गाय देणार एड्सपासून बचावाची लस

    • Author, जैम्स गैलघर
    • Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

एड्सचा वायरस संपवण्यासाठी आवश्यक लस बनवण्यात गाय महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते, असं अमेरिकी संशोधकांचं मत आहे.

असं म्हणतात की कॉम्प्लेक्स आणि बॅक्टेरियायुक्त पचन यंत्रणेुमळं गायींमध्ये स्व:संरक्षणाची क्षमता अधिक असते.

या स्व:संरक्षणासाठी त्या स्वत:च्या शरीरात विशेष अॅंटीबॉडीज तयार करतात.

त्या अॅंटीबॉडीजमुळं HIV ला संपुष्टात आणता येऊ शकतं. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने ही माहिती महत्त्वपूर्ण असल्याचं सांगितलं आहे.

HIV चा जीवाणू खूप भयंकर असतो. तो रूग्णाच्या शरीरात स्वत:ची स्थिती सतत बदलत असतो, ज्यानं त्याला रूग्णाच्या प्रतिकार प्रणालीवर हल्ला करणे सोपं होतं.

मात्र गायीच्या अॅंटीबॉडीजपासून तयार होणारी एक लस रूग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकते आणि HIV च्या संक्रमणापासून लोकांना वाचवू शकते.

गायींचं योगदान

इंटरनॅशनल एड्स वैक्सीन इनिशिएटिव आणि द स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्युटने गायींच्या स्व:संरक्षण क्षमतेचा अभ्यास सुरू केला आहे.

"HIV विषाणू संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक असलेले अॅंटीबॉडीज गायीच्या शरीरात काही आठवड्यांत तयार होतात. पण मानवी शरीराला यासाठी तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. HIVच्या इलाजासाठी ही खूपच महत्त्वपूर्ण बाब आहे. यापूर्वी कुणाला माहिती होतं की HIVच्या उच्चाटनासाठी गाय महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते?" असं डॉक्टर डेविन सोक यांनी बीबीसीला सांगितले.

आव्हानं

'नेचर' या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या माहितीनुसार गायीच्या शरीरात तयार होणाऱ्या अॅंटीबॉडीजमुळं HIVचा प्रभाव 42 दिवसांत 20 टक्क्यांपर्यंत कमी केला जातो.

प्रयोगशाळांतील परीक्षणांमध्ये असं समोर आलंय की 381 दिवसांत या अॅंटीबॉडीज एचआईव्हीला 96 टक्क्यांपर्यंत संपवू शकतात.

डॉ. डेनिस बर्टन यांच्या मते, "माणसांच्या तुलनेत जनावरांच्या शरीरात तयार होणाऱ्या अॅंटीबॉडीज जास्त परिणामकारक असतात आणि HIV संपुष्टात आणण्याची त्याची क्षमताही उत्तम असते."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)