सोनिया गांधी हिंदूविरोधी आहेत असं प्रणव मुखर्जी खरंच म्हणाले होते का?

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हिंदूंचा तिरस्कार करतात असे उद्गार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले होते असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. काय आहे सत्य?

सोशल मीडियावरच्या उजव्या विचारसरणीच्या ग्रुप्समध्ये एक प्रक्षोभक आणि भावना भडकवणारा लेख वेगाने फिरतो आहे.

लेखाचं शीर्षक आहे- सोनिया गांधी हिंदूंचा तिरस्कार करतात-प्रणव मुखर्जींचं प्रतिपादन

गेल्या काही दिवसात भाजपचा पाठिंबा असलेल्या व्हॉट्सअपग्रुप्सवर हा लेख सैरावैरा फॉरवर्ड केला जात आहे. फेसबुक आणि ट्वीटरवरही हा लेख झपाट्याने शेअर होतो आहे.

काहींनी वेबसाईट्सच्या लिंकही दिल्या आहेत. पोस्टकार्ड न्यूज, हिंदू एक्झिबिशन, परफॉर्म इन इंडिया या अशा वेबसाईट्सनी या फेक लेखाला प्रसिद्धी दिली आहे.

प्रणव मुखर्जींनी आपल्या पुस्तकात सोनिया गांधी हिंदूंचा तिरस्कार करतात असं लिहिलं आहे अशा आशयाचे लेख या वेबसाईट्सनी गेल्यावर्षी अपलोड केले होते.

सोशल मीडियावर गेल्यार्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये या वेबसाईट्सच्या लिंक शेअर होत असल्याचं रिव्हर्स इमेज सर्चद्वारे सिद्ध झालं.

सात पुस्तकं नावावर असणाऱ्या प्रणव मुखर्जींनी सोनिया गांधी यांच्याबद्दल 'द कोअलिशन इयर्स' या 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात खरंच असं लिहिलं आहे का?

या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी, आम्ही प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याशी संवाद साधला. त्या प्रणब मुखर्जींच्या कार्यालयाचंही काम पाहायच्या.

सोनिया गांधी हिंदूंचा तिरस्कार करायच्या अशा आशयाचं कोणतंही लिखाण प्रणव मुखर्जी यांनी केलेलं नाही असं त्यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आलं. ही बातमी पसरवणाऱ्या लेखांमध्ये कोणतंही तथ्य नाही, प्रपोगंडा गळी उतरवण्यासाठी असं भासवलं जात आहे.

7 जून 2018 रोजी प्रणब मुखर्जी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शर्मिष्ठा यांनी 6 तारखेला ट्वीट करून वडील प्रणब यांना इशारा दिला होता.

शर्मिष्ठा यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, ''लोक तुमचं भाषण विसरतील. तुम्ही संघाच्या व्यासपीठावर असल्याचे फोटो आणि व्हीडिओ वेगाने शेअर आणि फॉरवर्ड केले जातील. चिथावणीकारक मेसेजद्वारे तुमचे फोटो, व्हीडिओ शेअर केले जातील. नागपूरला संघाच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संशयास्पद आणि फेक बातम्या पसरवण्यासाठी आवतण देत आहात''.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)