You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार फॉर्म्युल्यामुळे उद्धव ठाकरेंचं बळ वाढलं का?
हिंदी पट्ट्यातील तीन महत्त्वाची राज्ये गमावल्यानंतर भाजपाने एक पाऊल मागे येत बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि लोकजनशक्ती पार्टीशी समझोता केला. 40 मतदारसंघाच्या बिहारमध्ये जदयु आणि भाजपाने समान 17 जागा आणि लोजपाला 6 जागा देण्याचे ठरवले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते आता महाराष्ट्रात गेल्या साडेचार वर्षांमध्ये सतत धुसफूस चाललेल्या युतीमधील शिवसेनेलाही आपल्या मनाप्रमाणे युती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बिहारमध्ये रालोआचा फॉर्म्युला ठरवताना रामविलास पासवान यांना 'रालोआ'तर्फे राज्यसभेत पाठविण्याचेही आश्वासन भाजपाने दिले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी ही बोलणी जाहीर करताना वारंवार रामविलास पासवान आणि त्यांचा पक्ष यांचा उचित 'सन्मान' होईल असं वारंवार बोलून दाखवले. इतकेच नव्हे तर दस्तुरखुदद् पासवान यांनीही या सन्मानाचा उल्लेख केला. त्यामुळे महाराष्ट्रात आपलाही 'सन्मान' झाला पाहिजे यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील यात शंका नाही, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
त्यामुळेच आज पंढरपुरात झालेल्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळासह अभ्यासकांचंही लक्ष लागलं होतं.
भाजपाच्या भूमिकेवर युतीचे भविष्य
राजकीय अभ्यासक समर खडस यांच्या मते भाजपा शिवसेनेसाठी किती जागा सोडायला तयार होईल यावर युतीचे भविष्य अवलंबून असेल. शिवसेना महाराष्ट्रात मोठा पक्ष आहेच. मध्यंतरी लोकसभा व विधानसभेत भाजपाचे बळ वाढले असले तरी आता तशी स्थिती नाही. तसेच युती झाली किंवा नाही झाली तरी विरोधी पक्षांनाही निवडणुकीत बळ आजमावण्याची स्थिती असते. राज्यात युतीचे सरकार सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली होती. तेव्हाही विरोधी पक्षांना सत्तेत येण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे युती किंवा आघाडी होण्याने किंवा तुटण्याने इतरांची संधी कमी होत नाही.
सेना जशास तसे वागणार
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांच्यामते तीन राज्यांत भाजपाचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेचं बळ निश्चित वाढलं आहे. लोकसभेपेक्षा शिवसेनेला विधानसभा जास्त महत्त्वाची आहे. 2014 च्या निवडणुकीत मुंबईमध्ये मोदी लाटेत निवडून आलेल्या आणि ज्या पूर्वी शिवसेनेच्या जागा होत्या त्यातील जागा आम्हाला द्या अशी मागणी होऊ शकते.
मुंबई-ठाणे-नाशिक मराठवाड्यातील काही जागांवर शिवसेनेचे बळ जास्त आहे त्यामुळे मोदी लाटेत गमावलेल्या शिवसेनेच्या परंपरागत जागा मिळाव्यात अशी मागणी केली जाईल. ठाणे शहर हे शिवसेनेचं नाक होतं तेथे मोदी लाटेत भाजपाचे संजय केळकर निवडून आले. अशा जागा पुन्हा मिळवण्यासाठी शिवसेना नक्की प्रयत्न करेल असं प्रधान म्हणाले.
संदीप प्रधान यांच्या मतानुसार गेल्या 5 वर्षांमध्ये भाजापाने शिवसेनेला अनेकदा चुचकारण्याचा प्रयत्नही केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 5 हजार कोटी बाजारभाव असलेला बंगला भाडेत्त्वावर देण्यात आला तसेच त्याचे 14.5 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सर्वांना वंदनीय आहेत मात्र स्मारकासाठी राज्याचा महसूल कसा बुडवला जाऊ शकतो याचा विचार दोन्ही पक्ष करत नाहीत.
एकीकडे शेतकरी आत्महत्या होऊ नये याबद्दल बोलले जात आहे, सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले. मातोश्री जवळ तयार होत असलेल्या दुसऱ्या बंगल्याला हवा तेवढा एफएसआय देणे, वांद्रे पूर्व संकुलातून रस्त्याची जोडणी देणे हे सर्व शिवसेनेला शांत करण्याचेच प्रयत्न आहेत असे ते म्हणाले.
युतीच्या भविष्याबाबत मात्र संदीप प्रधान यांनी वेगळे मत मांडले आहे. ते म्हणतात, मित्राला आधी पंगू करुन मग नंतर आधार द्यायचा असे गणित सेना आखू शकते. म्हणजे 2014 साली शिवसेनेला गरज होती मात्र मोदी लाट समोर दिसल्यावर भाजपाने त्यांचा हात सोडला. आता भाजपा अडचणीत आल्यामुळे शिवसेना तसं वागण्याचा प्रयत्न करेल. किंवा युती तुटली तर तुटू दे. दोघांचेही नुकसान झाले तरी चालेल. पण त्यामुळे युतीची किंमत भाजपाला कळेल. निवडणुकीनंतर रालोआमध्ये सहभागी होऊन नरेंद्र मोदी आम्हाला पंतप्रधान नकोत अशी भूमिका शिवसेना घेऊ शकते.
मोदी- शाह यांच्या जोडीवरही शिवसेना निशाणा साधेल असे प्रधान यांना वाटते. ही जोडी केंद्राच्या राजकारण पटावर आल्यावर आमची युती तुटली असे सांगून आता नितिन गडकरींसारखी पंतप्रधानपदी हवी अशी मागणी ते करतील पुन्हा आमच्यामुळे मराठी माणूस पंतप्रधान झाला असेही ते म्हणू शकतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)