अमोल पालेकर यांचं NGMAच्या कार्यक्रमातील भाषण मध्येच रोखलं #5मोठ्याबातम्या

सर्व महत्त्वांचे वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच मोठ्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1.अमोल पालेकर यांना भाषण करण्यापासून रोखलं

मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण मध्येच थांबवण्यात आलं. 'द वायर' वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

प्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी, आर्ट गॅलरीने आपलं स्वातंत्र्य कसं गमावलं, याबद्दल पालेकर बोलत होते.

पालेकर यांनी गॅलरीच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या आयोजक आणि समन्वयकांनी त्यांना भाषणाच्या मध्येच टोकायला सुरुवात केली. "तुम्ही हे बोलू शकत नाही. कृपया बर्वेंबद्दलच बोलावे," असं त्यांना यावेळी सांगण्यात आलं.

"तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असंच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झालं होतं," असं म्हणत पालेकर यांनी समन्वयकांना नक्की काय हवंय, अशी विचारणाही केली. तेव्हा समन्वयकांनी त्यांना भाषण आटोपतं घ्यायला सांगितलं.

याबद्दल सोशल मीडियावरही बरीच प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेससह अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

2. जातपडताळणी समित्या बंद करण्याचा निर्णय

सर्व जात पडताळणी समित्या गुंडाळून ती देण्यासाठी सुटसुटीत पद्धत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यात जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रकिया वेळखाऊ असते. या त्रासातून हजारो लोकांची सुटका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची बातमी लोकमतने दिली आहे.

जात प्रमाणपत्र कायद्यात सुधारणा केली जाईल. त्यानुसार ज्या प्रमाणपत्रांबाबत तक्रारी असतील त्यांचीच सुनावणी केली जाईल.

आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात तक्रारींची प्रकरणं प्राधिकरणाकडे पाठवण्याची व्यवस्था आहे. तीच व्यवस्था राज्यात आणण्याचा मुख्यमंत्र्याचा विचार असल्याचंही या बातमीत पुढे म्हटलं आहे.

3.संसदीय समितीचे आदेश ट्विटरने धुडकावले

ट्विटरवर उजव्या विचारसरणीच्या पोस्टवर सेन्सॉरशिप लादली जात आहे, असे आरोप झाल्यानंतर सरकारने ट्विटरच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राबाबतच्या संसदीय समितीपुढे हजर होण्याचे आदेश दिले होते.

ट्वटिरचे मुख्याधिकारी जॅक डॉर्सी आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतीत 11 फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र कंपनीच्या मुख्यालयातून दिल्लीत हजर होण्यासाठी हा वेळ अपुरा असल्याचं ट्विटरने सांगितलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या रक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळीचा ठरला आहे. त्यासाठी या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

4. तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या

तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात सरस्वती पूजा मंडपात अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आल्याची बातमी इंडिया टुडेने दिली आहे.

बिस्वास कृष्णागंज मतदारसंघातून आमदार आहेत. भरदिवसा जमावासमोर त्यांची हत्या करण्यात आली आहे.

जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घटनास्थळी उपस्थित होते. हा हल्ला भाजपतर्फे घडवून आणल्याचा आरोप सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, दोषींनी कठोर शिक्षा व्हावी, असं भाजपने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

5. कोलकाता आयुक्तांची सात तास चौकशी

सार कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची 7 तास 15 मिनिटं चौकशी करण्यात आल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

CBIने त्यांची शिलाँग येथे दोन टप्प्यात चौकशी केली आहे. या संपूर्ण चौकशीत शारदा घोटाळ्याशी संबंधित विविध घटनांवर आधारित होती. हा घोटाळा 2013 मध्ये सुरू झाला होता. तेव्हा कुमार बिधानगर येथे पोलीस आयुक्त होते.

CBI अधिकाऱ्यांच्या मते त्याच काळात काही कागदपत्रं गहाळ झाली होती.

याच प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी CBI विरुद्ध ममता बॅनर्जी असा वाद झाला होता. CBI हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशांवरून चौकशी करत असून, यामागे त्यांचा राजकीय हेतू आहे, असं ममता बॅनर्जी यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी काही काळ धरणे आंदोलनही केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)