सोशल : सोनिया गांधींची कारकीर्द? काही म्हणतात 'बकवास', काहींसाठी 'मोदी सरकारपेक्षाही बरी'!

सोनिया गांधींचा शनिवारी 71वा वाढदिवस आहे. शिवाय त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदाची कारकीर्दही संपुष्टात येत आहे.

सोनिया यांच्यानंतर राहुल गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित आहेच.

त्यामुळे आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना आज विचारलं की त्यांना सोनिया गांधींच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना 19 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काय वाटतं?

अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली. त्यातलीच ही काही निवडक मतं.

सोनिया गांधींची राजकीय कारकीर्द अगदीच यशस्वी आहे असं म्हणता येणार नाही. पण अपयशीही म्हणता येणार नाही, या आशयाचं ट्वीट शशांक एच. यांनी केलं आहे.

ते पुढे लिहितात, "सोनिया गांधीच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करताना एक गोष्ट नक्कीच ध्यानात घ्यायला हवी की, आपला मायदेश सोडून त्या पूर्णपणे नवीन देशात आल्या. त्या देशाचं राहणीमान, संस्कृती यांच्याशी समरूप होण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. मग साडी नेसणं असो वा हिंदी बोलणं."

विजय पोतदार यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली आहे की, "सोनिया गांधींनी आपल्या राजकीय कारकीर्दीत घोट्याळ्यांची युनिव्हर्सिटी उभी केली."

महेशकुमार तांबे यांनी तर सोनियांच्या कारकिर्दीची तुलना मोदी सरकारच्या कार्यकाळाशी केली. ते म्हणतात की सोनिया गांधींची कारकीर्द ही मोदींच्या साडेतीन वर्षांपेक्षा बरी आहे.

तर सचिन परब यांनी सोनिया गांधींच्या कारकिर्दीचा उल्लेख "बकवास" असा केला आहे. "त्या इंदिरा गांधींच्या एक टक्केही नाहीत," असं ते पुढे लिहितात.

सुभाष शिंदे आणि गणेश एस. यांनी मात्र त्यांच्या फेसबुकवरील प्रतिक्रियेत सोनिया गांधींचा 'आयर्न लेडी' असा उल्लेख केला आहे.

"सोनिया गांधींच्या कारकिर्दीत विकास दिसला आणि या (मोदी सरकारच्या) चार वर्षांत बरबादी. आणि ज्यांना या चार वर्षांत छान वाटलं ते आज बेकार झालेले आहेत. ते फक्त भक्त नावाचा स्टॅम्प लावून फिरत आहेत," असं प्रेषित सोनावने यांनी लिहिलं आहे.

तर आनंद चौधरी, नंदन कांबळी, सचिन सानप आणि सुजित कामेरकर यांनी सोनिया गांधींची कारकिर्दीला "बकवास" असं संबोधलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)