भडकलेल्या जमावापासून सुटका कशी करुन घ्याल?

    • Author, अनघा पाठक आणि विनायक गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी

जमावाकडून हत्या होणं भारतात नवं राहिलेलं नाही.

बीबीसीच्या सर्व्हेनुसार फेब्रुवारी 2014 ते जुलै 2018 या दरम्यान कमीत कमी 31 लोक जमावाच्या हिंसेला बळी पडल्याचं दिसून आलं.

काही आठवड्यांपुर्वी, उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये कथित गोवंश हत्येवरून उफाळलेल्या हिंसाचारात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांची हत्या करण्यात आली.

सर्वसामान्य लोकांचा सामूहिक हिंसाचारात जीव गेल्याच्या अनेक घटना झाल्या आहेत. आसाममध्ये दोन तरूणांची 'लहान मुलं पळवतात' या संशयावरून हत्या झाली.

अशा प्रकारच्या घटनांमधून एक स्पष्ट होतं की कोणतीही व्यक्ती संतापलेल्या जमावाच्या तावडीत सापडू शकते. असा जमाव तुम्हाला मारहाण करण्याच्या हेतूने एकत्र आला असेल तर तुमचा बचाव होणं मुश्किल आहे पण जर तुम्ही चुकून जमावाच्या तावडीत सापडला असाल तर तुम्ही तुमचा बचाव करू शकता.

आम्ही यूकेतल्या फर्स्ट ऑप्शन सुरक्षा कंपनीत काम करणारे सुरक्षा सल्लागार अॅड्रयू मॅकफर्लेन यांच्याशी बोललो. संतापलेल्या जमावाच्या कचाट्यात सापडल्यानंतर स्वतःचा बचाव कसा करायचा याच्या काही टिप्स त्यांनी आम्हाला दिल्या.

शक्य तेवढ्या लवकर तिथून निघून जा

कोणत्याही संतापलेल्या जमावात तुम्ही सापडलात, किंवा सापडण्याची शक्यता आहे असं जरी तुम्हाला वाटलं तर सरळ त्या ठिकाणाहून निघून जा. जितक्या लवकर तिथून तुम्ही निघून जाल तितकं चांगलं. पण काढता पाय घेत असताना काळजी घ्या की तुम्ही जमावाच्या पुढून निघून जाणार नाही. जमावाच्या बाजूने तुम्ही कसे निसटू शकता याचा अंदाज घ्या.

जर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी असेल तर दूर एका कोपऱ्यात शांत उभे राहा.

नेहमी लक्षात ठेवा, जर अशा गर्दीत अडकलात तर कोणत्याही परिस्थिती तिथे घडणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतू नका. तसंच कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका.

वैयक्तिक पातळीवर संवाद साधा

संतापलेल्या जमावाला तोंड देताना कधी कधी त्या गर्दीतल्या लोकांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधणं उपयुक्त ठरू शकतं. तुम्ही जर कुठल्या निदर्शनाच्या ठिकाणी अडकलात, तर त्या जमावाच्या नेत्याशी संवाद साधा. हा नेताच या जमावाला नियंत्रित करत असतो आणि घोषणा देत असतो. या नेत्याशी तुम्ही वैयक्तिक पातळीवर संवाद साधलात तर तुमच्यावर हल्ला व्हायची शक्यता कमी असते.

पण अशा प्रकारचा संवाद तेव्हाच साधा जेव्हा जमावाचा नेता आक्रमक नसेल. कारण आक्रमक नेत्याशी बोलण्याचा प्रयत्न कधीकधी अंगावर उलटू शकतो.

जर जमावाला कुठला नेता नसेल तर जमावातल्या लोकांशी बोला. ध्यानात ठेवा, संवाद साधायचा असेल तर जमावात सगळ्यात मागे असणाऱ्या लोकांशी बोला, कारण पुढे आणि मध्ये असणाऱ्या लोकांपेक्षा ते कमी आक्रमक असतात.

त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही का चिडले आहात. त्यांना वाटू द्या की तुमच्या लेखी त्यांना किंमत आहे.

दुसरं म्हणजे इतकंही बोलू नका की आगाऊ वाटाल आणि नको इतकं लक्ष स्वतःकडे वेधून घ्याल.

नजर चोरू नका

'नजरे मिलाना'चा फंडा इथेही काम करतो. जमावाचा नेता किंवा गर्दीतली माणसं सगळ्यांच्या नजरेला नजर द्या. नजर अजिबात चोरू नका. अशाने जमावाच्या लक्षात येतं की तुमच्यापासून काही धोका नाही. त्याबरोबरच तुमची स्वतंत्र ओळख आणि निष्पक्षताही ठसवली जाते.

गर्दीचं मानसशास्त्र समजून घ्या आणि शांत राहा.

तुमच्यापासून काही धोका नाही हे दर्शवा

भडकलेल्या जमावापासून स्वतःला वाचवायचं असेल तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्यापासून काहीही धोका नाही हे या ना त्या प्रकारे जमावाला पटवून द्या.

कोणत्याही परिस्थितीत घडणाऱ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ नका. त्यात सहभागीही होऊ नका. गर्दीच्या रस्त्यातून ताबडतोब बाजूला व्हा. तुमच्या कोणत्याही हातवाऱ्यांधून आक्रमकता दर्शवू देऊ नका. गर्दीला हे पटवून द्या तुम्ही सर्वसाधारण व्यक्ती आहात.

गर्दीतल्या कोणालाही उचकवू नका

जमावात अडकलात तर चुकूनही कोणाला उचकवू नका. कोणाचीही बाजू घेऊ नका, कोणाशी वाद घालू नका. दोन लोकांच्या वादात अडकू नका. सरतेशेवटी, जशी संधी मिळेल तसा तिथून काढता पाय घ्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)