You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बुलंदशहर दंगलीत कशी झाली पोलीस अधिकाऱ्याची हत्या?
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, बुलंदशहर येथून
सुबोध कुमार सिंह यांच्यासाठी सोमवारचा तो दिवस इतर दिवसांसारखा नव्हता.
उत्तर प्रदेश पोलिसात 21 वर्षं सेवा बजावणारे सुबोध कुमार आपला सकाळचा नित्यक्रम कधीच मोडायचे नाहीत.
सकाळी लवकर उठणे, स्थानिक वर्तमानपत्र चाळणे आणि कुटुंबीयांना कॉल करणे, हाच नित्यक्रम ठरलेला.
त्यांना न्याहारीत कमी तेलाचा पराठा खाण्याची खूप आवड. मात्र नुकतेच अचूक सेल्फी काढायला शिकलेले तंदुरुस्तीप्रिय अधिकारी सुबोध कुमार यांनी या दुर्दैवी सकाळी न्याहारी घेतली नाही. "आज मी दुपारी डाळ आणि चपाती असं तगडं जेवणं करणार आहे," असं त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितलं.
मात्र दुपारच्या जेवणाची वेळ परत कधी आलीच नाही.
दुपारच्या जेवणाच्या वेळी ते मृत्यूशी झुंज देत होते. संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला होता. दगडफेक सुरू होती. बंदुकीच्या गोळ्या झडत होत्या. सुबोध कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अखेर ही लढाई ते हरले.
नेमकं काय घडलं?
हे सर्व सकाळी जवळपास नऊच्या सुमाराला सुरू झालं. पश्चिम उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातल्या महाव गावचे गावकरी पोलीस ठाण्यावर आले होते. शेतामध्ये जवळपास डझनभर गायींचे सांगाडे बघितल्याचा त्यांचं म्हणणं होतं.
स्थानिक रहिवासी असलेले धरमवीर सांगतात, "जवळपास दोनशे लोकं तिथे जमले होते. ते सर्व हिंदू होते. पुढे काय करायचं, यावर जोरजोरात चर्चा सुरू झाली होती."
ते स्वतःला सुदैवी समजतात. कारण काम असल्याने ते लगेच तिथून निघून गेले होते. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव ओस पडलं. अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या लोकांनी कथित गोहत्येच्या कारणावरून पुन्हा हिंसाचार भडकेल, या भीतीपोटी गाव सोडलं. तर पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने अनेक हिंदूही गाव सोडून पळाले.
संतप्त लोकांनी हे सांगाडे पोलीस ठाण्यात नेण्याचा निर्णय घेतला. तात्काळ कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती.
एव्हान साडेदहा वाजले होते आणि आता आसपासच्या गावातली माणसही महामार्गावरच्या चिंग्रावती पोलीस ठाण्यात जमू लागली होती. जवळपास तीनशे लोकांचा जमाव जमला होता.
पोलीस ठाण्यात तैनात असलेले सहा कर्मचारी पोलीस मुख्यालयात कॉल करत होते.
अधिकची कुमक मागवण्यात आली. मदत मागितल्यानंतर घटनास्थळी पोहोचणारे सुबोध कुमार सिंह पहिले अधिकारी होते. 3 मैलाच्या अंतरावरून ते आपल्या सरकारी गाडीत बसले आणि ड्रायव्हर राम आसरेला आदेश दिला, "शक्य होईल, तेवढ्या वेगात गाडी चालव."
अकराच्या ठोक्याला ते घटनास्थळी हजर होते. आल्याबरोबर ते जमावात घुसले आणि संतापलेल्या गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले.
प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितलं, "इतर सहकाऱ्यांप्रमाणे त्यांनी बुलेटप्रुफ जॅकट घातलेलं नव्हतं आणि त्यांचं पिस्तुलही त्यांच्याजवळ नव्हतं."
संतापलेला जमाव अधिक आक्रमक होत चालला होता, तसेच इतर अधिकारीही पोहोचत होते.
लोकांचा संयम सुटत चालला होता आणि हीच ती वेळ होती जेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करायचं ठरवलं. मात्र हा निर्णय घ्यायला उशीरच झाला. आधीच निर्णय घेतला असता तर सुबोध कुमार सिंह यांच्यासह दुसऱ्या तरुणाचाही जीव वाचला असता.
पोलीस ठाण्याजवळ असलेल्या मुलींच्या माध्यामिक शाळेतल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं, "पोलीस आणि संतप्त जमाव यांच्यात जवळपास अर्धा तास धुमश्चक्री सुरू होती. हवेत गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते." या कर्मचाऱ्याजवळ मोबाईलही नव्हता आणि त्याने काही तास स्वतःला लेडीज बाथरूममध्ये बंद करून घेतलं होतं.
संतप्त जमावाजवळ देशी कट्टे होते आणि त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या मते जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि इथेच चूक झाली. यानंतर जमाव आणि पोलीस यांच्यासाठी 'लढा किंवा मरा' अशीच परिस्थिती निर्माण झाली.
आता दुपार झाली होती आणि सुबोध कुमार सिंह यांच्यासह इतर पोलीसही सुरक्षित ठिकाणावर धाव घेत होते. संतप्त जमावापुढे त्यांची संख्या खूपच कमी होती आणि हा जमाव त्या भागात गोहत्येवर पूर्णपणे आळा घालण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाला होता.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातल्या एका छोट्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं. मात्र एका गावकऱ्याने फेकून मारलेली वीट सुबोध कुमार यांना लागली.
सुबोध कुमार यांचे ड्रायव्हर राम आसरे सांगतात, "आम्ही स्वतःला वाचवण्यासाठी आमच्या गाडीत आसरा घेतला, यावेळी 'सरां'ना वीट लागली आणि ते भिंतीजवळ बेशुद्ध होऊन पडल्याचं मला कळलं. मी त्यांना लगेच मागच्या सीटवर बसवलं आणि जीप शेताकडे पळवली."
ते सांगतात, "जमावाने त्यांचा पाठलाग केला. पोलीस ठाण्यापासून केवळ 50 मीटर अंतरावर शेतामध्ये जमावाने पुन्हा एकदा हल्ला चढवला."
"शेतात नुकतंच पाणी दिलं असल्याने आमच्या गाडीचं चाक मातीत रुतलं आणि जीव वाचवण्यासाठी कारमधून उतरून पळण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता," असं राम आसरे यांनी सोमवारी संध्याकाळी पोलिसांना सांगितलं.
यानंतर जो व्हिडियो व्हायरल झाला त्यात पोलीस अधिकाऱ्याला सरकारी जीपमधून बाहेर काढत असल्याचं दिसलं. ते काहीच हालचाल करत नव्हते. 'ते जिवंत आहेत की नाही,' अशी चौकशी जमाव करत असल्याचं दिसतं आणि व्हीडिओमध्ये गोळीबाराचे आवाजही ऐकू येतात. त्यांचे तीन मोबाईल फोन आणि पिस्तुल हरवलं आहे.
त्यांना डाव्या भुवईच्यावर गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आलं आहे. मात्र ती गोळी कोणत्या प्रकारची होती, हे अजून कळलेलं नाही.
जमावातल्या एकाने त्यांच्यावर त्यांच्याच पिस्तुलीतून गोळी झाडल्याचं सांगितलं जात आहे. या माहितीला दुजोरा मिळालेला नाही.
आणलं तेव्हाच सुबोध कुमार यांचा मृत्यू झाला होता, असं जवळच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, आंदोलन करणाऱ्या जमावातल्याच सुमीत नावाच्या तरुणालाही गोळी लागली आणि मेरठमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या भागात झालेल्या या दुर्दैवी घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला.
कारण भारतात गोमांस भक्षणाच्या अफवेवरून जमावाकडून ठेचून हत्या होण्याची पहिली घटना 2015 साली घडली. त्याचा तपास सुबोध कुमार सिंह यांनीच केला होता. कथित गोहत्येवरून सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू ओढवणं, ही विडंबनाच म्हणावी लागेल. दादरीमधल्या मोहम्मद अखलाखचं ते प्रकरण होतं. ती घटना घडली ते ठिकाण सुबोध कुमार यांनी ज्या शेतात शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण फार दूर नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)