लोकसभा 2019: ममता बॅनर्जींच्या कोलकात्यात विरोधकांचा मोदी सरकारवर कडाडून हल्ला

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निमंत्रणावरून देशभरातील विरोधी नेते भाजपविरोधात कोलकात्यात एकत्र आले आणि नरेंद्र मोदी सरकारवर कडाडून हल्ले केले.

मे महिन्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 'युनायटेड इंडिया रॅली'ला मोठं महत्त्व आलं आहे. या रॅलीला देशभरातल्या विविध प्रादेशिक पक्षांचे नेते आले आहेत, ज्यात प्रामुख्याने आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, तेलुगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे H. D. कुमारस्वामी, हे अनुक्रमे दिल्ली, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. तसंच अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगोंग अपांग, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, DMKचे नेते MK स्टॅलिन आले आहेत.

तसंच गुजरातचे पटेल नेते हार्दिक पटेल आणि दलित आमदार जिग्नेश मेवाणी सुद्धा यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी ममता यांचं निमंत्रण स्वीकारलं होतं खरं, पण त्यांनी स्वतः या कार्यक्रमात सहभागी न होता पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि अभिषेक मनू सिंघवी यांना पाठवलं.

कोण काय म्हणाले?

शरद पवार

"बेरोजगारी वाढत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. या गोष्टींना जबाबदार असणाऱ्यांना फेकून दिलं पाहिजे," असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोलकाता येथे झालेल्या रॅलीत केलं.

"पंतप्रधानपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानपदासाठी त्यांच्यामध्ये भांडणं होतील. आपल्याला या देशाचं भविष्य बदलावं लागणार आहे," असं पवार यावेळी म्हणाले.

त्यांनी त्यांचं भाषण 'जय हिंद, जय बांगला' म्हणत संपवलं.

शत्रुघ्न सिन्हा

भाजपचे बिहारमधील खासदार आणि याआधीही पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की "यापूर्वी मी कधीही इतकी जानदार, शानदार आणि दमदार" रॅली पाहिली नव्हती.

मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस

"पंतप्रधान म्हणतात की 'ना खाऊंगा ना खाने दूंगा'. पण ते अदानी आणि अंबानी यांना देत आहेत. दोन कोटी रोजगार निर्माण करू, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं?" असा सवाल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारला आहे.

अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी

"जर 2019 मध्ये मोदी-शहा परत सत्तेत आले, तर देशाची वाट लावतील. ते देशाचे तुकडे करती. हिटलरने केलं होतं, तसं ते देशाची राज्यघटना बदलून निवडणुकाच हद्दपार करतील. आपल्याला त्याला उखाडून फेकावं लागेल," असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

"या सरकारच्या काळात शेतकरी, महिला, सर्वांवरच अत्याचार होत आहेत. दलितांचा छळ होतोय, मुस्लिमांना ठेचून मारलं जातंय," असं केजरीवाल म्हणाले.

सतीश मिश्रा, बसप नेते

या रॅलीमध्ये बसपच्या प्रमुख मायावती या उपस्थित नाहीत, पण बसप नेते सतिश मिश्रा या रॅलीला आले आहेत. ते म्हणाले "उत्तर प्रदेशात बसप आणि सप एकत्र आले आहेत. दलितविरोधी आणि अल्पसंख्यांकाविरोधातल्या सरकारला उखडून टाकण्याची वेळ जवळ आली आहे. भाजपचे सरकार पाडून डॉ. आंबेडकरांची राज्यघटना सुरक्षित ठेवण्याचं काम या 'यशस्वी' रॅलीमुळे झालं आहे," असं ते यावेळी म्हणाले.

'दीदीं'चं शक्तिप्रदर्शन

कोलकत्यातील बीबीसीचे प्रतिनिधी अमिताभ भट्टासाली सांगतात, "या रॅलीत सहभागी होण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. ममता बॅनर्जी यांना या रॅलीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करायचं आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी त्यांनी कोणतीही उणीव ठेवलेली नाही."

ममता बॅनर्जी यांनी या रॅलीचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीचा अस्ताची सुरुवात असा केला आहे. तर भाजप नेते या रॅलीचा उल्लेख थकलेल्या विरोधी पक्षांचं एकत्र येणं असा केला आहे. भाजपचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, "अशा प्रकारचे मोर्चे, शक्तिप्रदर्शन पश्चिम बंगालने पूर्वीही पाहिलेलं आहे. डाव्या आघाडीनेही विरोधी पक्षांना एकत्र बोलवून रॅली ठेवल्या होत्या. पण आज ते कुठे आहेत? फक्त भाजपला विरोध आणि मोदींची भीती यामुळे ते एकत्र आले आहेत."

राहुल आणि मायावती यांची गैरहजेरी

देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते या रॅलीत सहभागी होत असताना 2 नेत्यांची गैरहजेरी मात्र नजरेत भरणारी असेल. काँग्रेस नेते राहुल गांधी या रॅलीत सहभागी होणार नाहीत. काँग्रेसच्या वतीने मल्लीकार्जुन खर्गे या रॅलीत सहभागी होतील. तर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही त्यांचा प्रतिनिधी या रॅलीसाठी पाठवला आहे.

पंतप्रधान पदाचे दावेदार असणारे महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येऊ इच्छित नाहीत, असा याचा अर्थ आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिनी नायक म्हणाल्या, "ज्या पक्षाचं सर्वाधिक संख्याबळ त्या पक्षाचा पंतप्रधान पदावर दावा असेल, ही काँग्रेसची भूमिका आहे. मोठ्या राजकीय पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो. अंतिम निर्णय जनताच घेणार आहे."

त्या म्हणाल्या, "त्या त्या राज्यातील परिस्थिती पाहून आम्ही आघाडीचा निर्णय घेत आहोत. काही ठिकाणी निवडणुकीनंतर तर काही ठिकाणी निवडणुकांआधी आघाडी होईल."

तर दुसरीकडे मायावती यांच्या अनुपस्थितीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. बसपचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया म्हणाले, "बसप या रॅलीमध्ये सहभागी होत आहे. या देशाला सांभाळण्यासाठी आमचा पक्ष आहे. दलित, गरीब, मागास आणि सर्व धर्मांतील लोकांना सर्वाधिक प्रेम मायावती यांच्याबद्दलच आहे."

ते म्हणाले, "पंतप्रधानपदाची इच्छा असणं यात काही चुकीचं नाही. कोलकातामध्ये विरोधी पक्षांची एकजूट पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी नाही तर मोदींना विरोध करण्यासाठी होत आहे."

असं असलं तरी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या रॅलीतून विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी काही नवीन सूत्र जन्माला येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)