You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हामिदच्या आई सुषमा स्वराजना भेटून काय म्हणाल्या?
तब्बल सहा वर्ष पाकिस्तानमधील तुरुंगात काढल्यानंतर मंगळवारी भारतात परतलेल्या हामिद निहाल अन्सारीनं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.
हामिद आपल्या कुटुंबासह बुधवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले.
यावेळी हामिद आणि त्याची आई दोघेही भावुक झाले होते. मात्र सुषमा स्वराज यांनी त्यांना धीर दिला.
सुषमा स्वराज यांच्याशी बोलताना हामिद यांना अश्रू आवरले नाहीत. यावेळी खांद्यावर हात ठेऊन सुषमा स्वराज यांनी हामिदला हिंमत आणि दिलासा दिला.
हामिदची आई फौजिया यांनाही आपल्या भावनांवर काबू ठेवणं शक्य झालं नाही. त्यांनी सुषमा यांची गळाभेट घेतली. "मेरा भारत महान, मेरी मॅडम महान, सब मॅडमने ही किया है" असं म्हणत सुषमा स्वराज यांचे आभार मानले
पाकमध्ये भोगली तीन वर्षाची शिक्षा
33 वर्षाच्या हामिदनं व्यवस्थापन शास्त्रात पदवी घेतली आहे.
हामिद यांची आई फौजिया मुंबईत हिंदीच्या प्राध्यापक आणि कॉलेजच्या उप-प्राचार्या आहेत. तर वडील निहाल अन्सारी बँकेत काम करतात. हामिद यांचा भाऊ व्यवसायानं डेंटिस्ट आहे.
2012साली फेसबुकवरून झालेल्या मैत्रीने त्यांना आधी अफगाणिस्तान आणि नंतर पाकिस्तानात पोहोचवलं.
काबुलच्या मार्गाने कोहाटला
4 नोव्हेंबर 2012ला त्यांनी मुंबईतून काबुलचं विमान पकडलं. एका विमान कंपनीत मुलाखत देण्यासाठी जातो, असं त्यांनी घरी सांगितलं होतं. ते 15 नोव्हेंबरला परत येणार होते. पण काबुलला गेल्यानंतर त्यांचा घरच्यांशी संपर्क तुटला. त्यांचा फोन बंद पडल्यामुळे त्यांच्या घरच्यांना शंका वाटू लागली. असं सांगितलं जात या काळात त्यांनी काबुलवरून जलालाबाद आणि तिथून कुठल्याही कागदपत्रांशिवाय तोरखमच्या मार्गाने पाकिस्तान गाठलं. कुर्क इथं थांबून ते कोहाटला गेले.
पोलीस सांगतात त्यांनी कोहाटमध्ये हॉटेलमध्ये खोली बुक करण्यासाठी हमजा या नावाने खोटं ओळखपत्र सादर केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून त्यांना अटक केली.
अन्सारींच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे की हमीदशी संपर्क होत नसल्याने त्यांनी हामिदच्या घरातील लॅपटॉप उघडून फेसबुक आणि ईमेलवरील संवाद वाचला. यावरून हामिद पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाटमध्ये एका मुलीला भेटण्यासाठी जाऊ इच्छित होते, अशी माहिती त्यांना मिळाली.
हामिदच्या आईने नंतर असा दावा केला की हामिद यांनी फेसबुकवरून काही पाकिस्तानी लोकांशी संपर्क साधला आणि त्यानंतर हा मार्ग निवडला.
हामिदने चौकशीत बेकायदेशीरपणे अफगाणिस्तानत प्रवेश केल्याचं मान्य केल्याची माहिती पाकिस्तानमधील माहिती विभागाने सांगितलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)