You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत आग लागण्याचं प्रमाण एवढं का वाढलं आहे?
मुंबईतल्या मरोळ (अंधेरी पूर्व) भागातल्या पाच मजली हॉस्पिटलमध्ये आग लागून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा शंभरावर पोहोचला आहे.
मरोळमधल्या ESIC कामगार हॉस्पिटलमध्ये दुपारी 4 वाजता आग लागली. अग्निशमन दलाचे बंब पोहोचेपर्यंत आगीचा भडका झाला. काही जणांनी हॉस्पिटलमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते जखमी झाले.
हॉस्पिटलच्या तळमजल्यावर ही आग लागली, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. MIDC अग्निशमन दलाचे प्रमुख VM ओगळेंनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की "या इमारतीला केवळ तात्पुरते ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते. अनेक त्रुटी असल्यामुळे अंतिम NOC दिली नव्हती. हे हॉस्पिटल केंद्र सरकारच्या अखत्यतारीत येतं, असं मला वाटतं. त्यामुळे या आगाची जबाबदारी त्यांची आहे."
पण मुंबईत मोठी आग लागण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षात 12 पेक्षा जास्त मोठ्या आगी लागल्या. मुंबईत दाटीवाटीच्या लोकवस्तीत उंच इमारती असल्यामुळे आग रोखणं कठीण जातंय का? पण मुळात एवढ्या आगी लागत का आहेत?
'सगळ्या गोष्टी कागदावर'
या विषयातले तज्ज्ञ विक्रम माहुरकरांशी आम्ही बोललो. ते चेकमेट ग्रुप या आपत्ती व्यवस्थापन कंपनीचे प्रमुख असून आग रोखण्याचं प्रशिक्षण देतात.
माहुरकर म्हणाले, "आगीच्या संदर्भात अनेक कायदे आहेत. पण त्याची अंमलबजावणी होते का, हे कधी बघितलं जात नाही. इमारतींसाठी वेगळे कायदे आहेत. रुग्णालयांकरिता वेगळे कायदे आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर आग विझवणारे हे साध्या कपड्यांवर आग विझवताना दिसतात. फायरमॅनला अनेकदा दर्जेदार साहित्य पुरवलं जात नाही.
"मुंबईत इमारतींची उंची वाढली. रस्ते अरुंद झाले. अशा ठिकाणी अग्निशमन दलाला पोहचण्यास अडचणी येतात. नंतर आग अटोक्यात आणण्यात अडचणी येतात. तेवढ्या उंचीच्या शिड्या नसतात. अग्निशमन संस्थांचा दर्जा सुधारणं आवश्यक आहे.
"या सगळ्यांत महत्त्वाचं काय असेल तर प्रशिक्षण. कागदावरचं प्रशिक्षण नको. तर प्रत्यक्षात आग लागल्यावर काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण हवं. याला आमच्या भाषेत 'रिअल फ्यूल, रिअल फायर' म्हणजेच 'लाईव्ह फायर ट्रेनिंग' असं म्हटलं जातं."
अधिकाऱ्यांमध्ये साटंलोटं?
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले, "फायर ऑडिटबद्दल कुणी काहीही बोलत नाहीत. मी माहिती अधिकारातही ही माहिती मागितली, तेव्हाही मिळाली नाही. ती माहिती दर तीन महिन्यांनी सुधारित करून ऑनलाईन उपलब्ध करा,अशीही वारंवार मागणी केली. कारण आपल्याकडे याबाबतीत प्रचंड शिथिलता आहे. अग्निशामक दल, महापालिकेचे स्थानिक अधिकारी यांच्यात साटंलोटं आहे. त्यामुळे आगीपासून सुरक्षा करणाऱ्या यंत्रणा लावल्या जात नाहीत. ही मानवनिर्मित दुर्घटना आहे."
यावर आम्ही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रतिक्रिया विचारली. त्यांनी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांवर बोलण्याचं टाळत केंद्र सरकारवर खापर फोडलं: "फायर ऑडिट व्हायला हवंच. कारण मुंबईकरांचा, प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. आज ज्या हॉस्पिटलला घटना लागली, ते हॉस्पिटल MIDCच्या आखत्यारीत म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या आखत्यारीत येतं. तिथे २००९ पासून फायर ऑडिट झालं नव्हतं. ते होणं आवश्यक होतं, त्याची चौकशी करावी लागेल. आग का लागली त्याची चौकशी सुरू केली आहे. काही विभाग महापालिकेच्या अंतर्गत नसले, तरी आमच्या बारा गाड्या आज लगेच तिथे पाठवल्या, आमचे फायर ब्रिगेडचे जवान तिथे पोहोचले, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)