You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
13,000 वर्षं जुनी बीअर इस्रायलच्या गुहेत सापडली
सर्वांत जुनी बीअर कदाचित पाच हजार वर्षांपूर्वीची आहे, असा आजवर संशोधकांचा अंदाज होता. पण इस्रायलच्या एका गुहेत सापडलेल्या बीअरच्या काही खुणा हा इतिहास बदलण्याचा संकेत देत आहेत.
इस्रायलमधल्या हैफा या भागातल्या एका गुहेत सुमारे 13,000 वर्षं जुनी बीअर सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. प्रागैतिहासिक काळी शिकारी करणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीच्या अवशेषांचा अभ्यास करताना त्यांना ही बीअर सापडली.
याआधी बीअरला ब्रेडचं जोड उत्पादन समजलं जायचं. पण या नव्या शोधामुळे या समजावरही पडदा पडण्याची शक्यता आहे.
पण आधी ब्रेड आली की बीअर, हे सांगणं कठीण असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं.
मृतांच्या अंत्यविधीसाठी तसंच काही श्रद्धांजली कार्यक्रमांसाठी मेजवानीचा भाग म्हणून सुरुवातीला बीअर बनवली जायची, असं Journal of Archaeological Scienceच्या ऑक्टोबरच्या अंकात नमूद केलं आहे.
"मानव-निर्मित दारूचा हा आतापर्यंतचा सगळ्यांत जुना पुरावा आहे," असं स्टँडफोर्ड विद्यापीठातल्या प्रा. ली ल्यू यांनी स्टँडफोर्ड न्यूजला सांगितलं. त्यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं आहे.
अश्मयुगातील लोक कोणत्या प्रकारचे धान्य खायचे, याचा ली अभ्यास करत होत्या. त्यावेळी त्यांनी गहू आणि बार्ली पासून बनवलेल्या दारूचा शोध लावला.
गुहेत सापडलेल्या भांड्याच्या आकाराच्या दगडात 60 सेंटीमीटर आत दारू असल्याचा खुणा सापडल्या. या दगडांचा वापर धान्य साठवणे आणि शिजवण्यासाठी व्हायचा, असं संशोधकांचा अंदाज आहे.
गुहेत सापडलेल्या बीअरच्या अवशेषांची तुलना करण्यासाठी संशोधकांनी त्यासारखी हुबेहूब बीअर तयार केली.
यासाठी आधी बीअरसाठीचं धान्य उगवण्यात आलं, मग ते एका लगद्यावर गरम केलं आणि त्यात यीस्ट घालून ते आंबवण्यात आलं.
प्रागैतिहासिक काळातली बीअर ही आताच्या बीअरपेक्षा खूप वेगळी होती. ती गव्हाच्या लापशी सारखी दिसायची. पण तिच्यात तशी नशा होती का?
संशोधकांनी सांगितलं की, प्राचीन काळची ही दारू फसफसणारी होती, पण ती आजच्या दारूएवढी स्ट्राँग नव्हती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)