You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हार्दिक पंड्या, लोकेश राहुलचा खेळण्याचा मार्ग मोकळा
अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि फलंदाज लोकेश राहुल यांच्यावरील बंदी हटल्याने त्यांचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार अद्यापही बाकी आहे.
कॉफी विथ करण कार्यक्रमात आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी बंदीची कारवाई करण्यात आलेले हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल या दोघांना दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयातर्फे नेमण्यात आलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने अर्थात CoAने निलंबन तात्काळ प्रभावाने हटवलं आहे.
याप्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयातर्फे ओमबड्समनची नियुक्ती होणं अपेक्षित आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाच्या सुनावणीसाठी 5 फेब्रुवारी ही तारीख तात्पुरत्यादृष्ट्या पक्की केली आहे.
11 जानेवारी रोजी या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. बीसीसीआयची घटना कलम 46नुसार आरोपांची सुनावणी होईपर्यंत कलम 41(6) अंतर्गत या दोघांना सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित करण्यात आलं होतं.
ही घोषणा झाली त्यावेळी हे दोघं ऑस्ट्रेलियात होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे संघाचा दोघं भाग होते. कारवाईच्या घोषणेमुळे दोघेही मायदेशी परतले.
एखाद्या क्रिकेटपटूविरुद्ध आचारसंहितेच्या कलमांचा भंग केल्याप्रकरणी आरोप निश्चित झाल्यास, त्याप्रकरणाच्या सुनावणीसाठी बीसीसीआयतर्फे तपास अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही नियुक्ती प्रलंबित आहे. CoAच्या मते 11 जानेवारीचा निलंबनाच्या कारवाईचा आदेश रद्द करण्यात यावा. न्यायालयाचे मित्र अर्थात अमिकस क्युरी पी. एस. नरसिंहा यांच्याशी सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी हार्दिकने माफी मागितली आहे. कार्यक्रमाच्या हलक्याफुलक्या स्वरुपामुळे, भावनेच्या भरात बोलून गेलो, कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो, असं हार्दिकने म्हटलं होतं.
हार्दिक आणि राहुलच्या निमित्ताने कॉफी विथ करण कार्यक्रमात पहिल्यांदाच क्रिकेटपटू सहभागी झाले होते. या कार्यक्रमात महिलांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर बीसीसीआयने हार्दिक आणि राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
दोघांनीही उत्तर देताना बोर्ड आणि प्रशासकीय समितीची माफी मागितली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)