You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हामिद अन्सारीची सुखरूप सुटका करणाऱ्या रक्षंदा नाझ कोण आहेत?
- Author, फरान रफी
- Role, बीबीसी प्रतिनिधी लाहौरहून
भारतीय कैदी हामिद अन्सारी सहा वर्षांनी आपल्या पालकांना भेटला. त्याचा सहा वर्षांचा तुरुंगवास संपला असून त्याला भारतात परत पाठवण्यात आलं आहे.
हामिद यांच्या सुटकेमागे एक महत्त्वाची व्यक्ती होती. तिचं नाव रक्षंदा नाझ असं आहे. त्या वकील आणि मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत. त्यांनी हामिद अन्सारीचा खटला 2014 मध्ये हातात घेतला आणि त्याच्या सुटकेच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या हामीदबरोबर होत्या.
रक्षंदा यांचा जन्म पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरात झाला आहे. त्या पंजाबच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या झाल्या. नंतर त्या खैबर पख्तुन्वा या राज्याच्या पेशावर शहरात गेल्या. त्यांनी तिथे आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्या गेले 25 वर्षं तिथं वकिली करत आहेत.
बीबीसी प्रतिनिधी फरहान रफी यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या, प्रसिद्ध वकील अस्मा जहांगीर यांच्या प्रेरणेने त्या वकील झाल्या. अस्मा मानवी हक्क चळवळीसाठी प्रसिद्ध होत्या. पाकिस्तानात स्त्री वकील होणं इतकं सोपं नसतं. रक्षंदा यांच्या मते अस्मा यांच्यासारखा आदर्श असणं त्यांच्यासाठी नेहमीच फायदेशीर असतं.
त्या पाकिस्तानच्या न्यायालयात कायमच सक्रिय असतात. त्यांनी तिथल्या तुरुंगातही भरपूर काम केलं आहे. "मी मुख्यत: उपेक्षित वर्गासाठी काम केलं आहे. मग ही उपेक्षा धर्माशी निगडीत असो किंवा गरजू स्त्रिया असो. मी विस्थापितांसाठी आणि घरगुती हिंसाचार पीडित स्त्रियांबरोबर काम करणाऱ्या संघटनेच्या संस्थापकांबरोबर काम करतेय."
रक्षंदा यांनी लढवला नि:शुल्क खटला
1999 साली त्यांनी अशोक कुमार नावाच्या एका व्यक्तीच्या खटल्यात काम केलं आहे. त्यांच्या तीन मुलांबरोबर त्यांना अटक करण्यात आली होती. लंडी कोटल या भागात ते विना व्हिसाचे फिरत असल्याचं आढळून आलं होतं. दोन वर्षांनी त्यांना दोषमुक्त करून सुटका करण्यात रक्षंदा यांना यश आलं होतं.
रिता मनचंदा यांनी 2014 मध्ये रक्षंदा यांना संपर्क केला होता. रिता या भारतातील पत्रकार आणि संशोधक आहेत. अशोक कुमार यांच्या खटल्यामुळे रक्षंदा यांच्या कामाची रिता यांना कल्पना होती. त्यांनीच हामिद अन्सारीच्या खटल्याबाबत रक्षंदा यांना सांगितलं.
"ती म्हणाली एक मुलगा आहे. तो जिवंत आहे की नाही हेही माहिती नाही," रक्षंदा सांगत होत्या. तसंच त्यांना हामिदच्या कुटुंबीयांचा संपर्क देण्यास सांगितलं. जेणेकरून या खटल्याविषयी अधिक माहिती मिळेल.
रक्षंदा त्यावेळी कराचीमध्ये होत्या. त्यांनी हामीदच्या कुटुंबियांकडून भारतातून सर्व कागदपत्रं गोळा केली आणि त्याला भेटायला पेशावरमध्ये गेल्या. त्यांनी आणखी एका ज्येष्ठ वकिलाबरोबर त्यांचा खटला हातात घेतला. तोही अगदी नि:शुल्क.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध जेव्हाही खराब होत तेव्हा रक्षंदा अतिशय काळजीत पडायच्या, असं त्यांनी बीबीसी प्रतिनिधी फरहान रफी यांना सांगितलं.
हमीदच्या खटल्यावर याचा काय परिणाम होईल याची सतत काळजी त्यांना वाटायची. तसंच त्यांचा खटल्याची जास्त वाच्यता होणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्या परराष्ट्र धोरणात हा विषय महत्त्वाचा ठरू नये ही दक्षता त्यांनी घेतली.
"असेही काही दिवस होते जेव्हा तुरुंगातील अधिकारी त्याची भेट घेण्यास अगदी तीन तीन दिवस परवानगी देत नसत. तो माझी वाट पहायचा कारण त्याला भेटणारी मी एकटीच व्यक्ती असायचे," त्या सांगत होत्या.
या काळात त्यांचे हामिदशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले असंही त्या पुढे सांगतात.
हामिदला पोटाचा विकार असल्याचंही रक्षंदा सांगतात. त्याला दूध आणि तांदूळ मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. "त्याला दुधाची भूकटी फार आवडायची. मॅगी फार आवडायची. तसंच मेयोनिज, चीज आणि बर्गरचीही मागणी तो करायचा. त्याला आम्ही शिनवेरी पुलाव आणि चीज बर्गर द्यायचो. हमीदनं आपल्या आईला पत्र लिहिलं की त्याचे कपडे अनपेक्षितपणे घट्ट झाले आहेत."
हस्तकलेची आवड
रक्षंदा जेव्हा हामिदला तुरुंगात भेटायला जात असत तेव्हा त्या हमीदच्या आईचे मेसेज हामिदकडे देत असत. त्यालाही घरच्यांना काही सांगायचं आहे का याची चौकशीही करायच्या.
"जेव्हा तो तुरुंगात होते तेव्हा तो हस्तकला शिकला. काडेपेटीने तयार केलेलं एक घर त्यांनी मला भेट म्हणून दिलं होतं. नक्षीकाम केलेली एक पर्स आणि माझं नाव कोरलेलं एक पेनसुद्धा भेट म्हणून दिलं. हे सगळं त्यानं स्वत:च्या हातानं बनवलं होतं. प्रेम आणि कृतज्ञता दाखवण्याची ही त्याची पद्धत होती.
तुरुंगातल्या शेवटच्या काही भेटींमध्ये रक्षंदा भविष्यातल्या योजनांविषयी बोलायच्या. जेव्हा भारतात परत जाशील तेव्हा काय कपडे घालावेत याचीही योजना हामिदनं केली होती. "मी आठवण म्हणून त्याला एक चित्राली कॅप दिली."
हामिदची आता त्याच्या कुटुंबियांशी भेटल्याचं कळल्यावर रक्षंदा यांना फार आनंद झाला. "मी काही फाईल्स आणि कागदपत्रं नष्ट करणार आहे, कारण त्यात त्याचं खासगी संभाषण आहे. मात्र मी त्यांचे सगळे फोटो गोळा करणार आणि आठवण म्हणून माझ्याकडे ठेवणार आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)