You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : 'हिंदू - मुस्लीम ध्रुवीकरण हाच लोकसभा निवडणुकीचा खरा मुद्दा'
- Author, राजेश जोशी
- Role, संपादक, बीबीसी हिंदी रेडिओ
काही मुस्लीम विचारवंतांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी एका उर्दू वृत्तपत्रात मथळा झळकला - 'होय, काँग्रेस मुसलमानांचा पक्ष आहे.'
हा मुद्दा उचलून भाजपने बाजी मारली आहे. काँग्रेस मुस्लीम पुरुषांचा पक्ष आहे का, अशी विचारणा राहुल गांधी यांना करत नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.
उत्तर भारतात एक म्हण आहे, 'कौवा कान उडा ले गया.' याचा अर्थ असा की, कावळ्याने कान नेला बघा, अशी बतावणी कोणी तरी करत आणि लागोलाग इतर लोक कावळा कुठे उडून गेला, कान कुठे गेला, कावळा कोणत्या फांदीवर बसला, हे शोधू लागतात. पण हा कावळा अस्तित्वातच नसतो आणि कानही जागच्या जागी असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना काँग्रेस मुसलमान पुरुषांचा की महिलांचा पक्ष आहे, हे जाहीर करावं असं म्हटलं तेव्हा त्यामुळे या म्हणीची प्रचिती येत आहे.
पंतप्रधानांच्या टीकेवर आता राहुल गांधी यांनी खुलासा करणं सुरू केलं आहे. ते सांगत आहेत त्यांनी फक्त मुस्लिमांना न्याय देण्याची भाषा केली होती आणि उर्दू वृत्तपत्र इन्कलाबने त्यांचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मोडतोड करत छापला.
पण कावळा तर कान घेऊन उडाला होता.
सुरुवातीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं की कावळा कान घेऊन उडाला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आझमगड इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीर केलं बंधूंनो आणि भगिनींनो कावळा कान घेऊन उडाला.
कावळा कान घेऊन का उडाला? सध्या तो कोणत्या फांदीवर बसला आहे? हे शोधणं आता सर्वांची जबाबदारी.
सहाजिकच सगळे आता त्या कावळ्याच्या शोधात फिरत आहेत.
लोकसभा निवडणुकींना अजून एक वर्षाचा कालवधी आहे. परंतु नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रणशिंग फुंकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना त्यांच्या नावाने संबोधित करणं बंद केलं आहे. यावेळी ते त्यांना युवराज नाही तर 'श्रीमान नामदार' असं म्हणत आहेत.
ही सगळी चाहूल आहे, येत्या लोकसभा निवडणुकीची. चाहूल कुठली गडगडाटच म्हणावं लागेल.
नियंत्रण आमचं पण जबाबदार काँग्रेसच
केंद्रात भाजपचं सरकार आहे. देशातील 22 राज्यांत भाजप सत्तेत आहे. पोलीस, लष्कर, गुप्तचर संस्थांवर भाजपचं नियंत्रण आहे. तरीही देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019पर्यंत या देशात होणाऱ्या कोणत्याही संभाव्य धार्मिक हिंसाचाराला अॅडव्हान्समध्येच काँग्रेसला जबाबदार ठरवून टाकलं आहे.
त्या म्हणाल्या, "जर काँग्रेसला 2019च्या निवडणुका धर्माच्या आधारावर लढवायच्या असतील तर धार्मिकदृष्ट्या संवेदनशील भागात तणाव निर्माण होईल, अशी आम्हाला भीती आहे. तसं झालं तर त्याला काँग्रेस जबाबदार असेल."
शुक्रवारी झालेली सीतारामन यांची पत्रकार परिषद आणि शनिवारी आझमगड इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण यावरून स्पष्ट दिसून येतं की 2019च्या लोकसभा निवडणुकीचा जाहीर केलेला मुद्दा जरी विकासाचा असला तरी प्रत्यक्षात निवडणूक ही हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणावरच लढवली जाणार आहे.
भारतीय जनता पक्षाने वाजत गाजत याची सुरुवात केली आणि काँग्रेसच्या आधी एक चाल करत आरोपही केला की काँग्रेसला ही निवडणूक धर्माच्या आधारावर लढवायची आहे.
काँग्रेस मुसलमानांचा पक्ष आहे?
या प्रकरणाला सुरुवात झाली दैनिक जागरण समूहाच्या 'डेली इन्कलाब' या उर्दू वृत्तपत्राच्या एका बातमीनं.
काही मुस्लीम विचारवंतांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी या वृत्तपत्रात मथळा झळकला - 'होय, काँग्रेस मुसलमानांचा पक्ष आहे.'
आता ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनल, कोणत्याही राष्ट्रीय वृत्तपत्रात छापली नसली तरी राजकारणच्या रसाने काठोकाठ भरलेल्या या वृत्तपत्रातील बातमीतून राजकीय रस पिळून काढण्याची संधी भारतीय जनता पक्ष कशी सोडेल. नरेंद्र मोदी ब्रॅंड राजकारणात अशा बातम्या छापून आल्या आणि त्याकडे दुर्लक्ष झालं असं कधी होईल का?
खरोखर मुस्लीम विचारवंतासमवेत झालेल्या भेटीत राहुल गांधी यांनी काँग्रेसला मुसलमानांचा पक्ष म्हटलं होतं का?
हे काँग्रेसच्या ध्यानीमनी यायच्या आधीच प्रथम दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री आणि भाजप नेत्या सीतारामन यांनी या वृत्तपत्राच्या पानाचा भाला करून तो काँग्रेसवर फेकला. तर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाल्याला आणखी धार देत टोकदार केलं.
मोदींची टीका
आझमगढ इथं शनिवारी झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, "श्रीमान नामदारांनी म्हटलं आहे की, काँग्रेस मुस्लिमांचा पक्ष आहे. मला याचं जराही आश्चर्य नाही वाटत. यापूर्वी मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा स्वतः मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की, देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे. मला काँग्रेसच्या नामदारांना विचार विचारायचं आहे - काँग्रेस पक्ष मुसलमानांचा आहे, हे जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर तुम्हाला शुभेच्छा. पण तुम्ही सांगा की मुसलमान पुरुषांचा की मुसलमान महिलांचा?"
भारताच्या इतिहासात बहुतेक प्रथमच एखाद्या पंतप्रधानांनी मुस्लिमांबद्दल कथित सहानुभूतीला एक गुन्हा म्हणून समोर ठेवलं आहे. आणि सरळ सरळ जाहीर करून टाकलं की जर काँग्रेसला मुसलमानांचा पक्ष होणं योग्य वाटत असेल तर त्यांना शुभेच्छा. त्यांच्या आधी दिल्लीत सीतारामन यांनी प्रश्न विचारला - काँग्रेस मुसलमानांचा पक्ष आहे, असं जर राहुल गांधी म्हणाले असतील तर ते राज्यघटनेच्या विरोधात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत तरी पत्रकार परिषद न घेतल्याने पत्रकारांच्या प्रश्नांना समोर जाण्यापासून स्वतःला वाचवलं आहे. पण निर्मला सीतारामन यांना कोणत्याही पत्रकाराने विचारलं नाही की, भारतीय जनता पक्ष हिंदूंच्या हिताचं समर्थन करते का? भारतीय जनता पक्ष हिंदू समर्थक पक्ष नाही, असं त्या म्हणू शकतात का?
काँग्रेस जसं आतापर्यंत प्रत्येक पावलावर नरेंद्र मोदी यांच्या भाजपसमोर पराभूत होत आली आहे, तसंच आताही या मुद्द्यावरही काँग्रेस मागे पडली आहे. राहुल गांधी गुंतून पडतील आणि त्यांना खुलासा करणं भाग पडेल, अशी एकही संधी भाजप सोडत नाही.
काँग्रेसची प्रतिक्रिया काय?
जेव्हा दिल्ली आणि आझमगढ इथं भाजपने ढोल ताशांच्या गजरात जाहीर केलं की कावळा कान घेऊन उडून गेला आहे. यावर काँग्रेसने काय केलं?
तर काँग्रेसने ट्वीट केलं, "पंतप्रधान भारताच्या जनतेशी सातत्याने खोटं बोलत आहेत. असुरक्षेच्या भावनेनं त्यांच्या मनाला घेरलं आहे. मोदी तुम्ही कोणत्या गोष्टींना घाबरत आहात?"
काँग्रेस पक्षाने त्यांचे एक प्रवक्ते शक्तीसिंह गोहील यांच्यातर्फे म्हणून घेतलं, "कोणत्या तरी एका लहान वृत्तपत्रात काही तरी स्वतः छापून आणणं आणि त्या बातमीची सत्यता न पडताळताच अशा प्रकारची वक्तव्य करणं हे पंतप्रधानांसाठी अशोभनीय आहे. उद्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही तरी छापून आणूण तसं वृत्तपत्रात आलं आहे, असं मी म्हणावं का?"
एकीकडे भाजपचे सर्वांत शक्तिशाली नेते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन काँग्रेसवर मुस्लीम राजकारणाचा आरोप करत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने शक्तीसिंह गोहील म्यांव म्यांव करत आहेत.
असो जाऊ द्या, काँग्रेसमध्ये तसंही कोण मोठा नेता आहे म्हणा?
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)