ममता बॅनर्जी विरुद्ध CBI : नरेंद्र मोदींवर आरोप करत ममतांची आंदोलनाची घोषणा

पश्चिम बंगालमध्ये बहुचर्चित शारदा चिटफंड घोटाळ्यातील चौकशीवरून नाट्मय घटना घडल्या असून कोलकाता पोलीस आणि CBIमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

CBIचं एक पथक कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करायला गेलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं . त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पोलीस आयुक्तांच्या घरी पोहोचल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेले बीबीसी प्रतिनिधी अमिताभ भट्टासाली यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की CBI अधिकाऱ्यांना सध्या पोलीस ठाण्यात थांबवून ठेवलेलं नाही.

ममता बॅनर्जी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या, "माझ्या घरीही CBIचं पथक पाठवलं जात आहे. 2011मध्ये आमच्या सरकारने चिटफंड घोटाळ्यात चौकशी सुरू केली होती. आम्ही गरिबांचे पैसे परत केले होते. दोषी लोकांना पकडण्यासाठी आम्ही एका समितीची स्थापना केली होती. डाव्या पक्षांच्या कार्यकाळात या घोटाळ्याची सुरुवात झाली होती तेव्हा त्याची चौकशी का झाली नाही?

"मी राज्यघटना वाचवण्यासाठी मेट्रो सिनेमाच्या समोर निदर्शनं करेन. मी दु:खी आहे. मी घाबरणार नाही. देशातील लोक मला पाठिंबा देतील असा मला विश्वास आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.

सोमवारी पश्चिम बंगालच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की त्या फोनवरून अधिवेशनात भाग घेतील.

ममता म्हणाल्या, "CBI अधिकाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून काहीतरी करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा लोक चिटफंडाचं नाव घ्यायला सुरुवात करतात. हे सगळं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालच करत आहे."

ममता बॅनर्जी म्हणतात, "माझ्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबलं. मी हा अपमानही सहन केला. मी राज्याची प्रमुख आहे त्यामुळे सगळ्यांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांकडे विना वॉरंटचं जाता. तुमची इतकी हिंमत कशी झाली? मी सगळ्या पक्षांना आवाहन करते की केंद्र सरकारविरुद्ध एकजूट व्हावं लागेल."

PTI वृत्तसंस्थेनुसार पोलीस आयुक्त या घोटाळ्यासंबंधी एका विशेष पथकाचं नेतृत्व करत होते आणि CBIला काही फायली आणि दस्तावेजांसंदर्भात त्यांची चौकशी करायची होती.

वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की अनेकदा नोटीस पाठवूनही पोलीस आयुक्त CBIच्या समोर आले नाहीत.

आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी CBI च्या कारवाईसाठी साधारणपणे जी संमती असते ती मागे घेतली होती. दोन्ही राज्यांचा आरोप होता की केंद्र सरकार CBIचा गैरवापर करत आहे.

ममता बॅनर्जी यांनी रविवारी सकाळी या प्रकरणात पोलीस आयुक्तांचा बचाव केला होता. तसंच भाजपवर CBI चा गैरवापर केल्या आरोप लावला होता.

भाजपची राष्ट्रपती राजवटीची मागणी

ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी एक ट्वीटही केलं होतं. त्या लिहितात, "कोलकाता पोलीस आयुक्त उत्कृष्ट अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि धैर्याबद्दल प्रश्न उपस्थित करू शकत नाही. ते रात्रंदिवस काम करतात. त्यांनी नुकतीच फक्त एक दिवस सुटी घेतली होती. तुम्ही जेव्हा एखादी खोटी गोष्ट पसरवता तेव्हा ती खोटीच असते."

केंद्रीय राज्यमंत्री आणि असनसोलचे भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी बीबीसी हिंदीशी संवाद साधला.

ते म्हणाले, "पश्चिम बंगालची परिस्थिती चिघळली आहे. भाजप खासदार आणि एक नागरिक म्हणून मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहे. ये राजकारण नाही. उलट भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईचा हा मुद्दा आहे."

ते पुढे म्हणाले, "मला हे समजत नाही की हजारो कोटींचा रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी का करू नये? पोलीस आयुक्त असो किंवा आणखी कोणता अधिकारी असो त्यांची चौकशी का करू नये? त्यांनी पुराव्यांशी छेडछाड केली आहे. त्यांच्यावर आरोप आहेत तर त्यांची चौकशी का करू नये? नोटिस पाठवल्यावरही राजीव कुमार पोहोचले नाही तर त्याचं उत्तर द्यावं लागेल. हे भाजप किंवा तृणमूल काँग्रेस नाही. ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई आहे."

कोलकाता पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या प्रकरणी ट्विट केलं. "प्रसारमाध्यमात अशा बातम्या येत आहे की राजीव कुमार तीन दिवस कार्यालयात येत नाहीयेत. कोलकाता पोलीस या बातम्यांचं खंडन करते. फक्त 31 जानेवारी सोडून ते सगळे दिवस कार्यालयात येत आहेत."

सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये या प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपवली होती. राजीव कुमार यांना 2016 साली पोलीस आयुक्त केलं होतं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट केलं. ते म्हणतात, "मोदींनी लोकशाही आणि सार्वभौमत्त्वाची थट्टा आहे. काही वर्षांआधी मोदींनी लाचलुचपत प्रतिबंधक शाखेवर कब्जा मिळवला होता. मोदी-शहा ही जोडगोळी लोकशाहीसाठी धोकादायक आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो."

शारदा चिटफंड घोटाळा काय आहे?

शारदा कंपनीची सुरुवात जुलै 2008मध्ये झाली. या कंपनीची मालमत्ता बघता बघता कोट्यवधी रुपयांची झाली. या कंपनीत सर्वसामान्य लोकांनी गुंतवणूक केली होती. तर कंपनी परतावा देण्यात अपयशी ठरली.

अशा प्रकारच्या कंपन्यांत कंपनीचे एजंट दोन जणांकडून पैसे घेतात आणि पुढच्या वर्षी या लोकांचे पैसे परत देण्यासाठी 3 लोकांकडून पैसे घेतात. अशाप्रकारे ही साखळी वाढत जाते. पण नकारात्कम प्रचार सुरू झाला तर लोक अशा कंपन्यात पैसे गुंतवणे बंद करतात आणि कंपनी बंद पडते. शारदा चिट फंडबद्दल असंचं घडलं.

या कंपनीचे मालक सुदिप्तो सेन यांनी राजकीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी माध्यमांत बराच पैसा खर्च केला आणि राजकीय नेत्यांशी संबंध ही प्रस्थापित केले. काही वर्षांतच ते कोट्यधीश झाले. शारदा ग्रुपच्या विरोधात पहिला गुन्हा नोंद झाला तो 16 एप्रिल 2013ला. त्यानंतर सेन फरार झाले. त्यांना काश्मीरमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर कंपनी ठप्प झाली.

2014ला सुप्रीम कोर्टाने शारदा चिट फंड घोटाळ्याचा तपास CBIला सोपवण्याचे आदेश दिले. पण पश्चिम बंगला सरकारने हा तपास CBIकडे हा तपास देण्यास विरोध केला आहे.

रोझ व्हॅली चिट फंड

रोझ व्हॅली या कंपनीने सर्वसामान्यांकडून 17,000 कोटी जमवले होते. यातील बरेच गुंतवणूकदार पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील आहेत.

कंपनीचे मालक गौतम कुंडू त्रिपुराचे आहेत. त्यांचे भाऊ, वहिनी आणि पुतण्या एका अपघातात मृत्युमुखी पडले. या अपघातात फक्त चालक बचावला. हा अपघात एक रहस्य बनला आहे.

या समुहाची माध्यमांत आणि चित्रपट निर्मितीत गुतंवणूक आहे.

रोझ व्हॅलीवर आरोप आहे की या कंपनीने बेकायदेशीरपणे लोकांकडून पैसे गोळा केले आणि त्यातील बरेच पैस बेकायदेशीरपणे काढून घेतले. यातील बराच पैसा परदेशातही पाठवला असल्याचा आरोप आहे.

कुंडू यांच्यावर आरोप आहे की त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांना हाताशी धरत जमवलेल्या पैशाचा काही भाग परदेशात पाठवला. यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या काही नेत्यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे.

तृणमूल काँग्रेसच्याकाही नेत्यांवर आरोप आहे की त्यांनी सरकारी संस्थाच्या मदतीने पैसे गुंतवण्यास कुंडू यांना मदत केली होती. असा आरोप आहे की या बदल्यात त्यांना बऱ्याच महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या.

सक्तवसुली संचलनालयाने मार्च 2015ला गौतम कुंडूं यांना अटक केली. CBIने त्यांच्यावर 2016ला आरोप निश्चित केले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)