मुंबईत अचानक कडाक्याची थंडी कुठून आली?

भारतीय हवामान खात्यानुसार (IMD)फेब्रुवारी महिन्यात मुंबईनं गेल्या दशकातील सर्वाधिक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतला आहे.

मुंबईतल्या कुलाबा येथे आज (शनिवार) सकाळी तामपान 15.6 C, तर सांताक्रूझ येथे 11.0 C तापमानाची नोंद झाली आहे, असं IMDचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी असं ट्वीट केलं आहे.

"गेले दोन दिवस मुंबईसाठी सर्वाधिक थंडीचे ठरले आहेत. यामुळे बेस्ट आणि ट्रेनच्या खिडक्या बंद आहेत, लोकांनी जॅकेट बाहेर काढले आहेत, संध्याकाळच्या वेळी अनेक ठिकाणी शेकोटी पेटवण्यात आली आहे, चहावाल्याकडे गर्दी होत आहे, मुंबईकर सध्या हिवाळा एन्जॉय करत आहे," असं त्यांनी ट्वीट केलं आहे.

मिड डेच्या बातमीनुसार, मुंबईमध्ये यापूर्वी सर्वाधिक कमी तापमानाची नोंद 2014च्या फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईतील तापमान 26.30C इतकं होतं.

स्कायमेट या संस्थेनं ट्वीट करत म्हटलं आहे की, "4 फेब्रुवारीला मुंबईतील तापमान 35 °C होतं. पण ते अधिक झपाट्यानं कमी होत आहे."

मुंबईत ही परिस्थिती का?

मुंबईच्या तापमानात बदल का होत आहे, याबाबत के. एस. होसाळीकर म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणारे थंड वारे मुंबईवरच्या आकाशात आहेत. देशाच्या वायव्य भागात हवेच्या दाबात कमालीचा फरक पडल्याने उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट पसरली आहे."

"उत्तर भारतातून आलेल्या या वाऱ्याच्या जास्त वेगामुळे पाऱ्यानं विक्रमी नीचांक गाठला आहे. रविवारपर्यंत तापमान सामान्य स्थितीत येईल," असं त्यांनी पुढे सांगितलं.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

दरम्यान, मुंबईतील बदलत्या तापमानामुळे #MumbaiWinters, #mumbaiweather हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.

अभिनेता इम्रान हाश्मीनं सकाळच्या जॉगिंगचा फोटो ट्वीट केला आहे.

तर अभिनेत्री तापसी पन्नू हिनं मुंबईतल्या थंडीचं वर्णन 'Under my umbrella....' असं केलं आहे.

"मुंबईत आता खरंच हिवाळा आहे, असं वाटत आहे. मला हे वातावरण आवडत आहे," असं हुमैरा यांनी ट्वीट केलं आहे.

तर "मी मुंबईत आहे, यावर मला अजिबात विश्वास बसत नाहीये. मला असं वाटतंय की, मी शिमल्यात आहे," असं प्रणय यांनी ट्वीट केलं आहे.

सचिन यांना मात्र ते मुंबईत नाहीत तर महाबळेश्वरला असल्यासारखं वाटत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)