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देताना फक्त त्यांच्याबद्दल बोलावं अशी माझी भूमिका होती. त्यामुळे जेसल ठक्कर ज्या समारंभाच्या आयोजक होत्या. आधी त्यांनी मग संचालकांनी पालेकरांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
हे प्रदर्शन बर्वेंच्या चित्रांचं आहे त्यामुळे हे मुद्दे तुम्ही कसे आणू शकता असा प्रश्न विचारला. मात्र ते कार्यक्रमाच्या मूळ विषयापासून भरकटले. त्यांनी बर्वेंच्या प्रदर्शनात हा विषय आणल्यामुळे सगळं प्रदर्शन बाजूला झालं आणि हे मुद्दे महत्त्वाचे झाले आहेत. या मंचाचा असा वापर व्हायला नको होता, पालेकर या सगळ्या गोष्टी मंचावरून बोलल्यामुळे खळबळ माजली," असं बहुलकर पुढे म्हणाले.
प्रभाकर बर्वे यांचे निकटवर्तीय आणि चित्रकार दिलीप रानडे यांनी या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन 'दुर्दैवी बर्वे' अशा शब्दांत केलं.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
सोशल मीडियावर या प्रकरणी परस्पराविरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणते, "राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, सब बोले रात है, ये सुबह सुबह की बात है," अशा शब्दांत ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
ज्येष्ठ विचारवंत आणि Observer Research Foundation चे संचालक सुधींद्र कुलकर्णी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
"असहिष्णुता कुठे आहे?, सेन्सरशिप कुठे आहे? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर इथे आहे मी NGMA च्या संचालकांचा तीव्र निषेध करतो. हा अमोल पालेकरांचा अपमान असून कलाकारकांच्या स्वातंत्र्यावर घाला आहे."
उन्नावच्या माजी खासदार आणि समाजसेविका अनू टंडन म्हणतात की ही आताच्या काळातली असहिष्णुता आहे.
अनिता रुपवतारम या सनदी अधिकारी आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे सनदी सेवेचं नाव खराब होतं अशी प्रतिक्रिया सनदी अधिकारी आशिष जोशी यांनी मांडली आहे.
भवानी शंकर एम. एस या ट्विटर युजरने पालेकरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पालेकर काही बुद्धिवाद्यांच्या प्रभावाखाली आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.
तर रेड बन्डी नावाच्या एका ट्विटर युजरने प्रतिक्रिया दिली आहे की सरकारी कार्यक्रमातच सरकारच्या निर्णयावर टीका केली तर सरकार का खपवून घेईल?
याबाबत NGMAची अधिकृत प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ती येताच अपडेट केली जाईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)