You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL लिलावः जयदेव उनादकट सर्वात महागडा खेळाडू
आयपीएलच्या 12 व्या सीझनसाठी जयपूर येथे सुरु असलेल्या लिलावामध्ये जयदेव उनादकटसाठी सर्वाधिक बोली लागली असून राजस्थान रॉयल्सने जयदेवला 8.40 कोटींना खरेदी केलं आहे. अर्थात, त्याच्यासाठी सर्वाधिक बोली लागण्याची ही पहिलीच वेळ नाही.
गेल्या वर्षी झालेल्या लिलावामध्ये जयदेव उनादकटला राजस्थान रॉयल्सनेच 11.5 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेसाठीही भरभक्कम बोली लावण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने शिवम दुबेसाठी पाच कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. अक्षर पटेललाही दिल्ली कॅपिटलने पाच कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
कॅन्सरवर विजय मिळवून मैदानात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंहवर शेवटपर्यंत कुणीही बोली लावली नव्हती. अगदी शेवटी मुंबई इंडियन्सने युवराजला बेस प्राईजला अर्थात 1 कोटी रुपयाला खरेदी केलं.
चेतेश्वर पुजारा आणि मनोज तिवारीलाही आतापर्यंत कोणत्याही संघाने खरेदी केलं नाहीए. मार्टिन गप्टिल आणि ब्रेंडन मॅक्क्लुम सारख्या खेळाडूंचीही बोली लागलेली नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने 50 लाख रुपयांची ब्रेस प्राईस असलेल्या वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हॅटमेयरसाठी तब्बल 4.2 कोटी रुपयांची किंमत मोजली आहे. दिल्ली कॅपिटलनेही 50 लाख बेस प्राईस असलेल्या हनुमा विहारीला दोन कोटी रुपयांना खरेदी केलंय.
कोणत्या खेळाडूंसाठी किती किंमत?
किंग्ज इलेव्हन पंजाबने मोहम्मद शामीला 4.8 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. शामीची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती.
श्रीलंकन खेळाडू लसिथ मलिंगाला मुंबई इंडियन्सने 2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. मलिंगाची बेस प्राईस 2 कोटी रुपयेच होती.
चेन्नई सुपर किंग्जने मोहित शर्माला पाच कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे तर राजस्थान रॉयल्सने वरुण एरोनसाठी 2.4 कोटी रुपये किंमत मोजली.
किंग्ज इलेव्हन पंजाबने 75 लाख रुपये बेस प्राईस असलेल्या निकोलस पूरनला 4.2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
जॉनी बेयरस्टोला सनरायझर्स हैदराबादने 2.2 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. बेयरस्टोची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती.
दिल्ली कॅपिटल्सने 1 कोटी बेस प्राईस असलेल्या ईशांत शर्माला 1.1 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे.
मोइजेज हॅनरिक्सला किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्या बेस प्राईसला म्हणजेच 1 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे.
पंजाबचा युवा खेळाडू गुरकीरत सिंहला किंग्ज इलेव्हन पंजाबने पन्नास लाख रुपयांच्या बेस प्राईसलाच खरेदी केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)