बुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी 2 अटकेत, स्यानात तणाव कायम

सोमवारी घडलेल्या घटनेच्या धक्क्यातून बुलंदशहरातील स्याना अजूनही सावरलेलं नाही. शहर अजूनही पूर्वपदावर नाही. पोलीसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

काही हल्लेखोरांची ओळख पोलिसंना पटली आहे. त्याआधारे काही जणांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

"पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांचा समावेश असलेल्या पोलिसांच्या टीमवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. तर 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आम्ही गोहत्येच्या आरोपाची चौकशी करत आहोत आणि या प्रकरणात सामील असलेल्या लोकांचा शोध घेत आहोत," असं ज्येष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी बीबीसीला सांगितलं.

दुकानं आणि शाळा बंद आहेत. सुरक्षा दलाचे हजारो लोक सध्या तैनात करण्यात आले आहेत. गोहत्येच्या प्रकरणात हिंसाचार या भागात होत असतात मात्र अशा प्रकारची घटना या भागात पहिल्यांदाच घडत आहे.

बुलंदशहरात नेमकं काय घडलं?

सोमवारी बुलंदशहर जिल्ह्यातल्या स्यानामध्ये उसळलेल्या हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू झाला. तर अन्य एक पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला.

सोमवारी सकाळी झालेल्या या घटनेत पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाल्याचं मेरठ पोलीस महानिरीक्षक राम सिंह यांनी बीबीसीला सांगितलं.

हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते गोहत्येविरोधात आंदोलन करत होते असं स्थानिक पत्रकार सुमित शर्मा यांनी सांगितलं.

गोहत्येची माहिती मिळाली होती

आंदोलन तीव्र झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार या घटनेत जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

''सोमवारी सकाळी अकरा वाजता चिंगरावटी गावात गोहत्या झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. त्याचवेळी परिसरातील लोकांनी रस्ते अडवण्याचा प्रयत्न केला'', असं जिल्हाधिकारी अनुज झा यांनी सांगितलं.

पोलिसांनी एफआयआर दाखल करून कारवाईला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. या हल्ल्यात स्याना ठाण्याचे एसएचओ सुबोध कुमार यांचा मृत्यू झाला.

यानंतर घटनास्थळी प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

''घटनास्थळी पोलीस बंदोबस्त आहे. परिस्थिती नियंत्रणात असेल याची ते काळजी घेत आहेत. समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे. कायदा हातात घेणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही'', असं बुलंदशहरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक कृष्ण बहादुर सिंग यांनी सांगितलं.

पोलीस जखमी

राम सिंह यांच्या मते हिंसाचारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीत दोन आंदोलनकर्ते जखमी झाले. बुलंदशहर जिल्ह्यातल्या स्यानाजवळच्या चिंगरावटी पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.

सुमित शर्मा यांच्यामते हिंदुत्ववादी संघटनांनी परिसरात गायीचे अवशेष मिळाल्याच्या आरोपांवरून महाव गावी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)