You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सपा-बसपाची उत्तर प्रदेशात युती, पण एकमेकांना मतांचा फायदा होणार?
- Author, अभिमन्यू कुमार साहा
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
देशातलं सर्वात मोठं राज्य. अर्थात उत्तर प्रदेश. इथं लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळेच उत्तर प्रदेश देशाचा पंतप्रधान ठरवतो असं म्हणतात.
गेल्या वेळी उत्तर प्रदेशनं मोदींच्या पारड्यात 71 जागा टाकल्या होत्या. पण आता हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षानं युती केली आहे.
लखनौच्या ताज हॉटेलात झालेल्या पत्रकार परिषदेत मायावती आणि अखिलेश यादव यांनी संयुक्तपणे तशी घोषणा केली.
उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष प्रत्येकी 38 जागा लढेल. तर दोन जागा मित्रपक्षांसाठी असतील. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भाजपकडून होणारी संभाव्य कोंडी टाळण्यासाठी सपा आणि बसपा इथं आपले उमेदवार देणार नाहीत.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत मायावतींनी दिल्लीकडे बोट करतानाच दीर्घकालीन राजकीय खेळीचेही संकेत दिले. त्या म्हणाल्या, " मी हे सांगू इच्छिते की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची केंद्रात आणि राज्यात सत्ता होती. त्या काळात देशातील वंचितांविरुद्ध अन्याय झाला आहे. काँग्रेसच्या काळात गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढला आहे. त्याचाच पारिपाक म्हणून बसप आणि सपा या पक्षांची निर्मिती झाली जेणे करून काँग्रेस पक्षापासून मुक्ती मिळेल."
आणि अखिलेश यांच्याशी झालेल्या युतीसंदर्भातही त्यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. मायावती म्हणतात की "ही युती फक्त लोकसभाच नाही तर विधानसभा निवडणुकीसाठीसुद्धा असेल."
म्हणजेच योगींसाठीही माया-अखिलेश यांची युती धोक्याची घंटा ठरण्याची भीती राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत.
याच पत्रकार परिषदेत अखिलेश यांनीही सपा आणि बसपा कार्यकर्त्यांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले "मायावतींविषयी जेव्हा भाजपा नेत्यांनी अशोभनीय वक्तव्यं केली. इतकंच नाही तर या नेत्यांना मंत्रिपदंही दिली तेव्हाच आम्ही मायावतींच्या पक्षाबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला."
मायावतींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्याल का? या प्रश्नावरही अखिलेश यांनी हुशारीने उत्तर दिल्याचं दिसतंय. ते सांगतात, " मायावती यांनी 4 वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. उत्तर प्रदेशने देशाला सतत पंतप्रधान दिले आहेत. उत्तर प्रदेशातून कुणी पंतप्रधानपदावर पोहोचत असेल तर मला आनंदच होईल."
दरम्यान याआधीही उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकांमध्येही सपा-बसपाने भाजपला मात दिली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या गढही माया-अखिलेश यांनी उध्वस्त केले होते.
सामाजिक समीकरणांचा अभ्यास केला तर याआधीही सपा-बसपाची जोडी मतदारांनी हिट ठरवली आहे. दोन्ही पक्षांकडे आपली व्होट बँक आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर 'विनिंग कॉम्बिनेशन' फॉर्म्युला तयार होतो, असं राजकीय विश्लेषक म्हणतात.
1993 मध्ये झाली होती सपा-बसपाची पहिली युती
ज्येष्ठ पत्रकार नवीन जोशी या युतीला 'विनिंग कॉम्बिनेशन' म्हणतात. आणि हे भाजपसाठी मोठं आव्हान असल्याचंही ते म्हणतात.
ते सांगतात "आपण 1993 चं उदाहरण घेऊ शकतो. जेव्हा कांशीराम आणि मुलायम यांनी हातमिळवणी केली होती. त्यावेळी एकच नारा होता, 'मिले मुलायम-कांशीराम हवा में उड गए जय श्रीराम'
"त्यावेळी बाबरी पाडल्यानंतर देशभर भाजपची हवा होती. निवडणुकीच्या राजकारणात बाजी मारण्याची तयारी भाजपनं केली होती. पण कांशीराम आणि मुलामय यांनी त्यांना मात दिली."
नवीन जोशी सांगतात की नेमकं तसंच दृश्यं आता पाहायला मिळत आहे. आणि बऱ्याच गोष्टी आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. कांशीराम हयात नाहीएत. मुलायम यादव थोडे बाजूला पडलेत. आता त्यांची नवी पिढी पुढे आली आहे. अर्थात मायावती आणि अखिलेश.
त्यांच्या मते सपा आणि बसपा एकत्र आल्याने उत्तर प्रदेशात भाजपला तगडी टक्कर द्यावी लागणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठीसुद्धा या जोडीला 'विनिंग कॉम्बिनेशन' मानतात. गेल्या वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष औपचारिकपणे एकत्र आले नव्हते. मात्र तरीही दोघांना चांगलं यश मिळालं.
ते सांगतात, "अखिलेश-मायावती एकत्र आल्यामुळे ग्रामीण भागात दलित, मुस्लिम यांच्यात एकतेची भावना निर्माण होईल, जे भाजपसाठी मोठं आव्हान ठरेल"
मात्र सपा आणि बसपाच्या युतीत काँग्रेसला स्थान मिळालेलं नाही, हे विशेष
मायावती आणि अखिलेश पहिल्यापासून एक गोष्ट सांगत राहिले, की आम्ही एकत्र लढू आम्हाला कुठल्याही राष्ट्रीय पक्षाची गरज नाहीए. आणि त्यामुळेच काँग्रेसनंही उत्तर प्रदेशात स्वत:च्या बळावर जाण्याचे संकेत दिलेत.
अशा स्थितीत सपा-बसपा युती आणि काँग्रेसला फायदा होईल आणि भाजपला मोठं नुकसान सहन करावं लागेल असं ज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी यांना वाटतं.
ते सांगतात, "उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा जो सवर्ण मतदार आहे, त्याला सपा आणि बसपा दोन्ही पक्षाचं वावडं आहे. त्यामुळेच 80 जागांवर जर काँग्रेस स्वबळावर लढली तर भाजपसाठी मोठी अडचण होईल"
मुद्दा क्रमांक 1 - दोन्ही पक्षांचा जन्म काँग्रेसविरोधातून झालेला आहे. आता त्याची जागा भाजपनं घेतली आहे. पण काँग्रेसशी असलेली त्यांची फारकत कायम राहील. अर्थात काँग्रेससोबत यायचं नसल्यानेच मायावतींनी अधिक जागांची मागणी केली होती, आणि ही एक रणनीती होती.
मात्र तसं झालं असतं तरी काँग्रेस-बसपाला फायदा झाला नसता, कारण भाजपपासून दुरावलेला सवर्ण मतदार पुन्हा भाजपकडे गेला असता.
मुद्दा क्रमांक 2 - नवीन जोशी दुसरी महत्वाची बाब आधोरेखित करताना सांगतात, "उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था खूपच वाईट आहे. 2014 मध्ये त्यांना कशाबशा दोन जागा जिंकता आल्या होत्या."
"उत्तर प्रदेशात काँग्रेसचा पाया उध्वस्त झाला आहे आणि जागावाटपात त्यांना 4-5 जागांपेक्षा जास्त काही हाती लागलं नसतं. आणि तो त्यांच्यासाठी तोट्याचा व्यवहार झाला असता."
अर्थात हेसुद्धा तितकेच खरे आहे की रणनीती म्हणून निवडणुकीनंतर सपा-बसपा नक्कीच काँग्रेसला साथ देईल.
मायावती आणि अखिलेश यांनी युती तर केली, पण आता पुढचं आव्हान हे असेल की या दोघांना एकमेकांना विजयी करावं लागेल. एकमेकांच्या पक्षांना मतं मिळवून द्यावी लागतील.
राजकीय पत्रकारांच्या मते बसपासाठी हे जास्त सोपं असेल, पण समाजवादी पक्षासाठी नेत्या-कार्यकर्त्यांना समजावणं जास्त कठीण होईल.
गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार रिंगणात होत आणि त्यांना बसपाच्या मतदारांची साथ मिळाली. पण आता ती भूमिका सपाला पार पाडावी लागेल.
समाजवादी पक्षाचे मतदार बसपाच्या उमेदवाराला खरंच साथ देतील का? या प्रश्नावर नवीन जोशी सांगतात की, "मायावती मतं फिरवण्यात वाकबगार आहेत. जेव्हा कधी मायावतींनी कुणाशी युती केलीय, तेव्हा त्यांनी आपल्या मतदारांना मित्रपक्षाला मतदान करायला लावलं. त्यात त्यांना यश आलेलं आहे. त्यामुळेच आजच्या युतीतसुद्धा अखिलेश यांना जास्त फायदा होईल."
उत्तर प्रदेशच्या राजकारणावर ते पुढे सांगतात की, भारतात किंवा उत्तर प्रदेशात यादव दलितांपासून दो हात दूर रहतात हे सत्य आहे.
सवर्णांपेक्षा यादवांचं जास्त वैर हे कायमच दलितांशी राहिलेलं आहे. त्यामुळेच जेव्हा कधी युती होते, तेव्हा यादव समाजाची 100 टक्के मतं मायावतींना जात नाहीत, हे सत्य आहे.
"पण बसपामध्ये मायावतींचा कुठलाही आदेश त्यांच्या मतदारांसाठी ब्रह्मवाक्य आहे. बहनजींनी सांगितलं तर, त्यांचे मतदार सकाळी उठतील, आंघोळ-पांघोळ करतील आणि नाश्ता करण्याआधी मतदान करुन येतील."
अर्थात मायावतींचा एक मोठा फायदा म्हणजे त्यांच्याकडे कायम 22 टक्के मतदार कायम राहिला आहे. त्यात त्यांना अधिकची 5 टक्के मतं मिळाली तरी त्यांना मोठा फायदा होईल.
रामदत्त तिवारी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधतात. ते सांगतात की, "योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात यादव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे यादव समाजाला भाजप आपल्यासाठी योग्य नाही, असं वाटतंय. अशा स्थितीत बसपाला पाठिंबा देणं ही यादव समाजाची मजबुरी असेल"
मुसलमान कुणाच्या बाजूने?
माया-अखिलेश यांच्या युतीनंतर मुस्लिम मतदार कुणाच्या बाजूने जाणार? ते युतीच्या बाजूने जाणार की काँग्रेसच्या? ते द्विधेत आहेत का?
या प्रश्नाचं उत्तर देताना नवीन जोशी सांगतात की, "मुस्लिम मतदार कुठल्याही द्विधा मनस्थितीत नाहीत. त्यांना भाजपला पराभूत करायचं आहे. आणि त्यासाठी त्यांच्यापुढे सपा-बसपा युतीचा एकमेव पर्याय आहे.
19992 पासून ते काँग्रेसपासून अंतर राखून आहेत. अर्थात काळाप्रमाणे त्यात थोडा फरक पडला असला तरी काँग्रेसला कधीही निवडणुकीत त्याचा फायदा झालेला नाही.
रायबरेली आणि अमेठी सोडलं तर काँग्रेस कुठेही विजयी होईल, अशी स्थिती नाहीए. त्यामुळे मुस्लिम मतदार कुठल्याही द्विधा स्थितीत नाहीत. वेळ बघून त्यांनी कधी बसपाची तर कधी सपाची साथ दिली आहे.
आता दोन्ही पक्ष एकत्र आल्याने त्यांच्यात द्विधा स्थिती राहण्याचं कारण नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)