उत्तर प्रदेशातल्या 'त्या' 12 मुस्लिमांनी हिंदू धर्म स्वीकारण्यामागचं पूर्ण सत्य

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, बदरखा बागपतहून

तुमचं नाव काय आहे?

"माझं नाव अख्तर अली आहे."

64 वर्षांचे अख्तर अली विसरले होते की 2 ऑक्टोबरला बागपतमधील बदरखा गावात त्यांनी धर्मांतर केलं आहे. लगेच त्यांना आठवतं आणि ते म्हणतात, "नाही, आता मी धरम सिंह आहे."

3 ऑक्टोबरला संध्याकाळचे पाच वाजले होते. त्यांच्या घरामागच्या एका छोट्या मशिदीतून अजानचा आवाज आला आणि आमच्याबरोबर बोलता बोलता धरम यांनी मध्येच बोलणं थांबवलं आणि अजान पूर्ण होईपर्यंत ते शांत बसले.

64 वर्षं एक मुस्लीम म्हणून जीवन जगलेले अख्तर अली पुढचं आयुष्य धरम सिंह म्हणून जगू शकतील?

ते म्हणतात, "आम्ही विवश आहोत. ना तिथे सुख होतं, ना इथे शांती आहे. युवा हिंदू वाहिनीने योगी-मोदी सरकारकडून आम्हाला न्याय मिळवून देण्याचं वचन दिलं आहे."

इथेही न्याय मिळाला नाही तर, असं विचारल्यावर ते म्हणतात, "मग काय? तेच होईल, न घर के ना घाट के."

आम्ही विचारलं धर्मांतर न करता न्याय मिळला असता तर बरं नसतं झालं का? यावर धरम सिंह स्वतःला सावरत डोळे मिटून घेतात.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यापासून 35 किमी दूर बदरखा गावात 2 ऑक्टोबरला अख्तर अली, त्यांची तीन मुलं, एक सून आणि इतर आठ जणांनी हिंदू धर्म स्वीकारल्याची बातमी आली.

दिलशाद यांचं म्हणणं आहे की ते आता दिलेर सिंह आहेत. इरशाद आता स्वतःला कवी म्हणवतात तर नौशाद हे नरेंद्र सिंह झालेत. दिलशाद यांच्या पत्नी मनसुचं नाव मंजू झालंय.

नौशाद म्हणजे आताचे नरेंद्र सिंह यांच्या पत्नी रुकैया यांना मात्र आपला धर्म बदलायचा नाही आणि आपण हिंदू झाल्याचं आपले पती खोटं सांगत असल्याचे त्या म्हणतात.

रुकैया माझ्याशी बोलत असताना नरेंद्र यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला. रुकैया यांनी नवऱ्याला सांगितलं, "तुम्हाला हिंदू व्हायचं असेल तर व्हा. मला माझ्याच धर्मात रहायचं आहे."

रुकैयाच्या कुशीत त्यांचा चार वर्षांचा मुलगा नाहीद आहे. नरेंद्र म्हणतात त्यांचा मुलगाही आता हिंदू झाला आहे. हे ऐकताच रुकैया जोरदार विरोध करत म्हणाल्या, "तुम्हाला जे बनायचं आहे ते बना. पण हा मुसलमानच राहील."

नरेंद्रकडे यावर काहीच उत्तर नसतं. एवढ्यात चार वर्षांचा नाहीद गव्हाच्या पोत्यावर ठेवलेला भगवा दुपट्टा आपल्या खांद्यावर ठेवतो. हाच भगवा दुपट्टा घेऊन नौशादचा नरेंद्र झाला होता.

रुकैया नाहीदवर रागवते "फेक तो दुपट्टा तिकडे" आणि नाहीद तो जागच्या जागी ठेवून देतो.

युवा हिंदू वाहिनीनं बनवलं हिंदू

बदरखा गावात या कुटुंबाचं घर नाही. ते गावातील जसबीर सिंह यांच्या घरी गेल्या दोन महिन्यांपासून राहत आहेत. घर बरंच मोठं आहे. त्यांचं म्हणणं आहे की 'युवा हिंदू वाहिनी भारत' नावाच्या संघटनेनं त्यांना हे घर मिळवून दिलं.

युवा हिंदू वाहिनी भारत या संघटनेचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष सोकेंद्र खोखर याच गावचे आहेत. त्यांनी अख्तर यांच्या कुटुंबाला हे घर मिळवून दिलं आहे.

ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संघटना हिंदू युवा वाहिनीपेक्षा वेगळी आहे का?, असं विचारल्यावर सोकेंद्र सांगतात, "मुख्यंमंत्री झाल्यावर योगींनी हिंदू युवा वाहिनी बंद केली. आमची संघटना वेगळी आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री नव्हे) आहेत आणि संरक्षक समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह आहेत."

युवा हिंदू वाहिनी भारतच्या सोकेंद्र खोखर आणि योगेंद्र तोमर यांनी या कुटुंबाला बदरखा गावातील मंदिरात हिंदू बनवलं. सोकेंद्र म्हणतात या कुटुंबाने स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आहे.

पण युवा हिंदू वाहिनी भारत या संघटनेला या लोकांचं धर्मांतर करण्याचा अधिकार आहे का? या प्रश्नावर सोकेंद्र म्हणतात, "आम्हाला विशेष काही नाही, कुणी मुस्लीम हिंदू झाला तर बरं वाटतं. मी यांना कुठलंच आश्वासन दिलेलं नाही. हे घर मिळवून दिलं आहे. मात्र तेही काही नेहमीसाठी नाही. त्यांना हे घरही सोडावं लागेल."

दुसरीकडे नौशाद म्हणतात, "आम्ही 29 सप्टेंबरला सोकेंद्र खोखरला भेटलो. तेव्हा त्यांनी आमचा भाऊ गुलशन याच्या मृत्यूच्या तपासात पोलीस आणि सरकारकडून मदत मिळवून देऊ, असं वचन दिलं. त्यांनी इतरही बरीच मदत केली आहे. ते आमची साथ सोडणार नाही. धर्मांतराचा विषयही तिथेच निघाला. तिथेच आम्ही ठरवलं की हिंदू व्हायचं."

दिलशाद म्हणजे आताचे दिलेर सिंह सांगतात, "यांनी आमची खूप मदत केली. आता फक्त खून झालेल्या भावाला न्याय मिळवून द्यायचा आहे."

आम्ही दिलेर सिंहांना विचारलं, या घरात कधीपर्यंत रहायला मिळणार आहे. तर डबडबलेल्या डोळ्यांनी सांगू लागले, "इथून कुठं जाणार, माहीत नाही. इथे येऊनही काही उपयोग झाला नाही तर पश्चात्तापच होईल."

दिलशाद यांची पत्नी मनसू सुद्धा स्वतःला हिंदू म्हणवतात. आता त्या स्वतःचं नाव मंजू सांगतात. पण त्यांना हे सगळं पटतंय का? चुलीवर स्वयंपाक करता करता हा प्रश्न ऐकताच मंजू शांत होतात. आम्हाला इथे कोणतंही उज्ज्वला सिलेंडर वगैरे दिसलं नाही. मंजू म्हणाली, "आतापर्यंत तरी गावातील हिंदूंनी खूप मदत केली आहे. पुढे काय होईल, माहीत नाही."

धर्मांतरावरून कुटुंबात मतभेद

इरशाद यांनी हिंदू धर्म स्वीकारणं त्यांच्या पत्नीला आवडलं नाही आणि ती आपल्या माहेरी निघून गेली. शबारासुद्धा याच कुटुंबाची सून आहे. त्यांनाही घरातील पुरुषांनी हिंदू धर्म स्वीकारायला सांगितलं. मात्र त्यांनी नकार दिला.

अंगणात भांडी घासत बसलेली शबारा सांगते, "मी जी आहे तीच राहणार. यांना वाटतं की हिंदू झाल्याने मुलाच्या खुनात न्याय मिळेल, तसं झालं तर चांगलंच आहे. मीही तीच प्रार्थना करते."

दुःखी अंतःकरणाने ती म्हणते, "हिंदू-मुस्लीमच्या तंट्यात आमचं कुटुंब विखुरलं."

जेव्हा या स्त्रिया हे सर्व बोलत होत्या तेव्हा अनेक गावकरी तिथे होते. ते या कुटुंबाला काय बोलावं आणि काय बोलू नये, याच्या अनेक खुणा-सूचना करत होते.

गावकऱ्यांच्या सूचनांनंतर हे लोक लगेच आपल्या वक्तव्यावरून घूमजाव करायचे. मात्र घरातली रुकैया ही एकमेव अशी स्त्री आहे जी स्पष्टपणे सांगते की तिच्या नवऱ्याने खूप घाईत हा निर्णय घेतला आहे.

या कुटुंबातल्या 20 पैकी 12 जणांनी हिंदू धर्म स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कुटुंबीयांशी बातचीत केल्यावर फक्त सहाच जण आपण हिंदू असल्याचं कबूल करतात. यावरून संपूर्ण गावात कुजबूज सुरू असलेली जाणवली.

एव्हाना रात्रीचे आठ वाजले. राजकुमार याच गावातले आहेत आणि सरपंच आहेत. त्यांच्या घरी खूप गर्दी होती. ग्रॅज्युएशन करत असलेले काही तरुण तिथे होते. त्यांचं आपापसात बोलणं सुरू होतं, "मीडियावाले तर मूर्ख आहेत. त्यांना कळत नाहीय की जोवर फायदा आहे तोवर हे लोक हिंदू राहतील, नंतर मुस्लीमच होतील."

गावात पोलीसही दिसले. त्यातला एक अधिकारी म्हणाला, "जो न खाए सुरा हिंदू ना होवै पुरा (जो डुक्कर खात नाही तो पूर्ण हिंदू नाही)."

त्यांचं म्हणणं होतं की हे लोक हिंदू तर झाले आहेत. आता त्यांनी डुकराचं मांस खाऊन दाखवावं, जे इस्लाममध्ये निषिद्ध मानलं जातं. गावकरी सांगत होते की येत्या एक-दोन दिवसात आणखी सात ते आठ जण धर्मांतर करू शकतात. युवा हिंदू वाहिनीने मात्र त्याचा इन्कार केला.

जाटबहुल गाव

हे गाव जाटबहुल आहे. इतर जातीचे लोकही आहेत, मात्र वर्चस्व जाटांचंच आहे. सरपंच राजकुमार सांगतात, "या गावात साडे तीन हजार मतदार आहेत. त्यातले साडे तीनशेच्या आसपास मुस्लीम आहेत. गावातील मुस्लिमांना या घटनेविषयी काहीच बोलायचं नाही."

रात्रीचे नऊ वाजले होते. आम्हाला गावच्या मशिदीत दहा-बारा जण बसलेले दिसले. त्यांना आम्ही या धर्मांतराविषयी विचारलं तर मोहम्मद इरफान म्हणाले, "सगळं ठीक आहे हो. तुम्ही चहा घेणार की आणि काही? थांबा तुमच्यासाठी सरबत मागवतो..."

मग आम्ही विचारलं हे सर्व कसं झालं, यामागचं कारण काय? तरी त्यांचं उत्तर तेच होतं. "सर्वकाही ठीक आहे. आम्ही सगळेही ठीक आहोत." शेवटी ते म्हणाले, "कृपा करून आम्हाला आणखी काही विचारू नका."

या घटनेनंतर गावात शांतता आहे. मात्र सरपंच राजकुमार म्हणतात एखादा मुसलमान हिंदू होतो तेव्हा बरं वाटतं. राजकुमार यांना बरं वाटणं या कुटुंबासाठी किती हिताचं ठरेल, हा प्रश्न या कुटुंबाला सतावतोय.

पण ते हिंदू का झाले?

अख्तर अलींचं कुटुंब पूर्वी बागपत शहराजवळच्या खुबीपूर निवाडा गावात रहायचं. याच वर्षी जुलै महिन्यात त्यांचा मुलगा गुलशन याचा मृतदेह टांगलेला आढळला. बागपतचे पोलीस अधीक्षक शैलेश पांडे सांगतात, "या कुटुंबाने आम्हाला न सांगताच स्वतःच त्याचा मृतदेह झाडावरून खाली उतरवला, त्याला आंघोळ घातली आणि दफनविधीसाठी घेऊन जात होते."

शैलेश पांडे सांगतात, "आम्हाला गावातूनच फोन आला की गावात गुलशन नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे आणि त्याला दफनविधीसाठी घेऊन गेलेत. पोलिसांची गाडी पोहोचली तेव्हा तिथूनच बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेलो. हे स्वतःच या प्रकरणात संशयित आहेत. यांनी पोलिसांना न सांगताच मृतदेह का उतरवला? दफनविधीची घाई का करत होते? यांनी जो FIR लिहिला आहे त्यातही हेच सांगितलं आहे की त्यांना त्यांच्या मुलाचा मृतदेह टांगलेला आढळला."

शैलेश पांडे सांगतात, "प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि लवकर सगळं स्पष्ट होईल"

अख्तर अली, जे आता धरम सिंह झालेत, त्याचं म्हणणं आहे की त्यांच्या 22 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे आणि पोलीस तपासात दिरंगाई करत आहेत. नौशाद यांचंही तेच म्हणणं आहे. ते म्हणतात या कठीण प्रसंगात त्यांच्या धर्मातल्या लोकांनीही त्यांची साथ दिली नाही. म्हणूनच त्यांनी हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

खुबीपूर निवाडाच्या गावकऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे. ते सांगतात गुलशनच्या पत्नीला तिच्या माहेरचे गेल्या वर्षभरापासून सासरी पाठवत नव्हते. यामुळेच गुलशनने आत्महत्या केली. कठीण काळात आपल्याच धर्मबांधवांनी साथ दिली नाही, या आरोपावर गावकरी म्हणतात, तसं असतं तर मग आम्ही दफनविधीही करू दिला नसता ना.

अख्तर अली आता हिंदू झालेत. त्यांच्या हिंदू होण्याने आता पोलीस त्यांच्या इच्छेप्रमाणे तपास करतील? शैलेश पांडे म्हणतात, "पोलीस धर्माच्या आधारावर नाही तर पुराव्यांच्या आधारावर तपास करतात आणि कुणी हा विचार करत असेल की धर्म बदलल्यामुळे त्याला मदत मिळेल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे."

"याच कुटुंबातल्या नौशादने जिल्हा प्रशासकीय अधिकारी SDMकडे एक शपथपत्र दिलं होतं. त्यात आपण हिंदू धर्मापासून प्रभावित झालो आहोत आणि म्हणून स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचं त्यात म्हटलं होतं. धर्मांतरणाचा कुठलाच सरकारी मार्ग नाही. तुम्हाला मुसलमान बनून जगायचं आहे की हिंदू, याच्याशी प्रशासनाला काहीच देणंघेणं नाही."

धर्मांतरानंतर त्यांना कोणती जात लागणार?

युवा हिंदू वाहिनीचं म्हणणं आहे की यांचे पूर्वज जोगी जातीचे होते, त्यामुळे यांना जोगी जातच मिळेल. अख्तर अलीच्या कुटुंबीयांचंही हेच म्हणणं आहे की ते फेरीवाले आहेत. त्यामुळे ही जात त्यांच्या व्यवसायाशी सुसंगतच आहे. मात्र शैलेश पांडे सांगतात की कुणी स्वतः स्वतःची जात निवडू शकत नाही आणि निवडली तरी त्या जातीला मिळणाऱ्या सरकारी सवलती त्यांना मिळणार नाही.

एव्हाना सूर्यास्त झाला आहे. बदरखा गाव अंधारात गुडूप झालं. अख्तर अलीच्या अंगणातही तोच काळोख होता. मात्र ही रात्र आता अख्तर अली नाही तर धरम सिंहांच्या अंगणात झाली आहे. रुकैया कणीक मळत आहे. कालपर्यंत ती नौशादसाठी पोळ्या करायची, आज नरेंद्रसाठी करेल. रुकैया म्हणते, "काय फरक पडतो? मला तर तेच करायचं आहे जे रोज करते. हिंदू असू दे नाहीतर मुसलमान."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)