नागपूरजवळ आढळले 3 हजार वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीचे अवशेष

    • Author, सुरभी शिरपूरकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी नागपूरहून

हजारो वर्षापूर्वीचे मानवी सांगाडे आणि त्यांची संपूर्ण माहिती इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातच बघायला मिळते. त्यातही ३००० वर्षापूर्वीचे मानवी अवशेष सापडणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे.

मात्र नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वन विकास महामंडळाच्या गोरेवाडा प्रकल्पातल्या जंगलात अशा प्रकारचे मानवी अवशेष आणि त्यांची संस्कृती दाखवणाऱ्या अनेक वस्तू सपाडल्या आहेत.

गोरेवाडा प्रकल्पाच्या जंगलात शीळा वर्तुळातून एका आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा सापडल्या आहेत.

नागपूर जवळ असेलेली अनेक जंगलं पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहेत. नागपूर-कळमेश्वर रस्त्यावर अतिशय प्रसिद्ध असलेलं गोरेवाडा प्रकल्पाचं जंगलही त्यापैकी एक आहे.

या ठिकाणी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचं आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आणि थीम पार्क सारखे इतर प्रकल्प उभारले जात आहेत.

याच जंगलात मानवी इतिहासाचा समृद्ध वारसा असल्याचं आता समोर आलं आहे.

वन अधिकाऱ्यांच्या मते, गोरेवाडा प्रकल्पाच्या जंगलात अनेक शिळा वर्तुळ असल्याचं नेहमीच दिसायचं परंतु त्यात काय आहे, हे स्पष्ट नव्हतं. त्यामुळे वन विकास महामंडळानं पुण्याच्या डेक्कन कॉलेजसोबत सामंजस्य करार (MoU) केला आणि या शिळा वर्तुळांचं गुढ उकलण्यासाठी २०१८च्या नोव्हेंबरपासूनच उत्खनन सुरू केलं.

या ठिकाणी १५ ते १७ मीटर व्यास असलेल्या दोन मोठ्या शीळा वर्तुळांच्या उत्खननात अतिशय महत्वाचे ऐतिहासिक पुरावे हाती लागले आहेत. ही शिळावर्तुळ त्याकाळातल्या मानवी कबरीसुद्धा असू शकतात, असं सांगितलं जात आहे.

असा लागला शोध

या सांगाड्यांच्या शोधाविषयी वन परिक्षेत्र अधिकारी पांडूरंग पखाले यांनी माहिती दिली.

ते म्हणतात, "गोरेवाडा प्रकल्पात गस्ती घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना शिळा वर्तुळाचा शोध लागला. शोध लागल्यानंतर वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिक उत्खनन करणाऱ्या लोकांना हे काम देण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच वन विकास महामंडळ आणि डेक्कन कॉलेज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आणि तीन शिळावर्तुळांचं उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आणि नोव्हेंबर 2018 पासून हे उत्खनन सुरू करण्यात आलं."

तीन हजार वर्षांपूर्वीचे सांगाडे

या वर्तुळांमध्ये तीन हजार वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे सापडले आहेत. त्याशिवाय या मानवांना कबरींमध्ये दफन करताना त्यांच्यासोबत ठेवलेली मातीची भांडी, तांब्याचे दागिने, लोखंडी अवजारं आणि हत्यारांचा समावेश आहे.

तज्ज्ञांच्या मते या महापाषाण काळातल्या कबरी असून विदर्भाशिवाय दख्खनच्या पठारावर म्हणजेच नर्मदा नदीच्या दक्षिणेस अशी शीळा वर्तुळं अनेक ठिकाणी आढळली आहेत.

लंडनमध्ये देखील अशा प्रकारचे स्टोन सर्कल आहेत असं संशोधक सांगतात.

डेक्कन कॉलेज संशोधक पथकाच्या प्रमुख कांती पवार त्यांच्या टीमसह दोन शिळा वर्तुळाचं उत्खनन करत आहेत.

त्यापैकी एका वर्तुळामध्ये तीन मानवी सांगाडे आढळले आहेत. दोन सांगाडे तर एकत्र आढळले असून ते स्त्री आणि पुरुषाचे म्हणजेच पती पत्नीचे असल्याचं संशोधकांना वाटत आहे. परंतु हा केवळ त्यांचा अंदाज असून DNA टेस्ट नंतरच लिंग स्पष्ट होईल, असं कांती पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

या उत्खननावेळी ज्या वस्तू सापडल्या त्या पाहून ३००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या भारतीय संस्कृतीची माहिती मिळते. इथल्या महिलेच्या सांगाड्याजवळ स्त्रियांच्या वस्तू म्हणजेच मातीची भांडी, दागिने इत्यादी आढळलं आहे. तर पुरुषाच्या सांगाड्याजवळ अवजारं आणि हत्यारं आढळली आहेत, असं कांती पवार सांगतात.

"संशोधकांचा अंदाज आहे की ३ हजार वर्षांपूर्वीच्या या मानवांचा आणि त्यांच्या जमातीचा 'मृत्यू नंतरचं जीवन' या संकल्पनेवर कदाचित विश्वास असावा. म्हणूनच कबरीमध्ये त्या मानवी शरीरासोबतच आवश्यक आणि आवडीच्या वस्तू ठेवल्याचं दिसतं," असं कांती पवार सांगतात.

ही शिळा वर्तुळं सॅटेलाईट व्ह्यूमध्ये देखील स्पष्टपणे दिसतात. तज्ज्ञांच्या मते संपूर्ण गोरेवाडा प्रकल्पातल्या जंगलात अशा पद्धतीच्या ३० पेक्षा जास्त कबरी/ स्टोन सर्कल असून त्यात समृद्ध ऐतिहासिक वारसा लपला आहे.

या इतिहासाचा 'हडप्पा संस्कृतीशी' काही संबंध नसल्याचं कांती पवार सांगतात. पाषाणयुगातून लोहयुगात येत असतानाची ही संस्कृती असल्याचंही त्या सांगतात.

महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज

या संशोधनातून अतिशय मोठा आणि महत्त्वाचा पुरातत्वीय वारसा समोर आलाय असं, गोरेवाडा प्रकल्पातले वन परिक्षेत्र अधिकारी पांडुरंग पाखले यांचं मत आहे.

या शीळा वर्तुळांच्या उत्खननाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गोरेवाडा जंगलात आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आणि जंगल सफारीला येणाऱ्या पर्यटकांसाठी हा पुरातत्वीय वारसा पाहण्यासाठी विशेष सोय केली जाणार आहे.

ज्या ठिकाणी हे उत्खनन झालं त्या ठिकाणी एक काचेचा डोम बसविण्यात येणार असून त्या काचेतून हा ऐतिहासिक दस्तावेज पर्यटकांना बघता येईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)